वॉशिंग्टन
वर्षांनुवर्षे वाढत चाललेल्या तंत्रज्ञान स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर, कृत्रिम बुद्धिमत्तेची (AI) पुरवठा साखळी सुरक्षित ठेवण्यासाठी भारत, अमेरिकेसह दहा देशांनी एका महत्त्वाच्या घोषणापत्रावर स्वाक्षरी केली आहे. उदयोन्मुख तंत्रज्ञान क्षेत्रात चीनसोबत वाढत्या स्पर्धेच्या काळात हा निर्णय घेण्यात आला आहे.
अमेरिकेचे आर्थिक घडामोडींचे अंडर सेक्रेटरी जेकब हेलबर्ग यांनी आयोजित केलेल्या बैठकीत रविवारी 'सॅन फ्रान्सिस्को घोषणापत्रावर' स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, भारत, इस्रायल, जपान, दक्षिण कोरिया, कतार, सिंगापूर, संयुक्त अरब अमिराती आणि युनायटेड किंगडम या देशांच्या सरकारांनी हे घोषणापत्र जाहीर केले आहे. सेमीकंडक्टर उत्पादनासाठी आवश्यक असलेले सिलिकॉन आणि इतर खनिजांची पुरवठा साखळी सुरक्षित करण्यासाठी अमेरिकेतर्फे गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये 'पॅक्स सिलिका' (Pax Silica) उपक्रमाची घोषणा करण्यात आली होती.
आर्थिक सुरक्षा हीच राष्ट्रसुरक्षेचा पाया असल्याचे या घोषणापत्रात स्पष्ट करण्यात आले आहे. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी केल्यानंतर अमेरिका सरकार आता कृत्रिम बुद्धिमत्तेला (AI) 'सुपर इंटेलिजन्स' (SI) म्हणून संबोधते. ही पुरवठा साखळी सुरक्षित करणे हा सर्व देशांचा सामायिक प्रयत्न असेल, असे अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने म्हटले आहे. या उपक्रमांतर्गत नाविन्यपूर्ण धोरणे, महत्त्वाच्या क्षेत्रांमधील एआयचा वापर, पुरवठा साखळीतील सहकार्य आणि सुरक्षा यांसारख्या विषयांवर काम करण्यासाठी पाच स्वतंत्र कार्यगट स्थापन करण्याचा प्रस्ताव आहे.