केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उद्यापासून दोन दिवसीय पुणे दौऱ्यावर; अजित पवार यांच्या पुतळ्याचे करणार अनावरण

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 13 m ago
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

 

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह १५ नोव्हेंबरपासून दोन दिवसीय पुणे दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात त्यांच्या हस्ते तळेगाव येथील 'नॅशनल हेवी इंजिनिअरिंग कोऑपरेटिव्ह' (NHEC) संस्थेच्या पुनरुज्जीवन प्रकल्पाचे उद्घाटन आणि दिवंगत नेते अजित पवार यांच्या पुतळ्याचे अनावरण केले जाणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून बंद पडलेली ही सहकारी संस्था पुन्हा सुरू करण्याच्या दृष्टीने १५ नोव्हेंबर रोजी या प्रकल्पाची पायाभरणी केली जाईल, जे एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.

तळेगाव येथे १९७४ मध्ये 'एनएचईसी' या सहकारी संस्थेची स्थापना करण्यात आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'सहकार से समृद्धी' या संकल्पनेनुसार सहकार क्षेत्र मजबूत करण्यासाठी अमित शाह आणि केंद्र सरकारने केलेल्या विशेष प्रयत्नांमुळे हा पुनरुज्जीवन उपक्रम हाती घेण्यात आला आहे, अशी माहिती केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली.   

या संस्थेच्या माध्यमातून साखर आणि दुग्धव्यवसाय उद्योगांसाठी लागणाऱ्या आधुनिक यंत्रसामग्रीचे उत्पादन अपेक्षित आहे. या प्रकल्पाच्या पुनरुज्जीवनामुळे मावळ आणि पुणे जिल्ह्यात रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होतील, स्थानिक उद्योगांना चालना मिळेल आणि यंत्रसामग्री निर्यातीच्या नव्या संधी उपलब्ध होतील, असे मोहोळ यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे सांगितले. 

याशिवाय, अमित शाह यांच्या हस्ते १६ नोव्हेंबर रोजी पुणे जिल्हा परिषद परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या पुतळ्याचे अनावरण केले जाणार आहे. यंदा २८ जानेवारी रोजी झालेल्या विमान अपघातात त्यांचे निधन झाले होते.   


Latest News