हैदराबाद
हैदराबाद शहरातील काही ठिकाणी बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी देणारा ईमेल आल्यानंतर पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केली आहे. हा ईमेल प्राथमिक तपासात अफवा असल्याचे दिसून आले आहे. तरीही खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी गस्त आणि तपासणी वाढवली आहे. काचिगुडा रेल्वे स्थानक आणि जवळच्या एका हॉटेलचा या ईमेलमध्ये उल्लेख असल्याचे समोर आले आहे.
शहर पोलिसांच्या ईमेल आयडीवर २१ नोव्हेंबर रोजी हा ईमेल आला होता. तेलंगणाचे पोलीस महासंचालक सी. व्ही. आनंद यांनी सांगितले की, शहर पोलीस आयुक्तांच्या प्राथमिक मूल्यांकनानुसार हा ईमेल बनावट असल्याचे दिसते. "नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी या खबरदारीच्या उपाययोजना आवश्यक आहेत. अफवांवर विश्वास ठेवू नका किंवा त्या पसरवू नका," असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
या धमकीच्या ईमेलमागे कोण आहे याचा शोध घेण्यासाठी सायबर गुन्हे पोलीस तपास करत आहेत. संशयित ठिकाणी बॉम्बशोधक व नाशक पथकाकडून तपासणी केली असून दृश्य पोलीस बंदोबस्त वाढवला आहे. संबंधित सुरक्षा यंत्रणांशी समन्वय साधून गस्त घालण्याचे निर्देश दिले आहेत.
संशयित व्यक्ती, बेवारस वस्तू, वाहने किंवा असामान्य हालचाली दिसल्यास नागरिकांनी तातडीने ११२ क्रमांकावर पोलिसांना कळवावे, असे आवाहन केले आहे. पोलीस कर्मचारी चोवीस तास कार्यरत असून नागरिकांच्या सुरक्षेसाठी कटिबद्ध असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.