नवी दिल्ली
देशातील मतदारयाद्यांच्या विशेष फेररचना (SIR) प्रकरणादरम्यान मोठ्या प्रमाणावर नावे वगळण्यात आल्याचा आरोप करणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाने आगामी ९ डिसेंबर रोजी सुनावणी घेण्याचे जाहीर केले आहे. यामध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी आणि INDIA आघाडीच्या इतर नेत्यांच्या याचिकांचाही समावेश आहे.
सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी होणार होती, परंतु दुपारच्या सत्रात इतर प्रकरण सुरू असल्यामुळे ही सुनावणी तहकूब करण्यात आली. सरन्यायादीशांनी स्पष्ट केले की, याचिकेत उपस्थित करण्यात आलेल्या मुद्यांवर आणि विचारण्यात आलेल्या लेखी प्रश्नांवर (interrogatories) ९ डिसेंबर रोजी सुनावणी घेऊन योग्य तो निर्णय घेतला जाईल.
राहुल गांधी आणि इतर नेत्यांतर्फे बाजू मांडताना ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णय प्रक्रियेबाबत काही लेखी प्रश्न विचारण्याची परवानगी देण्याची मागणी केली. निवडणूक आयोगाने यापूर्वी आपल्या प्रतिज्ञापत्रात सर्व निर्णय एकमताने घेतल्याचे स्पष्ट केले होते, मात्र विरोधी नेत्यांनी या प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव असल्याचा दावा करत फेररचना प्रक्रियेवर आक्षेप घेतले आहेत.