नवी दिल्ली
प्रसिद्ध चित्रपट निर्माते इम्तियाज अली यांची आगामी वेब सिरीज 'ओ साथी रे' (O Saathi Re) येत्या ४ डिसेंबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. या सिरीजमध्ये अभिनेत्री अदिती राव हैदरी, अविनाश तिवारी आणि अर्जुन रामपाल यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
इम्तियाज अली यांनी या सिरीजची निर्मिती आणि शोरनर म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. मोहित चौधरी आणि शिबाशीष सरकार हे या प्रकल्पाचे सहनिर्माते आहेत, तर आरिफ अली यांनी सिरीजचे दिग्दर्शन केले आहे. विभक्त होण्याच्या मार्गावर असलेल्या एका जोडप्याच्या नात्यातील गुंतागुंत आणि असमान प्रेमाचा प्रवास या कथानकातून उलगडण्यात आला आहे.
या सिरीजविषयी बोलताना इम्तियाज अली म्हणाले, "ओ साथी रे हा आधुनिक काळातील पण जुन्या काळातील गोडवा जपणारा एक रोमँटिक शो आहे. अनेकदा प्रेम अनपेक्षित कोपऱ्यातून समोर येऊन आपल्याला आश्चर्यचकित करते. घटस्फोटाच्या उंबरठ्यावर असलेल्या जोडप्यामध्ये आपुलकी कशी वाढत जाते, याची ही गोष्ट आहे. प्रेम सुंदर असते, पण नाते नेहमीच समान पातळीवर नसते आणि एकमेकांना साजेसे जोडपे बनून राहणे हे अनेकदा ओझे ठरू शकते."
प्रेम हे केवळ स्वप्न पाहणे किंवा एकत्र येणे नसून, कधीकधी समोरच्याला मोकळे सोडण्याची प्रक्रियाही असते, असे इम्तियाज अली यांनी नमूद केले. या सिरीजमधील पात्रे बहुआयामी आणि खऱ्या आयुष्याशी मिळतीजुळती असल्यामुळेच सर्वोत्तम कलाकारांची निवड करण्यात आली आहे. नेटफ्लिक्स इंडियाच्या सिरीज प्रमुख तान्या बामी यांनी सांगितले, "रोमान्स हा प्रेक्षकांचा आवडता प्रकार असूनही वेब सिरीजच्या स्वरूपात त्यावर फारसे काम झालेले नाही. 'मुसाफिर कॅफे' नंतर इम्तियाज अली यांची 'ओ साथी रे' ही कलाकृती प्रेक्षकांसमोर आणण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत."