भारताकडेच असावे उपग्रह संप्रेषणाचे 'किल स्विच' नियंत्रण; सुनील भारती मित्तल यांची मागणी

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 11 m ago
भारती एअरटेलचे संस्थापक आणि अध्यक्ष सुनील भारती मित्तल
भारती एअरटेलचे संस्थापक आणि अध्यक्ष सुनील भारती मित्तल

 

भारताने आपल्या भूमीवरील उपग्रह संप्रेषणाचे (सॅटेलाइट कम्युनिकेशन) नियंत्रण म्हणजेच 'किल स्विच' स्वतःकडेच राखले पाहिजे, असे स्पष्ट प्रतिपादन भारती एअरटेलचे संस्थापक आणि अध्यक्ष सुनील भारती मित्तल यांनी केले आहे. सॅटेलाइट ब्रॉडबँड कधी सुरू होणार हे ठरवणाऱ्या सुरक्षा अटींवर सरकार विचार करत असताना त्यांनी हे महत्त्वाचे विधान केले आहे. भारती एन्टरप्रायझेसच्या ५0 व्या वर्षपूर्तीनिमित्त दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही भूमिका मांडली.

किल स्विच म्हणजे ऑपरेटरच्या नियंत्रण यंत्रणा आणि ग्राउंड गेटवेवरून एखाद्या टर्मिनल, प्रदेश किंवा संपूर्ण देशातील उपग्रह नेटवर्कची सेवा खंडित करणे, मर्यादित करणे किंवा प्रतिबंधित करणे होय. सॅटेलाइट ब्रॉडबँडमध्ये वापरकर्ते सॅटेलाइटशी जोडले जातात, जे ट्रॅफिक ग्राउंड स्टेशनवर आणि नंतर इंटरनेटवर रिले करतात. त्यामुळे हे नियंत्रण आणि गेटवे प्रणाली चालवणारी व्यक्ती वापरकर्त्यांना अक्षम करू शकते किंवा त्यांचा डेटा पुनर्निर्देशित करू शकते. युद्धाच्या काळात, सुरक्षेच्या धोक्याच्या वेळी किंवा कायदेशीर आदेश लागू करण्यासाठी ही यंत्रणा अत्यंत महत्त्वाची ठरते. जर हे नियंत्रण परदेशी ऑपरेटरकडे किंवा परदेशात असेल, तर इतर ठिकाणच्या निर्णयामुळे देशाची लष्करी, आपत्कालीन आणि नागरी सेवा विस्कळीत होऊ शकते, याकडे मित्तल यांनी लक्ष वेधले.

युक्रेनचे उदाहरण आणि भारतासाठी सुरक्षेचे निकष
युक्रेनचे उदाहरण देताना मित्तल म्हणाले की, युक्रेन जर स्टारलिंक वापरत असेल, तर ते आता वनवेबचाही वापर करत आहेत. गेल्या महिन्यात युक्रेनने एलोन मस्क यांच्या स्पेसएक्सवर लष्करी ऑपरेशन्समध्ये अडथळा आणल्याचा आरोप केला होता. सरकारचा उपग्रह ऑपरेटरवरील संशय योग्य आहे का, या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले की, आजचे युद्ध हे अंतराळात जात आहे. त्यामुळे भारताला स्वतःचे रक्षण करण्यासाठी सुरक्षात्मक संरक्षक भिंती (guardrails) आणि नियंत्रण आवश्यक आहे. भारताने एकाच कंपनीवर किंवा एकाच देशावर अवलंबून राहू नये, असे सांगत सर्व संप्रेषण भारतामधूनच मार्गस्थ झाले पाहिजे, यावर त्यांनी भर दिला.

भारतातजिओ, वनवेब आणि स्टारलिंक या तीन कंपन्यांकडे सॅटेलाइट कम्युनिकेशनचे परवाने आहेत. वनवेबची सेवा आधीपासूनच भारतात कार्यरत असून, आपत्कालीन सेवांसाठी सरकारकडून कधीकधी त्यांच्या टर्मिनलचा वापर केला जातो, असे त्यांनी नमूद केले. सॅटेलाइट नेटवर्क हे मोबाईल नेटवर्कची जागा घेऊ शकत नाही, तर ते एकमेकांना पूरक आहेत. जंगले, डोंगराळ भाग, महासागर आणि हवेत जिथे सिग्नल मिळत नाही, तिथे सॅटेलाइट जोडणी महत्त्वाची ठरेल, असेही मित्तल यांनी स्पष्ट केले.