एक कहाणी : कॅन्सरशी झुंज देणाऱ्या इम्रान हाश्मीच्या सुपरहिरोची

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 6 h ago
अभिनेता इम्रान हाश्मी समवेत मुलगा अयान
अभिनेता इम्रान हाश्मी समवेत मुलगा अयान

 

भक्ती चाळक

रुपेरी पडद्यावरचा लखलखाट, प्रसिद्धीची वलयं आणि जग जिंकल्याचा आनंद. कलाकारांचं आयुष्य आपल्याला बाहेरून कितीतरी देखणं आणि परिपूर्ण दिसतं. परंतु नियतीच्या मनात आलं की, एका क्षणात सगळं काही पार उद्ध्वस्त होऊन जातं. 

प्रसिद्ध व्यक्तींच्या आयुष्यातील काही काळजाला तडे पाडणारे प्रसंग आणि तिथून पुन्हा उभं राहण्याची जिद्द यांना उजाळा देण्यासाठी आम्ही सुरू केली आहे एक नवी मालिका ‘एक कहाणी’. या मालिकेत आज आपण जाणून घेऊ इम्रान हाश्मी या बापमाणसाची कहाणी.

त्या दुपारी पायाखालची जमीन सरकली
वर्ष २०१४ ची ही गोष्ट. बॉलिवूडमध्ये इम्रान हाश्मी नावाचा स्टार आपल्या यशाच्या शिखरावर होता. हातात उत्तम सिनेमे, प्रसिद्धी आणि कुटुंबासोबतचं आनंदी आयुष्य. सगळं काही अगदी व्यवस्थित सुरू होतं. इम्रानला वाटत होतं, आयुष्य आता आपल्या मुठीत आलंय.

१३ जानेवारीच्या त्या दुपारी इम्रान, त्याची पत्नी आणि अवघा तीन वर्षांचा मुलगा अयान एका हॉटेलमध्ये ब्रंचसाठी गेले होते. तिघेही मस्त पिझ्झा खात आनंदात गप्पा मारत होते. पण त्याच टेबलवर अयानला पहिला त्रास जाणवला. त्याच्या लघवीतून रक्ताची धार वाहू लागली.
 

काहीतरी किरकोळ संसर्ग असेल या आशेने इम्रान आणि त्याची पत्नी डॉक्टरांच्या क्लिनिकमध्ये पोहोचले. पण पुढच्या अवघ्या तीन तासांत डॉक्टरांनी काढलेले उद्गार ऐकून त्यांच्या पायाखालची जमीनच घसरली.

डॉक्टर म्हणाले, “तुमच्या तीन वर्षांच्या मुलाला कॅन्सर झालाय. पहिल्या स्टेजचा विल्म्स ट्यूमर (मूत्रपिंडाचा कॅन्सर) आहे हा. उद्याच्या उद्या त्याला ऑपरेशन थिएटरमध्ये न्यावं लागेल आणि त्यानंतर केमोथेरपी सुरू करावी लागेल.” 

अवघ्या १२ तासांच्या आत इम्रान हाश्मीचं संपूर्ण जग बदललं होतं.
एका मुलाखतीत त्या कठीण दिवसाची आठवण सांगताना इम्रान गहिवरला होता. तो म्हणाला, “माझ्या आयुष्यातला तो सगळ्यात कठीण काळ होता. तो ५ वर्षांचा काळ मी शब्दांत मांडूच शकत नाही. जेव्हा तुम्हाला वाटतं की तुम्ही आयुष्यात खूप यश मिळवलंय, आता सगळं स्थिरस्थावर आहे, अगदी त्याच क्षणी नियती तुमच्या तोंडावर एक सणसणीत चपराक मारते. आमच्यासोबत तेच घडलं.”

तिथून पुढे सुरू झाला अंगावर काटा आणणारा पाच वर्षांचा प्रदीर्घ लढा. हॉस्पिटलच्या फेऱ्या, केमोथेरपीच्या वेदना आणि तीन वर्षांच्या चिमुकल्या अयानचं विव्हळणं. एका बापासाठी आपल्या मुलाला या यातनांमध्ये पाहणं म्हणजे रोज मरण अनुभवण्यासारखं होतं.
 

पुन्हा कॅन्सर परतण्याची भीती
ऑपरेशन झालं, केमोथेरपी संपल्या. पण खरी मानसिक कसरत तर त्यानंतरच्या रेमिशनच्या काळात होती. रेमिशन म्हणजे कॅन्सर पुन्हा उलटण्याचा काळ.

२०१९ मध्ये कौन बनेगा करोडपतीच्या मंचावर अमिताभ बच्चन यांच्याशी बोलताना इम्रानने पालकांच्या मनातल्या त्या भयावह भीतीबद्दल मोकळेपणाने मांडलं होतं. तो म्हणाला होता, “कॅन्सरचा तो रेमिशनचा काळ खूप भयंकर होता. कॅन्सर कुठे पुन्हा उलटणार तर नाही ना, या विचाराने आम्ही रोज भीतीच्या छायेत जगायचो. ती सततची भीती माणसाला मानसिकदृष्ट्या पूर्णपणे तोडून टाकते.”

अन् शेवटी जिंकला तो सुपरहिरो
पाच वर्षे रोज मृत्यूशी आणि भीतीशी लढा दिल्यानंतर शेवटी ती सुवर्ण पहाट उगवली. डॉक्टरांनी अयानला पूर्णपणे कॅन्सरमुक्त घोषित केलं. या संपूर्ण प्रवासाने इम्रान हाश्मीला माणूस म्हणून आतून पूर्ण बदलून टाकलं होतं. आपल्या ३ वर्षांच्या मुलाची ही जिद्द आणि संपूर्ण कुटुंबाचा हा लढा त्याने पुढे बिलाल सिद्दीकी यांच्यासोबत मिळून एका पुस्तकात मांडला. त्या पुस्तकाचं नाव होतं, 'द किस ऑफ लाईफ: हाऊ अ सुपरहिरो अँड माय सन डिफीटेड कॅन्सर'.
 

कॅन्सरशी लढणारा तो चिमुकला अयान त्याच्या बापासाठी खरा सुपरहिरो ठरला होता. आज वर्षानुवर्षे उलटून गेल्यानंतरही तो काळ आठवला की इम्रानचे डोळे भरून येतात. त्याचे हे यश एका बाजूला आणि पाच वर्षे कॅन्सरशी लढून सहीसलामत बाहेर पडलेला आपला मुलगा दुसऱ्या बाजूला. 

नियती कितीही मोठा धक्का देवो, जिद्द आणि प्रेमाच्या जोरावर कोणत्याही संकटावर मात करता येते, हीच 'एक कहाणी' आजही लाखो लोकांना जगण्याची नवी उम्मीद देते.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter