लेटेंट मधल्या ‘सलमा दिवाणी’ पात्रावर उलटसुलट चर्चा का?

Story by  Bhakti Chalak | Published by  Bhakti Chalak • 4 h ago
'सलमा दिवाणी' पात्र साकारणारी भाग्यश्री तारके आणि कॉमेडीअन समय रैना
'सलमा दिवाणी' पात्र साकारणारी भाग्यश्री तारके आणि कॉमेडीअन समय रैना

 

भक्ती चाळक

समय रैनाच्या ‘India’s Got Latent Season 2’ या शोमध्ये एका महिलेने आपल्या खास अंदाजात प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं. डोक्यावर पदर अन् बोलण्यातला हैदराबादी लहेजा दाखवत ‘सलमा दिवाणी’ने रोजच्या जगण्यातल्या गंमतीजमतींवर मिश्कील टोमणे मारलेत. प्रत्यक्षात या पात्रामागे आहे अभिनेत्री भाग्यश्री तारके. 

भाग्यश्रीच्या या पात्राने सोशल मीडियावर चांगलीच चर्चा घडवून आणली. शोमध्ये मिळालेल्या एक लाख रुपयांच्या बक्षिसातील काही रक्कम नेपाळमधील गरजूंसाठी देण्याची इच्छाही तिने व्यक्त केली. मात्र, भाग्यश्रीची ओळख केवळ या एका कार्यक्रमापुरती मर्यादित नाही. ‘सलमा दिवाणी’ हे पात्र घेऊन ती देशभरात विविध कॉमेडी कार्यक्रम करत आहे.

विशेष म्हणजे, भाग्यश्री स्वतः हिंदू आहे. तरीही तिने एका मुस्लीम महिलेचं पात्र निवडलं, त्यासाठी दख्खनी भाषा, बोलण्याची ढब, घरातील वातावरण आणि स्त्रियांच्या रोजच्या जगण्यातील बारकावे समजून घेतले. तिच्या ‘सलमा दिवाणी’मधून प्रेक्षकांना हसू येतंय खरं पण त्या हसण्यामागे एका मुस्लीम स्त्रीचं रोजचं जगणं, तिची स्वप्नं, अपेक्षा, एकटेपणा आणि घरगुती आयुष्यातील कोंडीही जाणवतेय.

सलमा दिवाणीच्या घरात डोकावलंय का?
‘सलमा दिवाणी’ ही केवळ विनोदी व्यक्तिरेखा नाही. ती आपल्या घरातल्या रोजच्या गोंधळात अडकलेली, नवऱ्याच्या सवयींवर वैतागणारी, संसारातील अपेक्षांचा भार पेलणारी आणि स्वतःसाठी थोडासा विरंगुळा शोधणारी एक सामान्य स्त्री आहे. 

भाग्यश्री तारकेने लिहिलेलं, दिग्दर्शित केलेलं आणि स्वतः साकारलेलं ‘सलमा दिवाणी’ हे एकपात्री नाटक आहे. विवाह, एकटेपणा, कौटुंबिक अपेक्षा आणि स्वतःचं अस्तित्व शोधणारी स्त्री या नाटकाच्या केंद्रस्थानी आहे. सलमाच्या आयुष्यात फार मोठ्या घटना घडत नाहीत. तिच्या घरातील साध्यासुध्या प्रसंगांतूनच तिचं व्यक्तिमत्त्व उलगडत जातं. तिच्या गप्पांमध्ये विनोद आहे, काहीशा कुरबुरी आहेत आणि मनात दडलेली हळवी बाजूही आहे.

मुस्लीम स्त्रियांचं चित्रण म्हटलं की अनेकदा पडद्यावर ठरावीक प्रतिमाच समोर येते. बुरखा, धार्मिक रूढी, कौटुंबिक बंधनं किंवा एखादा गंभीर सामाजिक प्रश्न. मात्र सलमा दिवाणी हसते, चिडते, नवऱ्यावर रागावते, स्वतःच्या आयुष्याबद्दल बोलते आणि मनातलं मोकळं करते. ती इतर स्त्रियांप्रमाणे एक सामान्य स्त्री म्हणून प्रेक्षकांसमोर येते. हेच या पात्राचं वैशिष्ट्य आहे.

