इस्लाममध्ये स्वच्छता हा निम्मा ईमान; परिसरातील शुद्धतेबाबत जागरूकता का गरजेची?

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 15 m ago
एआय निर्मित इमेज
एआय निर्मित इमेज

 

मुहम्मद रझी-उल-इस्लाम नदवी

इस्लाम धर्मात स्वच्छतेला मूलभूत कर्तव्य मानले जाते आणि स्वच्छता हा निम्मा ईमान समजला जातो. असे असूनही भारतीय मुस्लिमांनी या प्रतिमेला साजेसे वर्तन दाखवलेले नाही. ही विडंबना आहे. विशेषतः उत्तर भारतातील मुस्लिमांनी सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवण्यात रस नसणारे लोक, अशी स्वतःची प्रतिमा तयार केली आहे.

इस्लाम केवळ माणसाच्या आध्यात्मिक विकासावर भर देत नाही. माणसाची शारीरिक, सामाजिक आणि पर्यावरणीय स्वच्छताही या धर्मात तितकीच महत्त्वाची मानली जाते. स्वच्छता ही इस्लामच्या मूलभूत शिकवणींपैकी एक आहे. मुस्लिमांचे जीवन केवळ इबादत, नैतिकता आणि व्यवहारातून ओळखले जात नाही. त्यांची जीवनशैली, शरीर, कपडे, घर आणि सभोवतालच्या परिसरातील शुद्धतेवरूनही त्यांची ओळख ठरते. म्हणूनच इस्लामने स्वच्छतेला ईमानाचा भाग घोषित केले आहे आणि जीवनाच्या प्रत्येक अंगात शुद्धता राखण्याचा आदेश दिला आहे. एका बाजूला नमाज अदा करण्यासाठी वजू करणे आवश्यक असते. दुसऱ्या बाजूला मात्र समाजात आपल्या परिसराच्या स्वच्छतेबाबत बेफिकीर राहण्याची प्रवृत्ती दिसून येते.


इस्लाम माणसाला बाह्य आणि आंतरिक अशा दोन्ही प्रकारच्या स्वच्छतेचा स्वीकार करण्यास प्रोत्साहित करतो. पैगंबर मुहम्मद (स.) यांनी म्हटले आहे, "शुद्धता हा निम्मा ईमान आहे." (सहीह मुस्लिम: २२३). दुसऱ्या एका हदीसमध्ये पैगंबरांनी सांगितले, "निश्चितच अल्लाह पवित्र आहे आणि त्याला पवित्रता आवडते. तो स्वच्छ आहे आणि त्याला स्वच्छता आवडते." (जामी अल-तिरमिधी: २७९९). स्वच्छता ही केवळ सामाजिक गरज नसून ते एक धार्मिक कर्तव्य आणि इस्लामिक संस्कृतीचा महत्त्वाचा भाग आहे, हे या शिकवणीतून स्पष्ट होते. पवित्र कुराणात अल्लाह म्हणतो, "निश्चितच अल्लाह पश्चात्ताप करणाऱ्यांवर आणि स्वतःला शुद्ध ठेवणाऱ्यांवर प्रेम करतो." (सूरह अल-बकरा: २२२). दुसऱ्या एका ठिकाणी अल्लाहने आदेश दिला आहे, "आणि तुमचे कपडे स्वच्छ ठेवा." (सूरह अल-मुद्दस्सिर: ४).

इस्लामिक उपासना पद्धतींमध्येही शुद्धतेला मूलभूत स्थान आहे. नमाजापूर्वी वजू करणे, विशिष्ट प्रसंगी गुसल म्हणजेच स्नान करणे आणि कपडे व प्रार्थनास्थळांची स्वच्छता राखणे या सर्व गोष्टी इस्लामला स्वच्छता मानवी जीवनाचा अविभाज्य भाग बनवायची असल्याचे सिद्ध करतात. रस्त्यावरून त्रासदायक वस्तू बाजूला करणे यालाही पुण्याचे काम मानले गेले आहे. पैगंबर मुहम्मद (स.) यांनी म्हटले आहे, "रस्त्यावरून त्रासदायक वस्तू हटवणे हा सदका (दान) आहे." (सहीह अल-बुखारी: २४७२, सहीह मुस्लिम: १००९).

एका बाजूला स्वच्छतेबाबत इस्लामची ही शिकवण आहे. दुसऱ्या बाजूला मात्र आज अनेक मुस्लिम या शिकवणीबाबत निष्काळजी झाले आहेत, ही दुर्दैवाची बाब आहे. इबादत करताना ते स्वच्छतेची काळजी घेतात, पण आपल्या परिसरातील स्वच्छता, शिस्त आणि पर्यावरणीय शुद्धतेकडे दुर्लक्ष करतात. अनेक लोक घराच्या आतील स्वच्छता बऱ्याच प्रमाणात राखतात, मात्र बाहेरील गल्ल्या, रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणांच्या स्वच्छतेकडे फारसे लक्ष देत नाहीत. असे वागणे केवळ इस्लामिक शिकवणीच्या विरोधात नाही, तर त्यामुळे मुस्लिमांच्या सामूहिक प्रतिमेलाही धक्का बसतो. मुस्लिम व्यक्ती जिथे राहते, तिथे तिने स्वच्छता, सुव्यवस्था आणि प्रसन्न वातावरणाचा आदर्श निर्माण करणे अपेक्षित असते.

