कोलकाता
कोलकाता येथून मुंबईला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानातील स्वच्छतागृहात अपहरणाची धमकी देणारी चिठ्ठी आढळल्याने विमानतळावर खळबळ उडाली. उड्डाणापूर्वी ही चिठ्ठी सापडल्यानंतर सुरक्षा अधिकाऱ्यांनी तातडीने सर्व प्रवाशांना विमानातून खाली उतरवले आणि विमान तपासणीसाठी आयसोलेशन बेमध्ये (Isolation Bay) हलवले.
हे विमान सकाळी १०.२० वाजता मुंबईच्या दिशेने उड्डाण करणार होते. मात्र उड्डाणाच्या काही वेळ आधीच विमानाच्या स्वच्छतागृहात ही चिठ्ठी सापडली. या चिठ्ठीत सकाळी ११.१० वाजता विमानाचे अपहरण केले जाईल अशी धमकी देण्यात आली होती, अशी माहिती कोलकाता विमानतळाचे संचालक विक्रम सिंह यांनी दिली.
चिठ्ठी सापडताच विमानात बसलेल्या सर्व प्रवाशांना तात्काळ खाली उतरवण्यात आले. विमानतळावरील सुरक्षा नियमावली (Security Protocols) त्वरित कार्यान्वित करण्यात आली. सखोल तपासणी आणि आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी हे विमान आयसोलेशन बेमध्ये नेऊन सुरक्षा यंत्रणांनी तपास सुरू केला आहे.