मुस्लीम स्त्रीचं जगणं रंगमंचावर येतंय...
भारतीय समाजात स्त्रियांच्या आयुष्याचं चित्रण करताना त्यांच्या धर्म, जात, वर्ग आणि सामाजिक परिस्थितीचा विचार होतो. मात्र मुस्लीम स्त्रियांच्या रोजच्या आयुष्याला साहित्य, नाटक आणि मनोरंजनविश्वात पुरेसं स्थान मिळालेलं दिसत नाही. त्यांचं जगणं, घरातील संवाद, नातेसंबंध, इच्छा-आकांक्षा आणि स्वतःची ओळख निर्माण करण्याची धडपड यांना मुख्य प्रवाहात फारशी जागा मिळत नाही. अशा पार्श्वभूमीवर ‘सलमा दिवाणी’सारखं पात्र समोर येणं महत्त्वाचं ठरत आहे.

मराठी रंगभूमीवर याच धाग्याला जोडणारं आणखी एक महत्त्वाचं नाटक म्हणजे ‘ए बिस्मिल्ला’. महाराष्ट्रातील आघाडीच्या लेखिका आणि युवा पत्रकार हिनाकौसर खान यांनी या नाटकाचं लेखन केलं आहे. प्रसिद्ध अभिनेत्री रसिका आगाशे यांनी नाटकाचं दिग्दर्शन आणि सादरीकरण केलं आहे. रसिका आगाशे या स्वतः हिंदू असून त्यांनी एका मुस्लीम स्त्रीचे पात्र संवेदनशीलतेने आणि चांगल्या पद्धतीने साकारले आहे. मुस्लीम स्त्रीचं जगणं, तिची घुसमट, कुटुंबातील स्थान, समाजाकडून तिच्याकडे पाहण्याची नजर आणि स्वतःच्या अभिव्यक्तीसाठी सुरू असलेली धडपड या नाटकातून मांडण्यात आली आहे.

‘ए बिस्मिल्ला’मध्ये एका मुस्लीम स्त्रीच्या आयुष्यातील प्रश्न थेट रंगमंचावर येतात. भारतीय समाजात आजही अनेक महिलांना चूल आणि मूल या चौकटीत बसवलं जातं. मुस्लीम समाजातील पुरुषप्रधान व्यवस्थेचाही महिलांच्या स्वातंत्र्यावर परिणाम होतो. अशा परिस्थितीत मुस्लीम स्त्रियांच्या मनातील भावना आणि त्यांचे अनुभव साहित्य-संस्कृतीत मांडण्याची गरज अधिक आहे. काही दिवसांपूर्वी ‘आवाज-द-व्हॉईस’नेही ‘ए बिस्मिल्ला’ या नाटकाची दखल घेतली होती.

या दोन्ही कलाकृतींमधून मुस्लीम स्त्रीचं जगणं रंगमंचावर आणण्याचा प्रयत्न झालेला दिसतो. ‘ए बिस्मिल्ला’च्या लेखिका हिनाकौसर खान या स्वतः मुस्लीम समाजातून येतात. त्यांच्या लेखनाला स्वतःच्या समाजातील अनुभवांची पार्श्वभूमी आहे. भाग्यश्री तारके मात्र हिंदू असूनही तिने मुस्लीम स्त्रीचं पात्र समजून घेण्याचा, त्यातील बारकावे टिपण्याचा आणि ते प्रामाणिकपणे साकारण्याचा प्रयत्न केला आहे. ही बाब विशेष लक्षवेधी आहे.
 