ईद-उल-अजहाच्या काळात ही समस्या प्रकर्षाने समोर येते. कुर्बानी ही एक महत्त्वाची इबादत आणि पैगंबर इब्राहिम यांची सुन्नत आहे. मुस्लिम बांधव उत्साहाने ही परंपरा पाळतात. मात्र अनेकदा या प्रसंगी स्वच्छतेकडे योग्य लक्ष दिले जात नाही. काही मुस्लिम वस्त्यांमध्ये कुर्बानीनंतर प्राण्यांचे अवशेष, रक्त आणि कचरा कित्येक दिवस रस्त्यावरच पडून राहतो. यातून अस्वच्छता, दुर्गंधी पसरते आणि आजारांना निमंत्रण मिळते. ही दृश्ये इस्लामच्या सुंदर शिकवणीच्या पूर्णपणे विरुद्ध आहेत. असे प्रकार पाहून बिगर-मुस्लिम नागरिकांनाही त्रास आणि अस्वस्थता जाणवते.

म्हणूनच मुस्लिमांनी आपल्या सहनागरिकांच्या भावनांची जाणीव ठेवली पाहिजे. कुर्बानीच्या कृतीसोबतच स्वच्छता आणि कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावली जाईल याची खात्री केली पाहिजे. प्राण्यांचे अवशेष जमिनीत पुरून किंवा नगरपालिका प्रशासनाकडे सुपूर्द करून त्यांची योग्य विल्हेवाट लावणे, रक्त आणि घाण तात्काळ स्वच्छ करणे आणि पर्यावरणाचे प्रदूषणापासून रक्षण करणे ही प्रत्येक मुस्लिमाची जबाबदारी आहे.

मुस्लिमांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती निर्माण करण्याची गरज आहे. समाजाची नकारात्मक प्रतिमा बदलण्यासाठी ही पूर्वअट आहे. स्वच्छता केवळ आपल्या घरापुरती मर्यादित नसते, हे आपण समजून घेतले पाहिजे. घराबाहेरील गल्ल्या, रस्ते आणि परिसर स्वच्छ ठेवणे हीदेखील आपलीच जबाबदारी आहे. दक्षिण भारत आणि देशाच्या इतर काही भागांत पर्यावरणीय स्वच्छतेबाबत जागरूकता दिसून येते, मात्र उत्तर भारतातील भाग यात मागे पडले आहेत. इतरांना त्रास होणार नाही आणि सभोवतालचे वातावरण इतरांसाठी सुखद ठरेल असे वागणाराच खरा चांगला मुस्लिम असतो.

मशिदींचे इमाम, धर्मगुरू, सामाजिक संस्था आणि शैक्षणिक संस्थांनी या विषयावर जनतेमध्ये जनजागृती केली पाहिजे. त्यासाठी त्यांनी विशेष मोहिमा राबवल्या पाहिजेत. लहान वयापासूनच मुलांना स्वच्छ पर्यावरणाचे फायदे समजावून सांगितले पाहिजेत. नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने आपल्या परिसराची काळजी घेतली पाहिजे. त्यातून त्यांची वस्ती इतरांसाठी आदर्श ठरेल. विशेषतः ईद-उल-अजहापूर्वी स्वच्छता, आरोग्य आणि कुर्बानीच्या शिष्टाचाराबाबत जनजागृती मोहिमा आयोजित केल्या पाहिजेत. मुलांनाही लहानपणापासूनच स्वच्छतेच्या सवयी लावल्या पाहिजेत, म्हणजे समाज शुद्ध आणि सुसंस्कृत बनेल.

हेही वाचा: जकात: सामाजिक जबाबदारीचा कुराणातील संदेश

कुराण आणि हदीसची शिकवण आपल्याला शुद्धता, शिस्त आणि सुंदर पर्यावरणाची दिशा दाखवते. या शिकवणींचा आपल्या दैनंदिन जीवनात व्यावहारिक वापर करणे ही काळाची गरज आहे. विशेषतः अनेक लोक एकत्र येतात अशा सामूहिक कार्यक्रमांत याचे पालन झाले पाहिजे. इस्लामिक शिकवणीनुसार आपण आपली घरे आणि परिसर स्वच्छ ठेवल्यास आपला समाज निरोगी राहील. या वागण्यातून इतर मानवबांधवांसमोर इस्लामची उच्च नैतिक मूल्येही दिसून येतील. या शिकवणींवर अंमलबजावणी करण्याची शक्ती अल्लाह आपल्याला देवो, हीच प्रार्थना.

(लेखक मुहम्मद रझी-उल-इस्लाम नदवी हे "जमात-ए-इस्लामी हिंद"च्या शरिया कौन्सिलचे सचिव आहेत.)