उधमपूर
जम्मू-काश्मीरमध्ये स्थानिक दहशतवादी भरती गेल्या दोन वर्षांत जवळपास शून्यावर आली आहे. जम्मू-काश्मीरचे पोलीस महासंचालक नलिन प्रभात यांनी ही माहिती दिली. लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी लतीफ भट कुलगाम चकमकीत मारला गेल्यानंतर त्यांनी हे विधान केले.
या कालावधीत केवळ दोन काश्मिरी तरुण लष्कर-ए-तोयबामध्ये सामील झाले. त्यातील शेवटचा दहशतवादी लतीफ भट याला कुलगाममध्ये मारण्यात आले. दुसरा दहशतवादी उमर निसार याचा दोन दिवसांपूर्वी याच जिल्ह्यात खात्मा झाला. उधमपूर येथील शेर-ए-काश्मीर पोलीस अकादमीमध्ये उपअधीक्षक, उपनिरीक्षक आणि वन संरक्षण दलाच्या सहायक संचालकांच्या पासिंग-आउट परेडमध्ये नलिन प्रभात बोलत होते. नायब राज्यपाल मनोज सिन्हा या कार्यक्रमाला उपस्थित होते.
जम्मू-काश्मीर पोलीस गेल्या ३५ वर्षांपासून पाकिस्तानपुरस्कृत दहशतवादाशी लढा देत आहेत. नलिन प्रभात यांनी हुतात्म्यांना अभिवादन केले. किश्तवाडमध्ये नुकतेच देशासाठी प्राण गमावलेले शूर जवान बाबी चंद्र आणि रश्पाल कुमार यांच्यासह १,६०३ हुतात्म्यांना त्यांनी आदरांजली वाहिली.
पोलिसांची लढाई केवळ दहशतवाद्यांपुरती मर्यादित नाही. दहशतवाद्यांचे मदत जाळे आणि संपूर्ण इकोसिस्टम उद्ध्वस्त करण्याचे काम सुरू आहे. पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री आणि नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांच्या मार्गदर्शनाखाली जम्मू-काश्मीर पोलिसांना यश मिळत आहे. संपूर्ण दहशतवादी यंत्रणा मुळापासून संपवण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे नलिन प्रभात यांनी सांगितले.
बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (यूएपीए) २०२५ मध्ये २४० आरोपींना अटक करण्यात आली. यंदा या कायद्याखाली २१० अटक कारवाया झाल्या. दहशतवादी कारवायांना आर्थिक आणि लॉजिस्टिक मदत पुरवणाऱ्यांचाही यामध्ये समावेश आहे.
दहशतवादाशी संबंधित मालमत्तांवर कायदेशीर प्रक्रियेनंतर २०२५ मध्ये १५५ मालमत्ता जप्त करण्यात आल्या. यंदा आतापर्यंत १२२ मालमत्ता जप्त केल्या. पाकिस्तानातून कारवाया करणाऱ्या दहशतवाद्यांच्या आणि यूएपीए अंतर्गत गुन्हेगारांच्या मालमत्तांवर ही कारवाई झाली. ११ नोव्हेंबर रोजी कुलगाममध्ये सीआरपीएफ जवानांवर झालेल्या हल्ल्यात भट आणि उमर निसार सामील होते. त्या हल्ल्यात तीन जवान जखमी झाले होते.