कुलगाम
दक्षिण काश्मीरमधील कुलगाम येथे गेल्या आठवड्यात सीआरपीएफ जवानांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी तपासातून एक मोठा खुलासा समोर आला आहे. या हल्ल्यात मारला गेलेला दहशतवादी उमर निसाद दार याने दहशतवादी कमांडर लतिफ भट याला घटनेच्या काही महिने आधी जवळपास सहा महिने आश्रय आणि लॉजिस्टिक मदत पुरवली होती, असे तपासात स्पष्ट झाले आहे.
उमर दार हा एकेकाळी ब्रेड बनवण्याचे काम करत होता आणि तो बेपत्ता झाल्याची नोंद त्याच्या कुटुंबीयांनी केली होती. ११ नोव्हेंबर रोजी सीआरपीएफ जवानांवर झालेल्या हल्ल्यानंतर अवघ्या एका आठवड्यात तो लष्कर-ए-तैयबाच्या (LeT) 'द रेजिस्टेंस फ्रंट' (TRF) या संघटनेत सामील झाला होता. यानंतर सोमवारी सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत तो मारला गेला. १० आणि ११ नोव्हेंबरच्या सीसीटीव्ही फुटेजच्या विश्लेषणावरून असे दिसून आले की, उमर दार आणि लतिफ भट यांनी मीर बाजार, अखरान, हबलीश आणि किलामसह अनेक ठिकाणी हल्ल्यापूर्वी रेकी केली होती. अखरान गावात सीआरपीएफ पथकावर हल्ला करून तीन जवानांना जखमी करण्यापूर्वी या दोघांनी मिळून संपूर्ण प्लॅन आखला होता.
या चकमकीदरम्यान लष्कर कमांडर लतिफ भट पळून जाण्यात यशस्वी ठरला होता. त्याला पकडण्यासाठी सुरक्षा दलांनी ड्रोन आणि श्वान पथकांच्या मदतीने मंगळवारीही संपूर्ण परिसरात मोठी शोधमोहीम सुरूच ठेवली आहे. लतिफ भटला गोळी लागल्याचा संशय असून, आजूबाजूच्या डझनभर गावांमध्ये घरोघरी जाऊन कसून तपासणी केली जात आहे. वरिष्ठ पोलीस आणि सुरक्षा अधिकारी या संपूर्ण मोहिमेवर वैयक्तिकरित्या लक्ष ठेवून आहेत.