नवी दिल्ली
भारतात इंस्टाग्रामच्या शिफारस प्रणालीमध्ये (Recommendation Systems) महत्त्वपूर्ण सुधारणा करण्यात आल्या आहेत. लैंगिकदृष्ट्या संवेदशील आणि हिंसक कंटेटचा प्रसार रोखण्यासाठी मेटा प्लॅटफॉर्मने अधिक प्रगत आर्टिफिशियल इंटेलिजन्स मॉडेल्स तैनात केली आहेत, जेणेकरून अवांछित पोस्ट वापरकर्त्यांपर्यंत पोहोचण्यापूर्वीच फिल्टर केल्या जातील, अशी घोषणा कंपनीने मंगळवारी केली.
इन्स्टाग्रामच्या या नव्या उपायांनुसार, वापरकर्ते फॉलो करत नसलेल्या खात्यांवरून शिफारस केल्या जाणाऱ्या कंटेटवर लक्ष केंद्रित केले जाईल. यावर सरसकट बंदी घालण्याऐवजी अल्गोरिदमच्या माध्यमातून तो नियंत्रित केला जाणार आहे. गेल्या १० ऑक्टोबर रोजी इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने मेटाला एक सल्लागार जारी करत रँकिंग आणि शिफारस प्रणालीचे पुनरावलोकन करण्याचे निर्देश दिले होते, जेणेकरून दिशाभूल करणारा किंवा संदर्भाबाहेरचा कंटेट मोठ्या प्रमाणावर प्रसारित होणार नाही याची काळजी घेता येईल. मात्र, हे बदल सरकारी सल्ल्याशी जोडलेले आहेत का, याबाबत मेटाने स्पष्ट केलेले नाही.
गेल्या वर्षभरात इन्स्टाग्रामने वापरकर्त्यांच्या फीड, रील्स आणि एक्स्प्लोर पेजवर नको असलेल्या कंटेटच्या विरोधात सुरक्षा वाढवली आहे. नवीन अपग्रेडमुळे, वापरकर्त्यांच्या तक्रारींची प्रतीक्षा न करता यंत्रणा स्वतःहून आक्षेपार्ह कंटेट शोधून तो मर्यादित करू शकते. या बदलांमुळे मागील वर्षाच्या तुलनेत शिफारस केलेल्या कंटेटबाबत वापरकर्त्यांचे रिपोर्ट करण्याचे प्रमाण निम्मे झाले आहे, असा दावा मेटाने केला आहे. तसेच, किशोरवयीन मुलांसाठी 'टीन अकाउंट्स' अंतर्गत स्वयंचलित सुरक्षितता नियम लागू करण्यात आले आहेत.