‘ए बिस्मिल्ला’च्या लेखिका हिनाकौसर खान यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, "माध्यमांमध्ये बहुतांशवेळा मुस्लीम पात्र व्हिलन म्हणून साकारले जाते तर स्त्रीयांना अत्यंत दयनीय म्हणून दाखवले जाते. सलमा या पात्राने ही खूप वेगळे काही केले नसले तरी तिला स्वतःच्या व्यवस्थांवर विनोद करायचं तरी ठाऊक आहे.अल्पशिक्षित असली तरी  ती शिक्षणाची स्थिती, कुटुंबाची स्थिती सांगत असताना सलमा सम काळाबाबत जागरूक आहे. सलाम म्हटल्याने कुणी घाबरलं नाही हा मर्म विनोद ती करते. स्वतःला एकच मूल आहे हे सांगते. एकटीने प्रवास करून आल्याचे पोचवते."
 

त्या पुढे म्हणतात, "नेहमी कुणाच्या तरी हवाल्याने येणारी स्त्री नसून स्वतंत्र आहे,अधोरेखित करते. कलाकार वास्तवाच्या पलीकडे नेण्याची ताकद ठेवतात तेव्हा ते भिन्न पात्रे हुबेहुब उमटवण्याची क्षमता देखील ठेवतात. तेव्हा त्यांना कशात तरी अडकवणे चूकच. आणि स्टिअरियोटाइप इमेजेस ब्रेक होणाऱ्या गोष्टींसाठी आपण खुले असायला हवे."

सलमा साकारल्यामुळे भाग्यश्रीला ट्रोल का व्हावं लागतंय?
भाग्यश्रीने सलमा दिवाणी साकारल्यानंतर तिचं कौतुक झालं, तिला मोठा प्रेक्षकवर्ग मिळाला. पण त्याचवेळी काही स्तरांतून तिच्यावर टीकाही झाली. हिंदू अभिनेत्रीने मुस्लीम स्त्रीचं पात्र का साकारावं, तिच्या बोलण्याची पद्धत आणि वेशभूषा अशी का असावी, अशा स्वरूपाचे आक्षेप घेतले गेले. हिंदू आणि मुस्लीम अशा दोन्ही समाजांतील काही घटकांकडून तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.

इथे एक प्रश्न विचारावासा वाटतो. एखाद्या कलाकाराने दुसऱ्या धर्मातील व्यक्तीचं पात्र साकारलं, तर त्यात गैर काय? कलाकाराने पडद्यावर किंवा रंगमंचावर साकारलेलं पात्र म्हणजे त्याची स्वतःची धार्मिक ओळख नसते. अभिनय करताना कलाकार अनेक समाजांतील, वेगवेगळ्या पार्श्वभूमीतील माणसांचं आयुष्य उभं करतो. मग मुस्लीम स्त्रीची भूमिका साकारताना हिंदू अभिनेत्रीने कोणती मर्यादा ओलांडली?

खरं तर आजच्या वातावरणात अशा पात्रांना विरोध करण्याऐवजी त्यांचं स्वागत होणं गरजेचं आहे. भारतात अनेकदा धार्मिक ओळख, सामाजिक दबाव आणि न्यूनगंडाच्या भीतीपोटी काही लोक आपली ओळख उघडपणे मांडण्यासही कचरतात. अशा काळात एका हिंदू अभिनेत्रीने मुस्लीम स्त्रीचं पात्र स्वीकारणं, तिच्या भाषेचा आणि जगण्याचा अभ्यास करणं, ते पात्र घेऊन देशभर फिरणं ही साधी गोष्ट नाही. यातून समाजातील अंतर कमी करण्याची संधी निर्माण होते.

विरोध कराल, तर उद्या सलमा साकारणार कोण?
या निमित्ताने मुस्लीम समाजातील काही घटकांना एक प्रश्न विचारावासा वाटतो. आपल्याच समाजातील स्त्रियांचं जगणं, त्यांचे प्रश्न आणि त्यांच्या भावना मुख्य प्रवाहात याव्यात, अशी आपली अपेक्षा असते. मात्र एखाद्या कलाकाराने ते जगणं रंगमंचावर आणलं, तर आपणच त्याला विरोध करणार असू, तर ही अपेक्षा पूर्ण होणार कशी?

