मुंबई पोलिसांची 'ऑपरेशन शोध-६' मोहीम; २० नोव्हेंबर ते ३ डिसेंबरदरम्यान बेपत्तांचा शोध

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 19 m ago
प्रातिनिधिक इमेज
प्रातिनिधिक इमेज

 

मुंबई 

बेपत्ता, अपहृत आणि हरवलेल्या महिला व मुलांचा शोध घेण्यासाठी मुंबई पोलीस २० नोव्हेंबर ते ३ डिसेंबरदरम्यान 'ऑपरेशन शोध-६' ही मोहीम राबवणार आहेत. या मोहिमेअंतर्गत पोलीस ठाणी १८ वर्षांखालील हरवलेल्या किंवा अपहृत मुला-मुलींचा आणि १८ वर्षांवरील बेपत्ता महिलांचा शोध घेऊन त्यांची कुटुंबांशी पुन्हा भेट घडवून आणण्याचे प्रयत्न तीव्र करतील. एका अधिकाऱ्याने गुरुवारी ही माहिती दिली.

या उपक्रमासाठी नागरिक आणि बेपत्ता व्यक्तींच्या प्रकरणांत काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांचे (NGO) सक्रिय सहकार्य अपेक्षित आहे. नागरिकांनी सतर्क राहून हरवलेल्या किंवा असुरक्षित मुला-मुली व महिलांबाबतची माहिती तात्काळ प्रशासनाला द्यावी, असे या अधिकाऱ्याने सांगितले.

नागरिकांचे सहकार्य आणि संपर्क क्रमांक

हरवलेल्या किंवा संशयास्पद स्थितीत आढळणाऱ्या मुले व महिलांबाबत नागरिकांनी काळजीपूर्वक चौकशी करावी. त्यानंतर १०० किंवा १०९८ क्रमांकावर पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा. जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे किंवा योग्य वाटल्यास त्या व्यक्तींना थेट जवळच्या पोलीस ठाण्यात नेण्याचे आवाहन केले आहे.

मोहिमेच्या काळात रेल्वे स्थानके, बसस्थानके, धार्मिक स्थळे, रुग्णालये, हॉटेल्स, दुकाने आणि इतर आस्थापनांवर भीक मागताना, कचरा गोळा करताना किंवा काम करताना आढळणाऱ्या मुलांची माहिती देण्याचीही विनंती पोलिसांनी केली आहे. परिसरात बालकामगार किंवा घरगुती कामात गुंतलेली मुले दिसल्यास नागरिकांनी प्रशासनाला कळवावे.

रेल्वे स्थानक, बसस्थानक आणि 'खोया-पाया' पोर्टल

रेल्वे स्थानके आणि बसस्थानकाबाहेर निराधार किंवा वाऱ्यावर सोडलेल्या स्थितीत आढळणारे लहान मुले, महिला व पुरुषांबाबतही हे आवाहन लागू आहे. नातेवाईक किंवा परिसरातील व्यक्तींसोबत राहणाऱ्या अल्पवयीन मुलांबाबत संशयास्पद परिस्थिती आढळल्यास माहिती द्यावी.

अल्पवयीन मुलांच्या प्रकरणांत नागरिक 'मिशन वात्सल्य' उपक्रमाद्वारेही माहिती देऊ शकतात. महिला व बालविकास विभागाच्या wcd.gov.in वेबसाइटला भेट देऊन 'खोया-पाया' पोर्टलवर छायाचित्रे अपलोड करता येतील. वेळेवर मिळणारी माहिती आणि लोकांचा सहभाग बेपत्ता व्यक्तींचा शोध घेण्यासाठी आणि असुरक्षित घटकांचे संरक्षण करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतो, असे या अधिकाऱ्याने नमूद केले.