नवीन बीएस-सिक्स वाहनांसाठी पीयूसी मुदतीत वाढ; तीन वर्षांतून एकदा नूतनीकरण

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 20 m ago
प्रातिनिधिक इमेज
प्रातिनिधिक इमेज

 

नवी दिल्ली

प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्राच्या (PUC) वैधता कालावधीत सरकारने बदल केला आहे. नवीन बीएस-सिक्स (BS-VI) वाहनांना नूतनीकरणासाठी अधिक काळ मिळेल. जुन्या वाहनांसाठी मात्र कमी वैधता कायम ठेवली आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने १३ नोव्हेंबर रोजी अधिसूचना काढून नवे नियम जाहीर केले.

नव्या नियमांनुसार, सहा वर्षांपर्यंत जुन्या बीएस-सिक्स खाजगी वाहनांना तीन वर्षांतून एकदा पीयूसी प्रमाणपत्र घ्यावे लागेल. सहा वर्षांपेक्षा अधिक पण दहा वर्षांपर्यंत वय असलेल्या वाहनांना दरवर्षी नूतनीकरण करावे लागेल. दहा वर्षांपेक्षा जुन्या बीएस-सिक्स खाजगी वाहनांना दर सहा महिन्यांनी प्रमाणपत्राचे नूतनीकरण करणे आवश्यक राहील.

मालवाहू आणि जुन्या वाहनांसाठी वेळापत्रक

बीएस-सिक्स मालवाहू वाहनांसाठीही सुधारित वेळापत्रकात अधिक कालावधी दिला आहे. सहा वर्षांपर्यंत जुन्या वाहनांना दोन वर्षांतून एकदा नूतनीकरण करावे लागेल. सहा ते दहा वर्षे वयाच्या वाहनांना दरवर्षी नूतनीकरण लागेल. दहा वर्षांपेक्षा जुन्या मालवाहू वाहनांना दर सहा महिन्यांनी नूतनीकरण सुरूच राहील.

बीएस-वन, बीएस-टू आणि बीएस-थ्री उत्सर्जन निकषांच्या वाहनांसाठी पीयूसी प्रमाणपत्र तीन महिने वैध राहील. बीएस-फोर निकषांच्या वाहनांसाठी सहा महिने वैधता राहील. मोटार वाहन कायदा, १९८८ अंतर्गत केंद्रीय मोटार वाहन (सोळावी सुधारणा) नियम, २०२६ द्वारे हे बदल जाहीर केले. राजपत्रात प्रसिद्ध होताच ते लागू झाले.

नूतनीकरण तारखेचे नियम

नूतनीकरण केलेल्या प्रमाणपत्राची प्रभावी तारीखही सुधारित नियमांत स्पष्ट केली आहे. प्रमाणपत्राची मुदत संपण्यापूर्वीच्या १० दिवसांत नूतनीकरण केल्यास, आधीच्या प्रमाणपत्राच्या समाप्ती तारखेपासून नवे प्रमाणपत्र लागू होईल. मुदत संपल्यानंतर नूतनीकरण केल्यास, नूतनीकरणाच्या तारखेपासून नवे प्रमाणपत्र प्रभावी ठरेल.

नवे नियम लागू होण्यापूर्वी दिलेल्या प्रमाणपत्रांसाठी सुधारित वेळापत्रक पहिल्या नूतनीकरणापासून लागू होईल.