आशा खोसा
दक्षिण काश्मीरमधील कुलगाम येथील जंगलापुरा भागात एका मशिदीजवळ बुधवारी सुरक्षा दलांनी लष्कर-ए-तोयबाचा कमांडर लतीफ अहमद भट याला ठार केले. जवळपास वर्षभरापासून सक्रिय असलेला लतीफ पोलीस आणि परप्रांतीय मजुरांच्या निवडून केलेल्या हत्यांमध्ये सहभागी होता. अलीकडेच सीआरपीएफच्या छावणीवर झालेल्या हल्ल्यातही त्याचा हात होता.
🚨 2 local Kashmiris joined terror ranks in last 02 years, killed: J&K Police Chief Director General J&K Police Nalin Prabhat said two local Kashmiris joined Lashkar and Lateef Bhat has been killed today in Kulgam while Umar Nisar was also killed in Kulgam https://t.co/imAnARf3IU
— Gursimran Singh (@GursimranonX) November 18, 2026
लतीफचा खात्मा होणे हा काश्मीरच्या दहशतवादाविरोधातील प्रदीर्घ आणि वेदनादायी संघर्षातील निर्णायक टप्पा आहे. श्रीनगरच्या मध्यवर्ती भागातील सेंट्रल टेलिग्राफ ऑफिस आणि इंडिया कॉफी हाऊसच्या स्वच्छतागृहात देशी बॉम्बस्फोट घडवून पाकिस्तानप्रशिक्षित दहशतवादी गटांनी खोऱ्यातील शांतता भंग केली होती. या घटनेला आज ३७ वर्षे पूर्ण झाली आहेत. मध्य आणि पूर्व भारतातील डाव्या विचारसरणीचा उग्रवाद संपवण्यात देशाला अलीकडेच यश आले. काश्मीरमधील हे यशही तितकेच साजरे करण्यासारखे आहे. या दोन्ही हिंसक चळवळी केवळ नियंत्रणात ठेवता येतील, पण त्यांचा पूर्णपणे बिमोड कधीच होणार नाही, असे एकेकाळी मानले जात होते.
अखेरचा जिवंत दहशतवादी मारला गेल्याचे विधान पोलीस महासंचालक नलिन प्रभात यांनी केले आहे. हे विधान गांभीर्याने घेण्याची गरज आहे. कुटुंबातील बेपत्ता सदस्यांची माहिती तात्काळ पोलिसांना देण्याच्या कडक पद्धतीवर ही आकडेवारी आधारित आहे. लतीफच्या कुटुंबानेही वर्षभरापूर्वी तो बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांत नोंदवली होती.
जन्म आणि कामाच्या निमित्ताने काश्मीरशी जोडलेली पत्रकार म्हणून मला हा दिवस दुहेरी आनंदाचा वाटतो. एका बाजूला लष्कर-ए-तोयबाचा कमांडर ठार झाला. त्याच दिवशी काश्मीरच्या मातीतील दुसरा सुपुत्र सुहेल अहमद भट याने भारताच्या सलग तिसऱ्या "सॅफ" (SAFF) फुटबॉल विजेतेपदात मोलाची कामगिरी बजावली. एकवीस वर्षांचा सुहेल ढाका येथील मैदानात पाठीवर तिरंगा फडकवत विजयाचा आनंद साजरा करत धावत होता. त्याच्या चेहऱ्यावर आनंद, अभिमान आणि समाधानाचे भाव दिसत होते. गेल्या काही वर्षांत काश्मीरच्या इतर खेळाडूंचे असेच उत्साहवर्धक क्षण मी पाहिले आहेत.
