भक्ती चाळक
दिवाळीच्या रात्री आगीत सापडलेल्या तीन दुकानांसह मंदिर परिसर वाचवण्यासाठी ताहिर हुसेन शेख यांनी जीवाची बाजी लावली. घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर ते ‘डोंगरीचा अब्दुल’ म्हणून प्रसिद्ध झाले. त्यांच्या या कामगिरीचा अनेक मुस्लिम संघटना, स्थानिक समाजसेवक आणि राजकीय नेत्यांनी सन्मान केला.
नेमके काय घडले?
दिवाळीची रात्र होती. रस्त्यांवर रोषणाई, घराघरांत दिव्यांचा उजेड आणि फटाक्यांचा आवाज सुरू होता. तेवढ्यात मुंबईच्या डोंगरी भागातील नूर बाग परिसरात रात्रीच्या सुमारास आगीने रौद्र रूप धारण केले. आगीच्या ज्वाळा वाढत होत्या. गॅस सिलिंडरचे स्फोट होत होते. दुकानांमधील सामान जळून खाक होत होते. काही जण घडणारा प्रकार पाहत होते, तर काही मोबाईलमध्ये व्हिडीओ टिपत होते. अशा वेळी गर्दीतला एक तरुण पुढे आला. त्याने फायर ब्रिगेडचा पाइप हातात घेतला आणि थेट छतावर चढून आग विझवण्याचा प्रयत्न सुरू केला. हा माणूस होता ताहिर शेख.
नूर बाग परिसरात राहणारे ३५ वर्षीय ताहिर एका सलूनमध्ये काम करतात. दिवाळीच्या त्या रात्री त्यांनी केलेल्या धाडसाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्यांची ओळख ‘डोंगरीचा अब्दुल’ अशी झाली. सुरुवातीला व्हिडीओत दिसणाऱ्या या तरुणाचे नावही अनेकांना माहीत नव्हते. मात्र त्याच्या कृतीने अनेकांचे लक्ष वेधून घेतले.
आगीचे रौद्ररूप
ताहिर सलूनमध्ये काम करत असताना अचानक आरडाओरडा सुरु झाला. त्यांनी बाहेर येऊन पाहिले, तर आगीने हळूहळू जोर धरायला सुरुवात केली होती. त्या दिवशी वाऱ्याचा वेगही जास्त होता. त्यामुळे आगीच्या ज्वाळा दुकानांमध्ये पसरू लागल्या. परिसरात गॅरेज, गारमेंट्स, शूज बनवण्याची दुकाने, रंगकाम आणि वेल्डिंगची दुकाने होती. काही दुकानांमध्ये केमिकल्स आणि गॅस सिलिंडरही होते.
घटनास्थळी लोकांची गर्दी जमली होती. काही जण व्हिडीओ काढत होते, तर दुकानांचे मालक आपले सामान वाचवण्यासाठी धडपडत होते. अनेकांच्या डोळ्यांसमोर आयुष्यभराची कमाई जळत होती. या परिस्थितीत ताहिर यांना लोकांचे दुःख पाहवत नव्हते. त्यांनी फायर ब्रिगेडचा पाइप घेतला आणि मदतीसाठी वर चढण्याचा निर्णय घेतला.
त्या प्रसंगाबद्दल ताहिर सांगतात, “त्या सगळ्या धावपळीत एका महिलेने मला बेटा म्हणून हाक मारली. तिचा आवाज माझ्या अम्मीसारखा वाटला. मनात आलं, आईनेच आवाज दिलाय. मग रसूल अल्लाह यांचं नाव घेऊन वर चढलो. पुढे काय होईल, ते पाहू असं ठरवलं.”
धाडसाने घेतला छतावर चढण्याचा निर्णय
आगीच्या ठिकाणी गॅस सिलिंडरचे स्फोट होत होते. काही सिलिंडर सरळ वरच्या दिशेने फुटण्याऐवजी आडवे फुटत होते. त्यामुळे आगीचा भडका अधिक वेगाने पसरत होता. अशा परिस्थितीत दुकानांमध्ये अडकलेले सामान काढण्यासाठी काही लोक वर जाण्याचा प्रयत्न करत होते. ताहिर यांनी त्यांना रोखले. कारण त्या वेळी आत जाणे सोपे नव्हते.
