जळगावच्या सावदा येथे माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे यांच्या निवासस्थानी दाऊदी बोहरा धर्मगुरू डॉ. सैयदना मुफद्दल सैफुद्दीन यांची सदिच्छा भेट
भक्ती चाळक
दाऊदी बोहरा समाजाचे प्रमुख डॉ. सैयदना मुफद्दल सैफुद्दीन हे महाराष्ट्र दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी अनेक ठिकाणी जात समाजबांधवांची भेट घेतली. जळगाव शहरातही त्यांनी बोहरा समाजातील काही कुटुंबांच्या घरी भेटी दिल्या. त्यांच्या या दौऱ्यातून सामाजिक सौहार्दाचे दर्शन घडले. .
जळगावातील सावदा येथील माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे यांच्या निवासस्थानी डॉ. सैयदना यांनी अचानक भेट दिली. विशेष म्हणजे, या भेटीचं कोणतंही पूर्वनियोजन नव्हतं. राजेश वानखेडे आणि त्यांच्या मित्रपरिवाराने संभाजी मित्र मंडळाच्या वतीने सैयदना यांना भेटीची विनंती केली होती. ही विनंती मान्य करत त्यांनी ऐनवेळी वानखेडे यांच्या घरी जाण्याचं ठरवलं.
धर्मगुरू आपल्या घरी येणार, ही बातमी समजताच संपूर्ण कुटुंबीयांची धावपळ सुरू झाली. या अनपेक्षित आगमनाने वानखेडे कुटुंबीय भारावून गेले. नगरसेविका सिम्रन राजेश वानखेडे यांनीही या भेटीचा आनंद व्यक्त केला. धर्मगुरूंच्या आगमनाने आपल्या घराला लाभलेलं भाग्य आणि हा क्षण कायम स्मरणात राहील, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
त्या म्हणाल्या, “आमच्या निवासस्थानी परमपूज्य धर्मगुरू डॉ. सैयदना मुफद्दल सैफुद्दीन साहेब (TUS) यांचं आगमन झालं, हा आमच्यासाठी अत्यंत भाग्याचा आणि अविस्मरणीय क्षण आहे. त्यांच्या पवित्र उपस्थितीने आमचं घर धन्य झालं. हा अनमोल क्षण आम्ही कायम स्मरणात ठेवू.”
डॉ. सैयदना यांच्या भेटीला भाविकांची मांदियाळी
डॉ. सैयदना यांच्या आगमनाची बातमी शहरात पसरताच नागरिकांनी त्यांच्या भेटीसाठी गर्दी केली. विशेष म्हणजे, या वेळी बोहरा समाजासोबतच सावदा शहरातील विविध जाती-धर्मांतील नागरिक आणि परिसरातील लोकही मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या भेटीचं महत्त्व सांगताना माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे यांनी सावदा शहरवासीयांच्या भावनाही व्यक्त केल्या. ते म्हणाले, “डॉ. सैयदना मुफद्दल सैफुद्दीन साहेबांचा सावदा शहरातील दौरा आमच्यासाठी मोठी पर्वणी होती. मी तर या दिवसाला शहराच्या इतिहासातील महत्त्वाचा क्षण म्हणेन. गेल्या आठवड्यात दिवाळी झाली, पण साहेबांच्या आगमनाने पुन्हा एकदा दिवाळी आल्याचा आनंद सावदेकरांनी अनुभवला.”
धर्मगुरूंकडून बंधुभावाचा संदेश
दाऊदी बोहरा समाजाची धार्मिक परंपरा आणि समाजासाठी सुरू असलेले विविध उपक्रम यांचाही राजेश वानखेडे यांनी उल्लेख केला. सैयदना बुरहानुद्दीन साहेबांपासून सुरू असलेली समाजसेवेची आणि सर्वधर्मीयांमध्ये बंधुभाव जपण्याची परंपरा सध्याचे धर्मगुरूडॉ. सैयदना मुफद्दल सैफुद्दीन हे पुढे नेत असल्याचं त्यांनी सांगितलं.
याविषयी बोलताना ते म्हणाले, “हा समाज गेल्या अनेक शतकांपासून आपल्या धर्माचं आचरण आणि परंपरा जपत आला आहे. सर्व धर्मांमध्ये बंधुभाव आणि समानतेचा संदेश देण्याचं काम या समाजाच्या धर्मगुरूंकडून सातत्याने सुरू आहे. सय्यदना बुरहानुद्दीन साहेबांपासून सुरू असलेली ही परंपरा आज मुफद्दल सैफुद्दीन साहेब पुढे नेत आहेत.”
समाजातील गोरगरिबांच्या मदतीसाठी आणि लोकांच्या भल्यासाठी धर्मगुरूंच्या मार्गदर्शनाखाली अनेक उपक्रम राबवले जात असल्याचंही त्यांनी सांगितलं. ते म्हणाले, “समाजाच्या हितासाठी, गोरगरिबांच्या कल्याणासाठी आणि लोकांचं जीवन अधिक चांगलं व्हावं यासाठी त्यांच्या माध्यमातून अनेक चांगले उपक्रम राबवले जातात. अशा कामांमधून समाजाप्रती असलेली बांधिलकी दिसून येते.”