वॉशिंग्टन
अमेरिकेत परदेशी कामगारांसाठी रोजगार आधारित ग्रीन कार्डचे नियम अधिक कडक करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. फिजिकल थेरपिस्ट आणि परिचारिकांपासून ते उच्च कुशल व्यावसायिकांपर्यंत सर्व पदांसाठी अमेरिकी नागरिकांना भरतीत प्राधान्य मिळावे, हा यामागचा उद्देश आहे. अमेरिकेच्या कामगार विभागाने मंगळवारी 'प्रोग्राम इलेक्ट्रॉनिक रिव्ह्यू मॅनेजमेंट' (PERM) इमिग्रंट व्हिसा प्रक्रियेअंतर्गत लेबर मार्केट टेस्ट आधुनिक करण्यासाठी नवा नियम प्रस्तावित केला. गेल्या २० वर्षांतील या नियमांमधील हा पहिला मोठा बदल आहे.
प्रस्तावित बदलांनुसार, नियोक्त्यांना नोकरीच्या संधी परदेशी कामगारांसाठी अनुकूल पद्धतीने तयार करण्यास बंदी राहील. भरती करताना समान संधी उपलब्ध करून देण्यासाठी नियोक्त्यांना जाहिरातीसाठी तेच मार्ग आणि पद्धती वापराव्या लागतील. पारंपरिक छापील जाहिरातींऐवजी कंपनीची वेबसाइट, जॉब पोर्टल, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, जॉब फेअर्स आणि कॅम्पस भरतीद्वारे ऑनलाइन भरती करण्यावर या प्रस्तावात भर दिला आहे.
रिक्त पदांच्या जाहिरातीचा किमान कालावधी सध्याच्या ३० दिवसांवरून ९० कॅलेंडर दिवसांपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव आहे. पात्र अमेरिकी कामगारांची नेमणूक करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केल्याचे पुरावे नियोक्त्यांना द्यावे लागतील. कामगार सचिव कीथ सोंडरलिंग म्हणाले, "उच्च कुशल आणि चांगल्या पगाराच्या नोकऱ्यांमध्ये परदेशी कामगारांपेक्षा अमेरिकी कामगारांना पहिले स्थान मिळावे, यासाठी हा प्रस्तावित बदल आहे."
काही व्यवसायांसाठी वैधानिक लेबर मार्केट टेस्टमधून मिळणारी प्रशासकीय सूट रद्द करण्याचाही विभागाचा प्रस्ताव आहे. सुधारित चौकटीनुसार, फिजिकल थेरपिस्ट, परिचारिका तसेच विज्ञान किंवा कलेतील असाधारण कौशल्याची आवश्यकता असलेल्या पदांसाठी भरती करताना पात्र अमेरिकी उमेदवारांचा विचार करावा लागेल.
नोकरीवरून कमी केलेल्या अमेरिकी कामगारांचे संरक्षण अधिक मजबूत करण्याचा प्रयत्नही या प्रस्तावात केला आहे. लेबर सर्टिफिकेशन आणि इमिग्रंट पिटीशन प्रक्रियेदरम्यान नियोक्त्यांना पात्र आणि कपात झालेल्या कामगारांचा विचार सुरू ठेवावा लागेल. मागील दोन वर्षांत त्याच किंवा तत्सम पदांवरून अमेरिकी कामगारांना कामावरून कमी केलेल्या काही नियोक्त्यांना कायमस्वरूपी लेबर सर्टिफिकेशनसाठी अर्ज करण्यास बंदी घालण्यात येईल.
परदेशी नागरिकांना कायमस्वरूपी वास्तव्यासाठी प्रायोजकत्व देऊ इच्छिणाऱ्या बहुतांश अमेरिकी नियोक्त्यांसाठी पीईआरएम लेबर सर्टिफिकेशन ही पहिली पायरी आहे. सध्याच्या प्रक्रियेनुसार, त्या पदासाठी सक्षम, इच्छुक, पात्र आणि उपलब्ध अमेरिकी कामगाराने अर्ज केलेला नाही, हे नियोक्त्यांना सिद्ध करावे लागते. सद्यस्थितीतील नियम आजच्या भरती पद्धतींशी जुळत नाहीत आणि काही नियोक्ते नियमित पदांपेक्षा प्रायोजित पदांसाठी वेगळी भरती प्रक्रिया वापरतात, असे कामगार विभागाने म्हटले आहे.