वेलिंग्टन
भारतीय क्रिकेट संघाचे नेतृत्व करणे ही मोठी जबाबदारी मानली जात असली, तरी संघाचे कर्णधारपद भूषवताना आपल्यावर कोणत्याही प्रकारचा अपेक्षांचा भार किंवा दबाव नसतो, असे स्पष्ट मत युवा फलंदाज आणि भारताचा कर्णधार शुबमन गिल याने व्यक्त केले आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा यांसारख्या दिग्गज खेळाडूंच्या अनुभवातून आपण प्रेरणा घेत असल्याचे त्याने सांगितले.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील क्रीडा संबंधांना शंभर वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त वेलिंग्टन येथील भारतीय उच्च आयोगाद्वारे आयोजित एका विशेष कार्यक्रमात गिल बोलत होता. न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथम देखील त्याच्यासोबत उपस्थित होता. यावेळी दोन्ही कर्णधारांनी आगामी दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेवर आणि दोन्ही देशांमधील क्रीडा संबंधांवर संवाद साधला.
भारतातील क्रिकेटच्या क्रेझबद्दल आणि पंतप्रधानपदासारख्या आव्हानात्मक भूमिकेशी तुलना करत विचारले असता, "फार काही नाही, फक्त जिंकत राहायचे आहे," असे मिश्किल उत्तर देत गिलने उपस्थितांमध्ये हशा पिकवला. २७ वर्षीय फलंदाज कसोटी आणि एकदिवसीय संघाचे नेतृत्व करत आहे. पूर्वसूरींच्या वारशाबद्दल बोलताना तो म्हणाला की, मागील कर्णधारांनी आमच्यासाठी मार्ग सुकर केला असून आता त्यावर चालण्याची आमची बारी आहे.
विराट कोहली, रोहित शर्मा आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यासारखे जगभरात प्रचंड यश मिळवलेले अनुभवी खेळाडू संघात असणे हे आमचे भाग्य आहे, असे सांगत गिलने त्यांच्या अनुभवाचे महत्त्व अधोरेखित केले. दरम्यान, न्यूझीलंडचा दौरा हा खेळाडूंसाठी अत्यंत रिलॅक्स करणारा असून तिथे कॉफी पिणे आणि शांतपणे फिरणे आनंददायी असल्याचे त्याने आवर्जून सांगितले. न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथमनेही दोन्ही देशांमधील शतकी क्रीडा मैत्रीचा प्रवास हा अत्यंत खास असल्याचे नमूद केले.