आज भाग्यश्री तारके सलमा दिवाणी साकारतेय. उद्या एखादी दुसरी अभिनेत्री मुस्लीम स्त्रीचं पात्र साकारण्याची इच्छा व्यक्त करेल. मात्र सध्या दिसणाऱ्या विरोधामुळे तिच्या मनात भीती निर्माण झाली, तर ती अशी भूमिका स्वीकारेल का? कलाकारांना प्रत्येक पात्र साकारताना धार्मिक ओळखीचं प्रमाणपत्र द्यावं लागणार असेल, तर मनोरंजनविश्वात समाजातील विविध घटकांचं प्रतिनिधित्व वाढणार कसं?

मुस्लीम स्त्रियांचं चित्रण करताना चुकीचे संदर्भ, अवमानकारक विनोद किंवा एखाद्या समाजाची टिंगल होत असेल, तर त्यावर आक्षेप घेणं रास्त आहे. कोणत्याही समाजाच्या भावना दुखावण्याचा अधिकार कलाकाराला नाही. मात्र प्रत्येक विनोदाला, प्रत्येक व्यक्तिरेखेला धर्माच्या चष्म्यातून पाहणं आणि सरसकट विरोध करणंही योग्य नाही. टीका करायची असेल, तर ती पात्रातील आशयावर असावी. कलाकाराच्या धर्मावर किंवा त्याने निवडलेल्या भूमिकेवर नव्हे.

मराठी मनोरंजनविश्वाने दाखवलेला मार्ग
मराठी मनोरंजनविश्वात ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’सारख्या कार्यक्रमांनी विविध समाजांतील पात्रांना विनोदातून स्थान दिलं आहे. मुस्लीम पात्रंही तिथे सहजपणे वावरताना दिसतात. त्यांचं अस्तित्व केवळ सामाजिक प्रश्नांपुरतं मर्यादित राहत नाही. ती पात्रंही इतर पात्रांप्रमाणेच विनोद करतात, चुका करतात, भांडतात आणि प्रेक्षकांचं मनोरंजन करतात. अशा सादरीकरणातून समाजातील विविधता सहजपणे स्वीकारली जाते.

मनोरंजनविश्वात सामान्य माणसांचं प्रतिनिधित्व वाढवायचं असेल, तर कलाकारांना वेगवेगळ्या समाजांतील पात्रं साकारण्याचं स्वातंत्र्य मिळायला हवं. मुस्लीम स्त्रीचं पात्र मुस्लीम अभिनेत्रीनेच साकारावं, हिंदू स्त्रीचं पात्र हिंदू अभिनेत्रीनेच करावं, असा आग्रह धरला तर कलाविश्वाची व्याप्तीच कमी होईल. कलाकाराला पात्राच्या भावविश्वाशी जोडून घेण्याची संधी मिळाली पाहिजे.

सलमाला समजून घेण्याची गरज
भाग्यश्री तारकेच्या ‘सलमा दिवाणी’कडे केवळ विनोदी कार्यक्रम म्हणून पाहून चालणार नाही. या पात्राच्या माध्यमातून एका समाजातील सामान्य स्त्रीचं जगणं मोठ्या प्रेक्षकवर्गापर्यंत पोहोचत आहे. तिच्या घरातील गमतीजमतींवर हसताना प्रेक्षकांना मुस्लीम स्त्रीचं रोजचं आयुष्यही जवळून पाहता येतं. एखाद्या समाजाबद्दलची ओळख केवळ बातम्या, वाद आणि राजकीय चर्चांमधून तयार होत नाही. अशा कलाकृतीही ती घडवतात.

शेवटी प्रश्न एवढाच आहे, आपल्याला मुस्लीम स्त्रियांचं जगणं मुख्य प्रवाहात दिसावं असं वाटतं का? वाटत असेल, तर ते मांडणाऱ्या प्रत्येक कलाकाराचं स्वागत करायला हवं. पात्रात काही त्रुटी असतील, तर त्यावर चर्चा व्हावी, पण पात्र साकारण्याचाच अधिकार नाकारला जाऊ नये.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter