समीर शेख, पुणे
दहशतवादविरोधी कारवायांमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी आणि संयुक्त नेतृत्व सुनिश्चित करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने राज्याचे विशेष कमांडो पथक असलेल्या 'फोर्स वन'ला दहशतवादविरोधी पथकाच्या (ATS) प्रशासकीय आणि कार्यकारी नियंत्रणाखाली आणले आहे. गृह विभागाने सोमवारी जारी केलेल्या शासन निर्णयानुसार (GR) हा बदल करण्यात आला आहे.
मुंबईवर झालेल्या २६ नोव्हेंबर २००८ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर उच्च धोक्याच्या दहशतवादी घटनांना जलद आणि प्रभावीपणे प्रतिसाद देण्यासाठी 'फोर्स वन'ची एक विशेष, आधुनिक आणि शस्त्रसज्ज कमांडो फोर्स म्हणून स्थापना करण्यात आली होती. नव्या निर्णयानुसार, राज्य सुरक्षा दलाचा भाग असलेल्या 'फोर्स वन'चे अस्तित्वात असलेले युनिट, कर्मचारी, आर्थिक तरतुदी आणि सेवा शर्तींमध्ये कोणताही बदल केला जाणार नाही.
दहशतवादी कारवायांना आळा घालणे, गुप्त माहिती गोळा करणे आणि हल्ल्यांना प्रतिसादात्मक कारवाई करणे या दोन्ही यंत्रणांची जबाबदारी परस्परपूरक आहे. वेगवेगळ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली दोन्ही स्वतंत्र यंत्रणा काम करत असल्याने एकात्मिक नेतृत्व आणि समन्वयात व्यावहारिक अडचणी येऊ शकत होत्या. याच पार्श्वभूमीवर जलद निर्णय प्रक्रिया आणि संसाधनांचा कार्यक्षम वापर व्हावा, यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून, राज्याच्या पोलीस महासंचालकांना यासंदर्भातील प्रशासकीय आदेश त्वरित जारी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.