चाळिशीतील काश्मिरी कलाकार काझी तौकीर याची कहाणीही अशीच उमेद देणारी आहे. एका टेलिव्हिजन रिॲलिटी शोमधील आपल्या सादरीकरणाने तो प्रेक्षकांची मने जिंकत आहे. काही आठवड्यांच्या बंदिस्त वास्तव्यानंतर आणि स्पर्धकांच्या टप्प्याटप्प्याने होणाऱ्या निरोपानंतर प्रेक्षक या कार्यक्रमाचा विजेता ठरवणार आहेत. तौकीरने अनेक वर्षांपूर्वी एका लोकप्रिय संगीत रिॲलिटी शोचे विजेतेपद पटकावले होते. मात्र घरी परतल्यावर त्याचे स्वागत झाले नाही. उलट त्याला भेदभावाचा सामना करावा लागला आणि त्याच्या कलेला फारशी दाद मिळाली नाही. भारतीय टेलिव्हिजनच्या रिॲलिटी शोमध्ये विजेता ठरलेल्या व्यक्तीचा गौरव करण्याची मानसिकता त्या काळात काश्मीरमध्ये नव्हती.
एकेकाळी संधी हुकल्यासारखी वाटणारा तौकीर आज अनेक भारतीयांच्या मनात विजेता ठरला आहे. या कार्यक्रमाचा विजेता निवडण्यासाठी प्रेक्षक त्याला मतदान करतील. त्याहून महत्त्वाचे म्हणजे आता काश्मीरही त्याचे कौतुक करायला तयार आहे. जमिनीवरील वास्तव आता बदलले आहे.
या परिवर्तनामागे भारताची यशस्वी दहशतवादविरोधी रणनीती आणि पाकिस्तानबाबतचे स्पष्ट धोरण आहे. भारताविरोधात छुपे युद्ध पुकारणाऱ्या पाकिस्तानने काश्मीरमधील दहशतवादाला नेहमीच खतपाणी घातले. या धोरणासोबतच भूतकाळाचे मानसिक ओझे नसलेली काश्मिरी तरुणांची नवी पिढी पुढे येणे, हा देखील या बदलाचा भाग आहे. दहशतवादावर नियंत्रण मिळवण्याच्या काळात ही पिढी वाढली. या काळात सुरक्षा दलांनी दहशतवादविरोधी कारवायांसाठी निश्चित कार्यपद्धती विकसित केली. त्यामुळे कारवायांमध्ये होणाऱ्या चुकांचे प्रमाण कमी झाले.
कलम ३७० रद्द करण्याच्या निर्णयाने या बदलावर कळस चढवला. या निर्णयामुळे जम्मू आणि काश्मीरचा विशेष घटनात्मक दर्जा संपुष्टात आला. राजकीय उच्चभ्रू वर्ग, सत्ताधारी व्यवस्था आणि पाकिस्तानचे समर्थक या विशेष व्यवस्थेचा स्वतःच्या फायद्यासाठी वापर करत होते. सत्ताधारी वर्गाने विशेषाधिकार आणि उत्तरदायित्वाच्या अभावाचा फायदा घेत संपत्ती गोळा केली आणि सत्ता बळकट केली. काश्मीरचे भारताशी असलेले नाते याबाबत तरुणांच्या मनात संभ्रम निर्माण करण्यासाठी फुटीरतावाद्यांनी या राजकीय संदिग्धतेचा वापर केला. दिल्लीचे काश्मीरवर वर्चस्व राहील, अशी भीती वारंवार दाखवून काही राजकीय पक्षांनी हा संभ्रम आणखी वाढवला.
आजच्या काश्मिरी तरुणांच्या मनात भारतातील केंद्रशासित प्रदेश म्हणून जम्मू आणि काश्मीरच्या घटनात्मक स्थानाबद्दल फारसा संभ्रम उरलेला नाही. देशाच्या इतर भागांप्रमाणेच या प्रदेशाचे केंद्राशी समान घटनात्मक नाते आहे, ही बाब तरुणांना समजू लागली आहे. त्याच वेळी इथली वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती इतर कोणत्याही प्रदेशाप्रमाणेच जिवंत आणि मौल्यवान राहिली आहे.
