'टाईम १०० नेक्स्ट इंडिया २०२६' यादीत मुस्लिम प्रतिभावंतांचा ठसा; कलेपासून अंतराळ विज्ञानापर्यंत चौदा जणांची निवड

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 50 m ago
टाईमच्या कव्हरसह यादीत नाव असलेले मुस्लीम प्रतिभावंत
टाईमच्या कव्हरसह यादीत नाव असलेले मुस्लीम प्रतिभावंत

 

मृदगंधा दीक्षित 

जागतिक पातळीवर प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या 'टाईम' (TIME) मासिकाने गुरुवारी पहिलीवहिली 'टाईम १०० नेक्स्ट इंडिया २०२६' ही यादी जाहीर केली आहे. 'टाईम १०० नेक्स्ट' उपक्रमाचा अमेरिकेबाहेरील हा पहिलाच प्रादेशिक विस्तार आहे. भारताचे आणि जगाचे भविष्य घडवणाऱ्या शंभर उदयोन्मुख नेत्यांचा आणि प्रतिभावंतांचा यात गौरव झाला आहे. रिलायन्सच्या सहकार्याने तयार झालेल्या या यादीत चित्रपट, संगीत, रॅप, पाककला, विज्ञान, अंतराळ तंत्रज्ञान, क्रीडा, साहित्य, पर्यावरण आणि सामाजिक चळवळीतील चौदा मुस्लिम व्यक्तींनी आपले स्थान पक्के केले आहे. या निवडक शंभर जणांचा विशेष सोहळा येत्या १२ डिसेंबर रोजी मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे पार पडणार आहे.

या यादीतील सर्वात चर्चेचा चेहरा म्हणजे तरुण दिग्दर्शक आणि निर्माता आर्यन खान. या विशेष यादीसाठी जाहीर झालेल्या तीन स्वतंत्र मुखपृष्ठांवर आर्यन खान, दिग्दर्शक पायल कपाडिया आणि थेजा रिओ यांना स्थान मिळाले आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांनी आर्यनचा परिचय करून दिला आहे. शाहरुख खानचा मुलगा असूनही आर्यनमध्ये कोणताही अहंकार नसून तो नम्र आणि संवेदनशील तरुण असल्याचे भारद्वाज यांनी नमूद केले आहे. २०२५ मध्ये आलेल्या 'द बॅ***ड्स ऑफ बॉलीवूड' या ॲक्शन-कॉमेडी मालिकेचे लेखन आणि दिग्दर्शन आर्यनने केले. स्वतःच्याच जगाकडे मिश्कील आणि परखड नजरेतून पाहून मनोरंजनाची नवी शैली घडवल्याबद्दल 'इनोव्हेटर्स' गटात त्याची निवड झाली आहे.

संगीताच्या क्षेत्रात 'आर्टिस्ट्स' गटातून काश्मीरचा तरुण गायक आणि गीतकार फहीम अब्दुल्ला याने लक्ष वेधून घेतले आहे. ऑस्कर विजेते संगीतकार ए. आर. रहमान यांनी फहीमवर लेख लिहिला आहे. "फहीमचे संगीत ऐकताना काश्मीरचे सौंदर्य, तिथले डोंगर आणि तिथल्या माणसांच्या चेहऱ्यावरील आपुलकी डोळ्यांसमोर येते," अशा शब्दांत रहमान यांनी त्याचे कौतुक केले आहे. २०२५ मधील 'आवारा अंगारा' या गाण्यावर एकत्र काम करताना फहीमची भावनिक खोली आणि उपजत संगीत समज दिसून आल्याचे रहमान यांनी सांगितले. आपली सांस्कृतिक मुळे जपत तरुण पिढीशी जोडणाऱ्या या कलाकाराला १२ डिसेंबरच्या मुंबईतील सोहळ्यात विशेष सादरीकरण करण्याची संधी मिळाली आहे.

याच 'आर्टिस्ट्स' गटात मुंबईच्या गोवंडी येथील हिप-हॉप रॅपर सानिया एमक्यू हिचीही निवड झाली आहे. संगीतकार अंकुर तिवारी यांनी तिचा परिचय करून दिला असून, 'धारावी ड्रीम प्रोजेक्ट'मधून पुढे आलेल्या या तरुण कलाकाराने आपल्या धारदार गीतांतून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

अभिनयाच्या आघाडीवर अली फजल आणि दुलकर सलमान यांनी यादीत स्थान मिळवले आहे. 'फेनॉम्स' गटात निवड झालेल्या अली फजल यांचा परिचय ज्येष्ठ पत्रकार अनुपमा चोप्रा यांनी करून दिला आहे. 'मिर्झापूर'मधील गुड्डू भैया, 'राख' मालिकेतील पोलीस अधिकारी आणि 'लस्ट स्टोरीज ३'मधील भूमिकांमधून अलीने आपली वेगळी छाप सोडली आहे. पत्नी रिचा चड्ढासोबत 'पुशिंग बटन्स स्टुडिओज'च्या माध्यमातून स्वतंत्र चित्रपटांना बळ दिल्याबद्दल आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे नाव उंचावल्याबद्दल त्यांचा गौरव झाला आहे.

दुसरीकडे 'आर्टिस्ट्स' गटात निवड झालेल्या दुलकर सलमानवर अभिनेते अनिल कपूर यांनी लेख लिहिला आहे. मल्याळम चित्रपटसृष्टीतील दिग्गज मम्मूटी यांचा वारसा जपत विविध भाषांमध्ये स्वतःची स्वतंत्र वाट निर्माण केल्याबद्दल आणि नव्या कलाकारांना व्यासपीठ दिल्याबद्दल अनिल कपूर यांनी दुलकरचे कौतुक केले आहे.

पाककला आणि आदरातिथ्य क्षेत्रात मुंबईचे शेफ हुसेन शहजाद यांनी भारताचे नाव उंचावले आहे. प्रसिद्ध शेफ आणि लेखिका अस्मा खान यांनी 'आर्टिस्ट्स' गटातील हुसेन यांचा परिचय लिहिला आहे. मुंबईतील प्रसिद्ध 'द बॉम्बे कॅन्टीन'च्या माध्यमातून भारतीय खाद्यसंस्कृतीची विविधता जगासमोर आणण्यात त्यांचा वाटा आहे. आपले गुरू फ्लॉइड कार्डोझ यांच्या स्मरणार्थ २०२४ मध्ये त्यांनी मुंबईत 'पापाज' हे बारा आसनी रेस्टॉरंट सुरू केले. पारंपरिक भारतीय चवींना जागतिक पाककलेची जोड देत त्यांनी तयार केलेले पदार्थ खवय्यांच्या पसंतीस उतरले आहेत.

विज्ञान, अंतराळ तंत्रज्ञान आणि पर्यावरण संवर्धन क्षेत्रात अवैस अहमद, असीम सत्तार आणि परवीन शेख यांनी मोलाची कामगिरी केली आहे. कर्नाटकस्थित 'पिक्सेल' या अंतराळ तंत्रज्ञान कंपनीचे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अवैस अहमद ('लीडर्स' गट) यांनी 'हायपरस्पेक्ट्रल इमेजिंग' उपग्रहांचे तंत्रज्ञान विकसित केले आहे. त्यांचे सहा उपग्रह सध्या अवकाशात कार्यरत असून चोवीस उपग्रहांचे जाळे उभारण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे. शेती, हवामान, पर्यावरण आणि संरक्षण क्षेत्राला या उपग्रहांमुळे अचूक माहिती मिळत आहे.

तर आयआयटी भुवनेश्वरचे प्राध्यापक आणि हिमनदी शास्त्रज्ञ असीम सत्तार ('ॲडव्होकेट्स' गट) हिमनद्यांच्या सरोवरांना फुटून येणाऱ्या महापुराचा अभ्यास करतात. सिक्कीममधील २०२३ च्या नैसर्गिक आपत्तीचा इशारा त्यांनी दोन वर्षे आधीच दिला होता. त्यांच्या या संशोधनाबद्दल त्यांना यंदा ICIMOD तर्फे 'अर्ली करिअर सायंटिस्ट अवॉर्ड'नेही सन्मानित करण्यात आले आहे.

तसेच 'ॲडव्होकेट्स' गटात वन्यजीव शास्त्रज्ञ परवीन शेख यांनाही स्थान मिळाले आहे. चंबळ नदीकाठावरील नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या 'इंडियन स्किमर' पक्ष्यांच्या संवर्धनासाठी त्यांनी स्थानिक समुदायाच्या सहभागातून काम उभे केले असून, २०२६ च्या प्रतिष्ठित 'व्हिटली अवॉर्ड'च्या त्या मानकरी ठरल्या आहेत.

