भक्ती चाळक
माणूस कितीही मोठा झाला, यशाच्या उत्तुंग शिखरावर पोहोचला तरी त्याच्या मनात भूतकाळातील काही आठवणींचे कप्पे कायम उघडे असतात. बाहेरून खंबीर दिसणाऱ्या प्रत्येक चेहऱ्यामागे एक हळवी, डोळ्यांत पाणी आणणारी गोष्ट दडलेली असते.
प्रसिद्ध व्यक्तींच्या आयुष्यातील याच अनवट, न सांगिलेल्या आणि काळजाला स्पर्श करणाऱ्या प्रसंगांना उजाळा देण्यासाठी आम्ही घेऊन येत आहोत एक नवीन विशेष मालिका ‘एक कहाणी’. यशाच्या झगझगाटामागे दडलेला निखळ मानवी स्वभाव तुमच्यापर्यंत पोहोचवणारा हा एक प्रयत्न...
घराच्या भिंतीमुळे दुरावा
कौटुंबिक श्रीमंती म्हणजे नक्की काय? हातात महागडं घड्याळ, दारात उभ्या असलेल्या गाड्या की आलिशान बंगला? कधीकधी जग जिंकल्याचा आनंदही फिका पडतो, जेव्हा आयुष्यातील सर्वात मोलाची व्यक्ती तुमच्यासोबत नसते.
बॉलिवूडचा ‘जग्गू दादा’ म्हणजेच अभिनेते जॅकी श्रॉफ यांच्या आयुष्यातील एका प्रसंगाने त्यांच्या संपूर्ण अस्तित्वालाच हादरवून सोडले. यशाच्या शिखरावर पोहोचल्यानंतरही त्यांच्या पदरात एक अशी वेदना पडली, जी जगातील कोणतीही संपत्ती कधीही भरून काढू शकत नाही.
करोडपतीच्या व्यासपीठावर आठवणींना उजाळा
‘कौन बनेगा करोडपती १३’च्या ‘शानदार शुक्रवार’ भागाचे शूटिंग सुरू होते. मंचावर समोर महानायक अमिताभ बच्चन बसलेले होते. जॅकी श्रॉफ यांच्यासोबत त्यांचे जीवलग मित्र अभिनेते सुनील शेट्टी पाहुणे म्हणून आले होते.
हसतखेळत सुरू असलेल्या या कार्यक्रमात अचानक घडलेल्या एका प्रसंगाने संपूर्ण सेटवर शांतता पसरली. सुनील शेट्टी यांनी जॅकी दादांच्या आयुष्यातील एका अत्यंत दुःखाद आठवण सांगितली. ती आठवण ऐकताच जॅकी श्रॉफ यांना अश्रू अनावर झाले. इतके दिवस मनाच्या कोपऱ्यात दाबून ठेवलेले दुःख ओसंडून वाहू लागले. महानायक अमिताभ बच्चन यांच्याही डोळ्यांत पाणी आले.
सुनील शेट्टी यांनी त्या प्रसंगाची आठवण सांगताना सांगितले, “दादाने (जॅकी श्रॉफ) एकदा अत्यंत सुंदर आणि तितकीच मन हेलावून टाकणारी गोष्ट सांगितली होती. जॅकी जेव्हा मुंबईतील तीन बत्ती परिसरातील एका छोट्याशा खोलीच्या चाळीत राहायचा, तेव्हा त्याची आई अगदी शेजारीच झोपायची.”
जॅकी दादांच्या शब्दांत सांगायचे तर, “आम्ही जेव्हा एका छोट्या खोलीत राहायचो, तेव्हा रात्री आईला जरासा खोकल्याचा उबळ आला किंवा तिने फक्त आवंढा भरला, तरी मला लगेच समजायचे. मी एका क्षणात उठून काय झालं विचारायचो.”
त्या एका छोट्या खोलीत जागेची चणचण नक्कीच होती, पण माणसं एकमेकाला जोडलेली असायची. आईचा प्रत्येक श्वास, तिची प्रत्येक हालचाल जॅकी यांच्या थेट कानापर्यंत पोहोचायची.
काही वर्षांनंतर जॅकी श्रॉफ चित्रपटसृष्टीत सुपरस्टार झाले. प्रसिद्धी मिळाली, गडगंज पैसा आला. चाळीतील ती छोटी खोली सोडून जॅकी आपल्या कुटुंबासह वांद्रे येथील एका भव्य आणि आलिशान बंगल्यात राहायला गेले.
त्या मोठ्या घरात प्रत्येकासाठी वेगळी खोली होती. आईची खोली वेगळी, वडिलांची वेगळी आणि जॅकी यांची स्वतःची वेगळी खोली. सर्व भौतिक सुखसोयी पायाशी लोळण घेत होत्या. परंतु, याच मोठ्या घरात एका दुर्दैवी रात्री सर्व काही बदलले. जॅकी यांच्या आई रीता श्रॉफ यांना रात्रीच्या वेळी अचानक स्ट्रोक (पक्षाघात) आला.
सकाळी नेहमीप्रमाणे जेव्हा आईच्या खोलीचा दरवाजा उघडला गेला, तेव्हा त्या या जगातून निघून गेल्या होत्या. रात्रीच्या वेळी आईला त्रास झाला, पण मधल्या भिंतींमुळे आणि मोठ्या अंतरामुळे त्यांचा आवाज जॅकी यांच्या खोलीपर्यंत पोहोचूच शकला नाही.
आईच्या आठवणीत जॅकीदादा भावूक
हा प्रसंग सांगताना जॅकी श्रॉफ यांचा गळा दाटून आला होता. २०१४ मध्ये एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत जॅकी यांनी आपले हे दुःख मोकळेपणाने व्यक्त केले होते.
जॅकी म्हणाले, “माझ्या आईला स्ट्रोक आला आणि मला समजलेच नाही. आम्ही जेव्हा तीन बत्तीत छोट्या खोलीत राहायचो, तेव्हा ती खोकली तरी मला लगेच ऐकू जायचे. वांद्र्याच्या मोठ्या घरात गेल्यानंतर आईची खोली वेगळी होती, बाबांची वेगळी आणि माझी वेगळी. त्यामुळे सकाळी मला ती वारल्याचे समजले. जर मला रात्रीच हे समजले असते, तर मी तिला तातडीने हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो असतो. तिचे प्राण वाचले असते.”
जॅकी पुढे म्हणाले, “या सगळ्यात हरपलं आणि काय मिळालं हेच मला समजेना. मी माझ्या आईवर जीवापाड प्रेम करायचो. मी नेहमी स्वतःला विचारतो, जर माझे तिच्यावर इतके प्रेम होते, तर मी तिच्यासोबत स्वतःला का जाळून घेतले नाही? आज इतक्या वर्षांनंतरही मला आठवड्यातून दोन-तीन वेळा आईची स्वप्ने पडतात. मी स्वप्नात पुन्हा माझ्या त्याच जुन्या घरात जातो, आईच्या शेजारी बसतो आणि तिचे पाय दाबून देतो.”
यशाच्या शिखरावर पोहोचताना आपण नक्की काय मिळवतो आणि काय गमावतो, याचा पुनर्विचार करायला लावणारा हा प्रसंग आहे. भौतिक सुखांच्या मागे धावताना आपल्या माणसांमधील दुरावा वाढणार नाही, याची काळजी घेणे किती गरजेचे आहे, हेच जॅकी श्रॉफ यांची ही ‘एक कहाणी’ आपल्याला शिकवून जाते.