मुंबई
दिग्दर्शक नितीश तिवारी यांचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'रामायण: पार्ट १' बॉक्स ऑफिसवर नवे विक्रम प्रस्थापित करत आहे. अभिनेता रणबीर कपूर, साई पल्लवी आणि यश यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट दाक्षिणात्य राज्यांमध्ये (South India) लवकरच ३०० कोटी रुपयांच्या ग्रॉस कमाईचा टप्पा ओलांडण्याच्या तयारीत आहे. हा पल्ला गाठणारा 'धुरंधर २' नंतरचा हा दुसराच बॉलिवूड चित्रपट ठरणार आहे.
सॅनिक्लकच्या अहवालानुसार, 'रामायण' सिनेमाने रिलीज झाल्यानंतर पहिल्या ११ दिवसांत कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू आणि केरळ या पाच दक्षिण भारतीय राज्यांमधून मिळून २९७.३० कोटी रुपयांची ग्रॉस कमाई केली आहे. हा ऐतिहासिक टप्पा पार करण्यासाठी आता चित्रपटाला केवळ २.७० कोटी रुपयांची गरज असून, १२ व्या दिवशी हा आकडा पार होईल असा अंदाज वर्तवला जात आहे. केवळ अकराव्या दिवशी या मंचावरून सिनेमाने ३०.७५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. 'धुरंधर २'च्या तुलनेत 'रामायण'ने हा पल्ला अतिशय वेगाने गाठला आहे.
दक्षिण भारतातील कमाईमध्ये कर्नाटक राज्य आघाडीवर असून, तिथून सर्वाधिक १३४.६० कोटी रुपयांचे संकलन झाले आहे, जे या क्षेत्रातील एकूण कमाईच्या ४५ टक्क्यांहून अधिक आहे. याशिवाय आंध्र प्रदेश आणि तेलंगणातून ७१.९० कोटी, केरळमधून ४५.८० कोटी आणि तामिळनाडूतून ४५ कोटी रुपयांची कमाई झाली आहे. रामायणाची कथा प्रेक्षकांच्या परिचयाची असणे आणि भव्यदिव्य मांडणी यामुळे हिंदी भाषिक क्षेत्राबाहेरही या चित्रपटाला मोठा प्रतिसाद मिळत आहे.