ओडिशाकडे सरकले 'अकवन' चक्रीवादळ; ५० हजार नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 9 m ago
ओडिशात ११ जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा
ओडिशात ११ जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा

 

भुवनेश्वर 

'अकवन' (Akvan) हे तीव्र चक्रीवादळ आंध्र प्रदेशातील नरसापूर आणि ओडिशातील पुरी दरम्यान धडकण्याची शक्यता निर्माण झाली असून, ओडिशा सरकारने आतापर्यंत सुमारे ५० हजार नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर केले आहे. राज्याचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांनी बुधवारी उच्चस्तरीय आढावा बैठकीनंतर ही माहिती दिली. गंजम जिल्ह्यातून सर्वाधिक नागरिकांचे स्थलांतर केले जात असून मदतकार्य वेगाने सुरू आहे.

"शून्य जीवितहानी हे आमचे मुख्य लक्ष्य आहे. मैदानी आणि डोंगराळ अशा दोन्ही भागांत मोठ्या प्रमाणावर स्थलांतर मोहीम राबवली जात आहे," असे मुख्यमंत्री माझी यांनी सांगितले. गंजम, गजपती, कंधमाल, रायगडा, कोरापुट आणि मलकानगिरी या जिल्ह्यांतील अनेक गावांतील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येत आहे. राज्य सरकारने ३,००० चक्रीवादळ निवारा केंद्रे उभारली असून त्यापैकी ४४८ केंद्रे आधीच कार्यान्वित झाली आहेत.

११ जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा आणि शाळांना सुट्टी

बचाव आणि मदत कार्यासाठी ओडिशा सरकारने १५ जिल्ह्यांना २० कोटी रुपयांचा निधी वितरित केला आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवार आणि शुक्रवारसाठी मलकानगिरी, कोरापुट, रायगडा, कालाहांडी, गजपती, गंजम, कंधमाल, बौध, पुरी, नयागड आणि खुर्दा या ११ जिल्ह्यांत अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. या काळात ओडिशाच्या किनारपट्टीवर वाऱ्याचा सरासरी वेग ताशी १०० किलोमीटर राहण्याची शक्यता आहे.

चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने गुरुवारपासून पुढील तीन दिवस गंजम, गजपती, पुरी, जगतसिंगपूर, केंद्रपाडा आणि कंधमाल या सहा जिल्ह्यांतील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच सरकारी कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द करण्यात आल्या असून, संवेदनशील भागांत वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.