आरिफुल इस्लाम/ जानिया (बरपेटा)
५ नोव्हेंबर रोजी शंभरहून अधिक देशांमध्ये प्रदर्शित झालेल्या बहुचर्चित 'रामायण: भाग १' या चित्रपटाचे आसामशी थेट नाते जोडले गेले आहे. तब्बल चार हजार कोटी रुपयांच्या या भव्य चित्रपटाच्या मालिकेने आसामच्या पारंपरिक वेत आणि बांबू हस्तकलेला जागतिक स्तरावर वेगळी ओळख मिळवून दिली आहे.
या चित्रपटातील वनवासाच्या दृश्यांमध्ये प्रभू रामाच्या भूमिकेत रणबीर कपूर, सीतेच्या भूमिकेत साई पल्लवी आणि लक्ष्मणाच्या भूमिकेत रवी दुबे यांनी वेताचे खास पोशाख आणि चिलखत परिधान केले आहे. पश्चिम आसाममधील बरपेटा जिल्ह्यातील जानिया भागातील बांगलीपारा गावचे कारागीर झैनल अबदिन, त्यांचे सहकारी नगेन बिस्वास आणि इतर कारागिरांनी हे पोशाख आणि चिलखत घडवले आहेत. यासोबतच पात्रांसाठी वेताच्या चपला आणि स्लिप-ऑनसुद्धा तयार केले गेले.

वनवासाच्या काळात राजेशाही वस्त्रे त्यागून निसर्गाला साजेसे साधे कपडे वापरले जातात. यासाठी चित्रपटाचे वेशभूषाकार अजय कुमार यांनी आसाममधील काही लोकांशी संपर्क साधला. स्वयंसेवी संस्था 'जानिया ग्राम उन्नयन परिषदे'चे प्रमुख पदाधिकारी अब्दुल मालेक यांच्या माध्यमातून अजय कुमार या भागात पोहोचले आणि त्यांनी कारागीर झैनल अबदिन यांची भेट घेतली.
'आवाज-द व्हॉईस'शी खास संवाद साधताना अबदिन यांनी हा प्रवास उलगडला. ते म्हणाले, "जानिया आंचलिक ग्राम उन्नयन परिषदेचे अब्दुल मालेक यांच्यामार्फत त्यांनी आमच्याशी संपर्क साधला. सुरुवातीला त्यांनी आम्हाला काही रेखाचित्रे आणि छायाचित्रे दाखवली. अशा वस्तू बनवता येतील का, अशी विचारणा त्यांनी केली. मी, नगेन बिस्वास आणि आमची टीम ग्राम उन्नयन कार्यालयात गेलो. तिथले डिझाइन पाहून आम्ही प्रयत्न करून पाहण्याचे ठरवले. नंतर चित्रपटासाठी काम करणारे वास्तुविशारद सागर श्रीधा ऊर्फ सागर माळी ग्राम उन्नयन कार्यालयात आले. त्यांनी माझी आणि नगेन बिस्वास यांची भेट घेऊन सर्व काम समजावून सांगितले. कोणतीही अडचण आल्यास आम्ही मदतीला आहोत आणि तुमच्यासोबत राहून काम करू, असा विश्वास त्यांनी दिला."

सुरुवातीला अजय कुमार यांनी जाड कागदावर आखून दिलेल्या नमुन्यावरून अबदिन आणि बिस्वास यांनी महिनाभरात वेताच्या चिलखताचा एक नमुना तयार केला. हा नमुना मुंबईला नेऊन राम आणि लक्ष्मणाची भूमिका करणाऱ्या कलाकारांवर तपासून पाहिला गेला. या चाचणीनंतर त्यात काही सुधारणांची गरज भासली. त्यानुसार अजय कुमार पुन्हा आसाममध्ये आले. त्यांनी अनेक दिवस अबदिन यांच्या कार्यशाळेत राहून चिलखताच्या बारीकसारीक गोष्टींकडे लक्ष दिले. हाणामारीच्या दृश्यांमध्ये कलाकारांना धावावे आणि उड्या माराव्या लागणार होत्या. त्यामुळे चिलखत वजनाने हलके, सुरक्षित आणि आरामदायी राहावे यासाठी अजय कुमार यांच्या सल्ल्याने वेताच्या कामात एका खास प्रकारचा रबर वापरला गेला. महिनाभराहून अधिक काळ वेत कापून, भिजवून आणि त्याला आवश्यक आकार देऊन हे सर्व पोशाख पूर्णपणे हाताने तयार केले गेले.

