मुंबई
उदयोन्मुख अर्थव्यवस्थांसमोर वाढ की पर्यावरण, समृद्धी की संरक्षण असा चुकीचा पर्याय वारंवार ठेवला जातो, मात्र भारताने यापैकी एकाची निवड करण्याची गरज नाही हे सिद्ध करून दाखवले आहे, असे प्रतिपादन ब्रिटनचे प्रिन्स विल्यम यांनी सोमवारी केले. मुंबईत आयोजित 'अर्थशॉट प्राइज २०२० इम्पॅक्ट असेंब्ली' (Earthshot Prize 2026 Impact Assembly) मध्ये ते बोलत होते.
भारताने आपल्या एकूण स्थापित वीज क्षमतेच्या ५० टक्के वीज अ-जीवाश्म इंधनावरून मिळवण्याचे उद्दिष्ट पाच वर्षे आधीच साध्य केले आहे, याकडे प्रिन्स विल्यम यांनी लक्ष वेधले. गेल्या दशकात देशाची सौर ऊर्जा क्षमता ५० पटीहून अधिक वाढली आहे. हे परिवर्तन केवळ ऊर्जेपुरते मर्यादित नसून लोकांच्या जगण्याची दर्जेदार पद्धत बदलणारे आहे. इतर कोणत्याही देशापेक्षा सर्वाधिक अर्थशॉट प्राइज विजेते आणि अंतिम फेरीतील नामांकित व्यक्ती भारतातून आहेत, असेही त्यांनी नमूद केले.
प्रिन्स विल्यम यांनी स्थापन केलेल्या 'अर्थशॉट प्राइज' अंतर्गत हवामान बदलावर उपाय शोधणाऱ्या ५ विजेत्यांना प्रत्येकी १३ लाख डॉलर दिले जातात. मुंबईत १७ नोव्हेंबर रोजी या पुरस्कार सोहळ्याची सहावी आवृत्ती होत आहे. २०२१ मध्ये दिल्लीस्थित 'तकाचर' या सामाजिक उपक्रमाला स्वच्छ हवेच्या श्रेणीत पहिला पुरस्कार मिळाला होता. या तंत्रज्ञानामुळे शेतातील कचरा जाळण्याऐवजी त्यापासून इंधन आणि खत बनवले जाते, ज्यामुळे प्रदूषण ९८ टक्क्यांनी कमी झाले. तसेच यंदाच्या अंतिम फेरीत 'महिला हाऊसिंग ट्रिस्ट' आणि 'महिंद्रा लास्ट माईल मोबिलिटी' या दोन भारतीय उपक्रमांचा समावेश असल्याचे त्यांनी कौतुकाने सांगितले.