पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या फिलिपिन्स दौऱ्यावर; मनिला येथे विविध जागतिक नेत्यांशी साधणार संवाद

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 3 h ago
पंतप्रधान नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी

 

आसियान देशांसोबतचे भारताचे संबंध हे भारताच्या 'ॲक्ट ईस्ट' धोरणाच्या केंद्रस्थानी असून 'महासागर' (MAHASAGAR) दृष्टिकोनात त्यांना महत्त्वाचे स्थान आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी केले. पंतप्रधान मोदी दोन दिवसांच्या फिलिपिन्स दौऱ्यावर रवाना झाले असून, त्यापूर्वी दिलेल्या निवेदनात त्यांनी ही भूमिका मांडली.

फिलिपिन्सचे राष्ट्राध्यक्ष फर्डिनांड आर. मार्कोस ज्युनियर यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान मोदी १६ आणि १७ नोव्हेंबर रोजी मनिला येथे भेट देत आहेत. या दौऱ्यात ते २३ व्या आसियान-भारत शिखर परिषदेत आणि २१ व्या पूर्व आशिया शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत. शतकानुशतकांच्या सांस्कृतिक देवाणघेवाणीत रुजलेले भारताचे आसियानसोबतचे संबंध आता व्यापार, संपर्कव्यवस्था, सागरी सुरक्षा, तंत्रज्ञान आणि जनसंपर्क यांसारख्या विविध क्षेत्रांत एका गतिमान भागीदारीत रूपांतरित झाले असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले.

इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील शांतता आणि सहकार्यावर भर
आसियान-भारत शिखर परिषदेत सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीची प्रगती पुढे नेण्यासाठी आणि विकास, संपर्कव्यवस्था व समृद्धीच्या सामायिक आकांक्षांना नवी गती देण्यासाठी सहकारी नेत्यांसोबत काम करण्यास आपण उत्सुक असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. तसेच, पूर्व आशिया शिखर परिषद प्रादेशिक आणि जागतिक आव्हानांवर चर्चा करण्यासाठी एक महत्त्वाचे व्यासपीठ ठरेल. या परिषदेत इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील शांतता, स्थैर्य आणि सहकार्य मजबूत करण्यावर सहभागी नेत्यांशी विचारांची देवाणघेवाण केली जाईल, असे ते म्हणाले.

या दौऱ्यात पंतप्रधान मोदी फिलिपिन्समधील भारतीय समुदायाशीही संवाद साधणार आहेत. भारतीय समुदायाचे योगदान दोन्ही देशांमधील मैत्रीचे बंध अधिक घट्ट करते, असे त्यांनी सांगितले. या भेटीमुळे भारताच्या आसियानसोबतच्या भागीदारीला नवी ऊर्जा मिळेल आणि शांततापूर्ण, समृद्ध व सक्षम इंडो-पॅसिफिक क्षेत्रासाठीची सामूहिक कटिबद्धता अधिक दृढ होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.