आरोग्य आणि मानवी हक्कांच्या क्षेत्रात दिल्लीतील जामिया हमदर्द विद्यापीठाच्या प्राध्यापक डॉ. अक्सा शेख यांची ('ॲडव्होकेट्स' गट) निवड झाली आहे. पत्रकार ध्रुबो ज्योती यांनी त्यांच्या कार्याचा वेध घेतला आहे. भारतातील पहिल्या ट्रान्सजेंडर डॉक्टरांपैकी एक असलेल्या डॉ. अक्सा यांनी आरोग्य सेवा आणि सार्वजनिक ठिकाणी सर्वसमावेशकता आणण्यासाठी उल्लेखनीय काम केले आहे. इंटरसेक्स बालकांवरील अनावश्यक शस्त्रक्रिया बंद करणे आणि दिल्ली मेट्रोमधील स्वच्छतागृहे सर्वांसाठी खुली करणे, यांत त्यांचा पुढाकार राहिला आहे. सध्या सर्वोच्च न्यायालयाच्या विशेष समितीवर राहून उच्च शिक्षण संस्थांतील विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य जपण्यासाठी त्या धोरण आखत आहेत.

सामाजिक न्यायासाठी झुंज देणाऱ्या शाहीन मलिक यांचा प्रवास अनेक महिलांना प्रेरणा देणारा आहे. पत्रकार नेहा थिराणी बागरी यांनी 'फेनॉम्स' गटातील शाहीन यांचा संघर्ष मांडला आहे. २००९ मध्ये झालेल्या ॲसिड हल्ल्यानंतर शाहीन यांनी पंचवीस शस्त्रक्रिया सोसल्या आणि एका डोळ्याची दृष्टी गमावली. या संकटातून सावरत त्यांनी २०२१ मध्ये 'ब्रेव्ह सोल्स फाउंडेशन' ही संस्था स्थापन केली आणि शेकडो पीडित महिलांना आधार दिला. २०२६ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने जबरदस्तीने ॲसिड पाजल्यामुळे अंतर्गत इजा झालेल्या पीडितांनाही दिव्यांग कायद्यांतर्गत भरपाई आणि पुनर्वसनाचा हक्क देणारा ऐतिहासिक निकाल दिला. या कायदेशीर लढ्यात शाहीन मलिक यांची भूमिका निर्णायक ठरली.

यासोबतच कामगार हक्कांसाठी लढणारे शेख सलाउद्दीन यांचा 'ॲडव्होकेट्स' गटात समावेश झाला असून, पत्रकार चार्ली कॅम्पबेल यांनी त्यांचा परिचय लिहिला आहे. 'तेलंगणा गिग अँड प्लॅटफॉर्म वर्कर्स युनियन'चे (TGPWU) संस्थापक-अध्यक्ष आणि 'इंडियन फेडरेशन ऑफ ॲप-बेस्ड ट्रान्सपोर्ट वर्कर्स'चे (IFAT) राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून सलाउद्दीन कार्यरत आहेत. डिलिव्हरी आणि ॲप-आधारित कामगारांचे हक्क आणि सामाजिक सुरक्षेसाठी त्यांनी देशपातळीवर प्रभावी लढा उभारला आहे.

क्रीडा आणि साहित्य क्षेत्रात सानिया मिर्झा आणि झेयाद मसरूर खान यांनी आपली ओळख अधोरेखित केली आहे. चित्रपट निर्मात्या फराह खान यांनी 'ॲडव्होकेट्स' गटातील सानिया मिर्झावर लेख लिहिला आहे. पारंपरिक पार्श्वभूमीतून येऊन जागतिक टेनिस गाजवल्यानंतर आता सानिया समालोचन, टेनिस अकादमी आणि महिला खेळाडूंना घडवण्याच्या कामात सक्रिय आहे.

तर 'लीडर्स' गटात निवड झालेले पत्रकार आणि लेखक झेयाद मसरूर खान यांनी 'सिटी ऑन फायर: अ बॉयहुड इन अलिगढ' (२०२३) या पुस्तकातून आपले अनुभव जगासमोर मांडले आहेत. अलिगढमधील उपर कोट परिसरातील बालपणाचे वास्तव चित्रित करणाऱ्या या पुस्तकाला २०२४ चा क्रॉसवर्ड बुक अवॉर्ड (ज्युरी पुरस्कार) मिळाला आहे.

या यादीच्या संपादकीय पथकात निहा मसीह आणि बशारत पीर यांनीही महत्त्वाची जबाबदारी पार पाडली आहे.

मनोरंजन, संगीत, विज्ञान, तंत्रज्ञान, पर्यावरण, क्रीडा आणि सामाजिक न्याय अशा सर्वच क्षेत्रांत हे चौदा मुस्लिम प्रतिभावंत नव्या भारताचे नेतृत्व करत आहेत. त्यांच्या कामाची दखल 'टाईम' मासिकाने घेतल्याने देशाच्या कर्तृत्वातील विविधतेवर जागतिक स्तरावर शिक्कामोर्तब झाले आहे.