अबदिन पुढे सांगतात, "सुरुवातीला त्यांनी आम्हाला जाड कागदावर एक साचा तयार करून दिला होता. त्याच्या मापांनुसार आम्ही महिनाभरात चिलखताचा एक नमुना पूर्ण केला. त्यांनी तो मुंबईला नेऊन तपासून पाहिला. चाचणीनंतर चिलखत नीट बसत नसल्याचे आणि वेत थोडा कडक असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी काही बदल सुचवले. कडक वेताचे चिलखत घालायला आरामदायी वाटावे म्हणून आम्ही आतील बाजूने रबरचा वापर केला."
ही संपूर्ण प्रक्रिया कमालीच्या गुप्ततेत पार पडली. आपण वन विभागाच्या एखाद्या साध्या चित्रपटासाठी काम करत आहोत, असा अबदिन यांचा सुरुवातीला समज होता. या प्रकल्पाच्या भव्यतेची त्यांना अजिबात कल्पना नव्हती. एकदा त्यांचे सहकारी नगेन बिस्वास यांच्या मुलीने नकळत या चिलखताचा फोटो सोशल मीडियावर टाकला होता. अजय कुमार यांनी तात्काळ तो फोटो काढून टाकायला लावला आणि कडक गुप्तता पाळण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर या कारागिरांनी सावधगिरी बाळगत काम केले. तीन वर्षांच्या काळात त्यांनी मापानुसार तयार केलेले वेताचे ३० संच मुंबईला पाठवले.
या अनुभवाबद्दल अबदिन म्हणाले, "स्थानिक पातळीवर उगवणाऱ्या उत्तम दर्जाच्या देशी वेतापासून आम्ही हे चिलखत बनवले. आम्ही पुरवत असलेले चिलखत इतक्या भव्य चित्रपट प्रकल्पात वापरले जाणार आहे, याची आम्हाला पुसटशीही कल्पना नव्हती. सुरुवातीला हे वन विभागाच्या एखाद्या चित्रपटासाठी असावे, असे आम्हाला वाटले. अगदी शेवटच्या टप्प्यात आम्हाला समजले, आपण एका भव्य चित्रपटासाठी काम करत आहोत. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी चिलखताचे फोटो सोशल मीडियावर शेअर करणार नाही, असा करार आम्ही अजय कुमार आणि सागर यांच्यासोबत केला होता. चित्रपट येईपर्यंत आम्हाला याबद्दल कुठेही बोलायचे नव्हते."
.jpg)
हे यश वैयक्तिक नसून सामूहिक प्रयत्नांचे फळ असल्याचे अबदिन मानतात. या प्रकल्पावर नगेन बिस्वास, शाहिदुल इस्लाम, नंदलाल सरकार, रमेन दास आणि मिंटू दास यांच्यासह दहा ते पंधरा कारागिरांच्या टीमने अहोरात्र कष्ट घेतले. या साध्या ग्रामीण कारागिरांचे कौशल्य आज बॉलीवूडच्या मोठ्या पडद्यावर चमकत आहे.
'आवाज-द व्हॉईस'शी बोलताना कारागीर नगेन बिस्वास यांनी आनंद व्यक्त केला. ते म्हणाले, "आम्हाला प्रचंड आनंद झाला आहे. मी आणि झैनल गेल्या दहा वर्षांपासून एकत्र काम करत आहोत. आमच्यासोबत दहा जणांची टीम काम करत होती. आम्हाला नवीन गोष्टी बनवायला मनापासून आवडते आणि त्यातून समाधान मिळते. आम्ही दिवसरात्र मेहनत घेतली. वास्तुविशारद सागर यांनीही आमच्यासोबत कष्ट घेतले. ते इथे आमच्यासोबत बसून काम पाहायचे आणि त्यांच्या कल्पना समजावून सांगायचे. आम्ही काम सुरू केल्यापासून सागर यांनी संपूर्ण प्रक्रिया जवळून पाहिली. त्यांना या कलेत मनापासून रस होता आणि त्यामुळे आम्हाला प्रोत्साहन मिळाले."
उद्योजक अलकेश दास आणि मानसी पाठक हे अबदिन यांची विविध उत्पादने ऑनलाइन विकतात. दास म्हणाले, "आम्ही गेल्या सात वर्षांपासून या कारागिरांसोबत काम करत आहोत. झैनल दा, नगेन दा आणि इतर कारागीर कौशल्याने सुंदर वस्तू तयार करतात. आम्ही त्यांच्या उत्पादनांची ऑनलाइन आणि ऑफलाइन विक्री करतो. त्यांच्या बहुतांश वस्तूंना नेहमीच मागणी असते. या कुशल कारागिरांचे काम रुपेरी पडद्यावर झळकले, याचा आम्हाला सार्थ अभिमान आणि आनंद वाटतो. हे केवळ त्यांचे यश नसून संपूर्ण आसामचे यश आहे. यातून आसामच्या वेत आणि बांबू हस्तकलेच्या दर्जावर शिक्कामोर्तब झाले आहे."
मानसी पाठक यांनीही असाच आनंद व्यक्त केला. त्या म्हणाल्या, "ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. त्यांच्याप्रमाणेच आम्हालाही ते इतक्या भव्य प्रकल्पावर काम करत असल्याची कल्पना नव्हती. ही बातमी समजताच आम्हाला सुखद धक्का बसला आणि आनंद झाला. आपल्या वेत कलेला जागतिक व्यासपीठावर स्थान मिळाले, ही आमच्यासाठी अभिमानास्पद बाब आहे."
हेही वाचा: अन् नाकावर टिच्चून राही मासूम रज़ांनी लिहीले ‘महाभारत’चे डायलॉग
'रामायण' चित्रपटातील आसामचा सहभाग केवळ वेताच्या पोशाखांपुरता मर्यादित नाही. गुवाहाटीच्या प्रतिभावान अभिनेत्री सुरभी दास आणि अनिशा देओल यांनी या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले आहे. सुरभी यांनी यापूर्वी आसामी मालिकांसोबतच 'निमा डेन्झोंगपा' आणि 'पंड्या स्टोअर' या हिंदी मालिकांमधून लोकप्रियता मिळवली आहे.