मॅनिला
फिलिपिन्समधील तीन दिवसीय दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी मॅनिला येथील देशातील सर्वात जुन्या गुरुद्वाराला भेट दिली. या ऐतिहासिक स्थळाच्या पुनर्विकासाच्या पायाभरणी सोहळ्यात त्यांनी सहभाग घेत पूजा-अर्चा केली.
मॅनिला येथील शेकडो वर्षे जुन्या गुरुद्वारा खालसा दिवाणला भेट देऊन अतिशय धन्य वाटल्याची भावना पंतप्रधान मोदींनी व्यक्त केली. परराष्ट्र मंत्रालयाने सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, गेल्या एका शतकाहून अधिक काळ हा गुरुद्वारा भारत आणि फिलिपिन्स यांच्यातील सांस्कृतिक आणि लोक-लोकांमधील दृढ संबंधांचे साक्षीदार म्हणून उभा आहे.
गुरूंच्या शिकवणीपासून प्रेरणा घेऊन जगभरात शीख समुदायाने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे, असे गौरवोद्गार पंतप्रधानांनी काढले. मानवासह संपूर्ण वसुंधरेची सेवा करण्यात हा समुदाय नेहमीच अग्रेसर राहिला असल्याचे त्यांनी नमूद केले.
दक्षिण-पूर्व आणि पूर्व आशियाई देशांसोबतचे संबंध अधिक मजबूत करण्याच्या तसेच क्षेत्रीय व जागतिक आव्हानांवर चर्चा करण्याच्या उद्देशाने पंतप्रधान मोदी सोमवारी फिलिपिन्सला पोहोचले आहेत. तिथे ते २३ व्या आसियान-भारत शिखर परिषद आणि २१ व्या पूर्व आशिया शिखर परिषदेत सहभागी होत आहेत.