हा बदल केवळ गायन आणि क्रीडा क्षेत्रापुरता मर्यादित राहिलेला नाही. काश्मीरचे तरुण आणि तरुणी आज देशभरातील महानगरांसह लहान शहरांमध्येही शिक्षण घेत आहेत आणि नोकरी-व्यवसाय करत आहेत. जुन्या भौगोलिक आणि मानसिक मर्यादा ओलांडून ते नव्या संधी शोधत आहेत, करिअर घडवत आहेत आणि स्वतःची ओळख निर्माण करत आहेत.
काश्मीरला देशाच्या उर्वरित भागाशी जोडणारा रेल्वे मार्ग हा आणखी एक अडथळा दूर करणारा ठरला आहे. वर्षभर खोऱ्यात ये-जा करण्याची विश्वासार्ह सोय झाल्याने काश्मिरी नागरिक भौगोलिक एकटेपणाच्या चिंतेतून हळूहळू मुक्त होत आहेत. हा एकटेपणा काय असतो, याचा अनुभव मी स्वतः घेतला आहे. काश्मीरचे हिवाळे, सततचे ढगाळ आकाश, बर्फाने झाकलेले रस्ते आणि चिखल मी जवळून पाहिला आहे. अशा काळात खोऱ्याबाहेर जाणारा प्रत्येक रस्ता अनेक दिवस बंद राहायचा. निसर्गाच्या कचाट्यात अडकण्याची आणि देशापासून तुटण्याची भीती मनात घबराट आणि नाराजी निर्माण करते. याचा लोकांच्या जीवनावर आणि वृत्तीवर होणारा एकत्रित परिणाम कधीच सकारात्मक असू शकत नाही.
भारताचा जागतिक प्रभाव वाढत असतानाच पाकिस्तान मात्र राजकीय आणि आर्थिक अस्थिरतेशी झुंजत आहे. पाकिस्तानची वाटचाल एका अपयशी राष्ट्राकडे सुरू असल्याचे पाहून ही नवी पिढी मोठी झाली आहे. जम्मू आणि काश्मीरच्या भारतात विलीनीकरणावर सार्वमत घेण्याची भीती दाखवून राजकारण करणारे नेते आणि गट आता कालबाह्य झाले आहेत. हुरियत कॉन्फरन्स ही संघटना निष्क्रिय झाली आहे. तिचे अनेक प्रमुख नेते मरण पावले आहेत. फुटीरतावादी नेत्यांनी बंदची वेळापत्रके जाहीर करण्याचा काळ आता इतिहासात जमा झाला आहे.
विकास, गुणवत्ता आणि तरुणांना प्राधान्य देणाऱ्या नव्या विचाराने तरुण पिढीच्या मनाचा ताबा घेतला आहे. भूतकाळाकडे पाहत आणि इतिहासाच्या ओझ्याखाली दबून आयुष्य घालवण्याची त्यांची इच्छा नाही. त्यांना पुढे पाहायचे आहे आणि संधी, सन्मान व यशावर आधारित भविष्य घडवायचे आहे. हाच काश्मीरमधील मुख्य बदल आहे. वारशाने मिळालेल्या संघर्षावरून ओळखले जाण्यापेक्षा स्वतःच्या कर्तृत्वाने ओळख निर्माण करण्याची इच्छा खोऱ्यातील तरुणांमध्ये वाढत आहे.
एका दहशतवादी कमांडरचा मृत्यू हा हिंसाचाराच्या युगाचा शेवट दर्शवतो आणि हा आनंद साजरा करायलाच हवा. मात्र शांतता भंग करण्यासाठी आणि अशांतता पसरवण्यासाठी टपून बसलेल्या छुप्या विघातक घटकांना मुळापासून उपटून काढण्याचे आव्हान अद्याप सरकारसमोर आहे.
(लेखिका आशा खोसा या "आवाज-द व्हॉईस" इंग्रजीच्या संपादक असून काश्मीरमध्ये दहशतवाद शिखरावर असताना त्यांनी तिथून पत्रकारिता केली आहे.)