महाराष्ट्र एफडीएची धडक कारवाई; मुंबई, ठाणे आणि पुण्यातील खाद्यान्न आस्थापनांवर कारवाई

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 13 h ago
महाराष्ट्र एफडीए प्रमुख तुकाराम मुंढे
महाराष्ट्र एफडीए प्रमुख तुकाराम मुंढे

 

मुंबई 

अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (FDA) दक्षिण मुंबईतील नऊ उपाहारगृहांचे परवाने निलंबित केले आहेत. राज्यभरात १.२७ कोटी रुपयांचा अन्नसाठा जप्त केला. ठाण्यातील तीन आस्थापनांचे परवानेही निलंबित केले. पुण्यातील माणिकबाग खाऊ गल्लीतील सहा विक्रेत्यांना व्यवसाय बंद करण्याचे आदेश दिले. बुधवारी विभागाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली.

चेतना, कॅफे आयडियल, बेरूट, मियाँ कबाब आणि नॅचरल आइसक्रीम या दक्षिण मुंबईतील नऊ उपाहारगृहांचा या कारवाईत समावेश आहे. १७ नोव्हेंबर रोजी केलेल्या तपासणीत अन्न सुरक्षा आणि स्वच्छता नियमांचे गंभीर उल्लंघन आढळले. त्यानंतर तात्काळ प्रभावाने परवाने निलंबित केले.

स्वच्छता, साठा आणि परवान्याचे उल्लंघन

अन्न तयार करण्याच्या जागा अस्वच्छ आढळल्या. कच्चा आणि शिजवलेला अन्नसाठा अयोग्य पद्धतीने साठवला होता. कीटकांचा प्रादुर्भाव तसेच आवश्यक नोंदी आणि प्रमाणपत्रांचा अभाव दिसून आला. उघडे अन्नपदार्थ, खराब झालेले स्वयंपाकघरातील साहित्य आणि अपुरी कचरा व्यवस्थापनाचे प्रकारही समोर आले.

निलंबनाच्या काळात या आस्थापनांना अन्नपदार्थ खरेदी, विक्री किंवा वितरण करण्यास मनाई केली आहे. नियमभंग केल्यास अन्न सुरक्षा व मानके कायदा, २००६ अंतर्गत कायदेशीर कारवाईचा इशारा एफडीएने दिला.

पुणे, ठाणे, नागपूर आणि अकलूजमध्ये कारवाई

ठाण्यात स्वच्छता आणि अन्न सुरक्षा नियमभंगाबद्दल ब्लिंक कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेड, ब्रोडियामा फूड्स एलएलपी आणि सागर स्वीट अँड बेकरी यांचे परवाने निलंबित केले. पुणे जिल्ह्यातील मावळ येथील अ‍ॅव्हेन्यू सुपरमार्ट्सच्या केंद्रातून निकृष्ट आणि चुकीचे लेबल लावलेले २०,०८५ लिटर खाद्यतेल जप्त केले. त्याची किंमत ५०.२७ लाख रुपये आहे.

नागपुरात दोन रोस्टिंग युनिट्समधून ७५.१९ लाख रुपये किमतीचा २५,३५७ किलो सुपारीचा साठा जप्त केला. हा साठा निकृष्ट आढळला. भाजलेली सुपारी आणि संशयित भेसळजन्य पदार्थांचा यामध्ये समावेश आहे.

पुण्यातील माणिकबाग खाऊ गल्लीतील सहा आस्थापनांना वैध अन्न सुरक्षा परवाना किंवा नोंदणीशिवाय व्यवसाय सुरू ठेवल्याबद्दल व्यवसाय बंद करण्याचे आदेश दिले. नियम पाळून वैध परवाना घेतल्याशिवाय ते पुन्हा काम सुरू करू शकणार नाहीत. सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथे एका केटरिंग आस्थापनेतून १३,०१० रुपये किमतीचा १४४ किलो कालबाह्य आणि अस्वच्छ पद्धतीने साठवलेला अन्नसाठा जप्त केला.

राज्यभरात गुटखा, पान मसाला आणि सुगंधी तंबाखूसह १.६८ लाख रुपये किमतीचे बंदी घातलेले अन्नपदार्थ जप्त केले. या प्रकरणी पाच जणांना अटक केली. अनेक आस्थापनांवर सील लावणे आणि गुन्हे दाखल करणे अशी कारवाई झाली.