वधू-वर सूचक केंद्रांच्या नावाखाली सर्वसामान्य आणि गरजू कुटुंबांची होणारी आर्थिक लूट थांबवण्यासाठी आणि समाजातील गोरगरिबांना आधार देण्यासाठी कार्यरत असलेल्या ‘केजीएन खिदमत फाउंडेशन’च्या वतीने येत्या २२ नोव्हेंबरला पुण्यातील कोंढवा येथे एका भव्य वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. संस्थेचे संस्थापक मुबारक शेख यांच्या पुढाकारातून हा सामाजिक आणि सेवाभावी उपक्रम राबवला जात आहे.
लग्न जुळवण्याची संपूर्ण प्रक्रिया पूर्णपणे मोफत
सध्याच्या काळात मुला-मुलींची लग्ने जमवणे हे मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबांसाठी मोठे आर्थिक आव्हान बनले आहे. हीच गरज ओळखून मुबारक शेख यांनी ‘केजीएन खिदमत फाउंडेशन’च्या माध्यमातून हजारो मुला-मुलींचे बायोडाटा पूर्णपणे मोफत उपलब्ध करून दिले आहेत.
या संस्थेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे नोंदणी करण्यासाठी किंवा स्थळ पाहण्यासाठी येथे एक रुपयाही शुल्क आकारले जात नाही. संस्थेने केवळ मुस्लिम समाजाचीच नाही, तर सर्वधर्मीय समभाव जपत अनेक हिंदू जोडप्यांचीही लग्ने मोफत जुळवून देत सामाजिक बांधिलकी जपली आहे. सध्या हडपसर, पिंपरी, कोंढवा, शिरवळ आणि जेजुरी अशा पाच ठिकाणी संस्थेची कार्यालये अखंडपणे सेवा देत आहेत.
आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग
या मेळाव्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे याठिकाणी दोन बाजूला मोठ्या स्क्रीन्स लावल्या जातात. त्यावरून वधू आणि वरांचे परिचय दिले जातात. प्रत्येक बायोडेटाला एक कोड दिलेला असतो आणि मग त्यावरून पसंती कळवली जाते.
मेळाव्याचे स्वरूप आणि वेळ
वर्षाच्या अखेरीस आयोजित केला जाणारा हा वधू-वर मेळावा हजारो कुटुंबांसाठी मोठा आधार ठरतो. या मेळाव्यात अविवाहित, घटस्फोटित, तसेच उच्चशिक्षित आणि कमी शिकलेल्या मुला-मुलींना व त्यांच्या पालकांना समोरासमोर बसून योग्य जोडीदार निवडण्याची संधी मिळणार आहे.
तारीख : रविवार, २२ नोव्हेंबर २०२६
वेळ : सकाळी १०:०० ते सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत
स्थळ : ईगल लॉन्स, खडीमशीन चौकाजवळ, कोंढवा, पुणे.
सहभागी होणाऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना
या वधू-वर मेळाव्यात सहभागी होण्यासाठी येणाऱ्या इच्छुक मुला-मुलींनी आणि पालकांनी येताना बायोडाटासोबत १ पोस्टकार्ड साईज फोटो आणि आधारकार्डची (पुढील व मागील बाजूची) १ झेरॉक्स प्रत सोबत आणणे आवश्यक आहे.
पुणे आणि परिसरातील जास्तीत जास्त कुटुंबांनी या मेळाव्याला उपस्थित राहून आपल्या पाल्यांचे लग्न जमवण्याच्या या पवित्र कार्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.
‘केजीएन’चे कार्य
‘केजीएन खिदमत फाउंडेशन’ने समाजातील प्रत्येक वंचित घटकापर्यंत मदत पोहोचवण्याचा विडा उचलला आहे. या संस्थेच्या माध्यमातून इतर अनेक उपक्रमही राबवले जातात.
समुपदेशन : समाजात लग्ने उशिरा होणे किंवा लग्नानंतर घटस्फोटांचे प्रमाण वाढणे या गंभीर समस्यांवर संस्थेमार्फत समुपदेशन केले जाते.
सामूहिक विवाह : गरीब कुटुंबांचा खर्च वाचवण्यासाठी सामुदायिक विवाहांचे (इस्तेमाई शादी) आयोजन केले जाते.
आरोग्य आणि शिक्षणासाठी मदत : गंभीर आजारांनी ग्रस्त गरीब रुग्णांना रुग्णालयात उपचारासाठी आर्थिक मदत, तसेच शिक्षणात हुशार असणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत पुरवली जाते.
जकात आणि फित्राचा सदुपयोग : जकात, फित्रा आणि सदका जमा करून त्यातून विधवा, परित्यक्ता, अनाथ (यतीम) आणि दिव्यांग व्यक्तींना थेट आर्थिक आधार दिला जातो, तसेच रमजान महिन्यात गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप केले जाते.