फायर ब्रिगेडच्या जवानांकडे आवश्यक सुरक्षा साधने होती; मात्र ताहिर आणि त्यांच्या सोबत मदत करणाऱ्या लोकांकडे कोणतीही सुरक्षा साधने नव्हती. तरीही ते पाइप ओढत आगीच्या दिशेने गेले. त्यांच्या प्रयत्नांमुळे तीन दुकाने वाचली. मंदिराजवळचा परिसरही आगीपासून सुरक्षित राहिला.
त्या वेळी अल्लाने संधी दिली आणि आपल्या हातून मदत घडली असल्याचं ताहीर सांगतात. ते म्हणतात, “माझ्या हातून थोडीफार आग विझली तरी ते चांगलंच, असा विचार केला. अल्लाने मला वर चढण्याची संधी दिली. अल्लाच्या शुक्राने तीन दुकानं वाचली आणि मंदिराजवळचा परिसरही सुरक्षित राहिला.”
या घटनेत मंदिराचा परिसर वाचवण्यासाठीही ताहिर यांनी पूर्ण प्रयत्न केले आणि त्यांच्या प्रयत्नांना यश देखील आले. मदतीसाठी पुढे जाताना समोर कोणाचे घर आहे, दुकान आहे किंवा धार्मिक स्थळ आहे, याचा त्यांनी विचार केला नाही. संकटात सापडलेले लोक आणि त्यांची मालमत्ता वाचवणे एवढेच त्यांच्या डोक्यात होते.
आगीत अनेकांचे मोठे नुकसान झाले. दुकानांमधील सामान, पैसे आणि मोबाईल जळून गेले. काही कुटुंबांसमोर खाण्यापिण्याचा प्रश्न निर्माण झाला. ताहिर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अशा लोकांनाही मदत केली. फायर ब्रिगेडचे जवान आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सतत काम करत होते. त्यांच्यासाठी ग्लुकोज, एनर्जी ड्रिंक्स आणि ज्यूसची व्यवस्था करण्यात आली. पाइप ओढण्यापासून ते आगीच्या ठिकाणी पोहोचण्यापर्यंत ताहिर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जवानांना साथ दिली.
या सगळ्या कामात परिसरातील इतर लोकांचाही सहभाग होता. मदत करताना अनेकांनी स्वतःचा जीव धोक्यात घातला. ताहिर म्हणतात, “अशा वेळी प्रत्येकाने पुढे येणे गरजेचे होते. मात्र काही लोक सुरक्षित अंतरावरून केवळ घटना पाहत होते. आपापल्या सुरक्षेची काळजी घेईन मदतीसाठी अधिक लोकांनी प्रयत्न केले असते, तर नुकसान कमी झाले असते.”
ताहिर यांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. परंतु दुसऱ्यांच्या अडचणीच्या वेळी शक्य ती मदत करण्याचा त्यांचा स्वभाव आहे. स्वतःकडे फार पैसे नसले, तरी मदतीची तयारी असल्याचे ते सांगतात. ताहीर म्हणतात, “मी पैशाने श्रीमंत नाही, पण मनाने खूप श्रीमंत आहे. माझ्याकडून एखाद्याचं काम होण्यासारखं असेल, तर मी नक्की मदत करतो. प्रत्येकाच्या अडचणीच्या वेळी शक्य तेवढं करावं, असं मला वाटतं.”
व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल
या घटनेनंतर ताहिर यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. त्यांचे नाव माहीत नसल्याने सुरुवातीला लोक त्यांना ‘डोंगरीचा अब्दुल’ म्हणू लागले. त्यानंतर अनेकांनी त्यांच्याशी संपर्क साधला. विविध मुस्लिम संघटनांनी त्यांचा सत्कार केला. स्थानिक समाजसेवक, राजकीय नेते आणि स्वयंसेवी संस्थांनीही त्यांना बोलावून शाल, सन्मानचिन्ह, पदक आणि ट्रॉफी देऊन गौरवले.
या घटनेतून लोकांना काय संदेश द्यायचा आहे, असे विचारल्यावर ताहिर यांनी धर्म-जातीच्या पलीकडे जाऊन माणसाला मदत करण्याचे आवाहन केले. ते म्हणतात, “इस्लाममध्ये दुसऱ्याचे घर आनंदाने नांदताना पाहून आनंदी व्हावे, त्याचे संसार उद्ध्वस्त करू नयेत, अशी शिकवण दिलीये. मी तिथे हिंदू पाहिला नाही, मुसलमान पाहिला नाही. मी माणूस पाहिला आणि मदतीला धावलो. मनुष्यसेवा हीच ईश्वरसेवा आहे.”