एच. अब्दुर रकीब
जकात म्हणजे केवळ थोडे धान्य, काही कपडे किंवा थोडीफार रक्कम दान म्हणून वाटणे नव्हे. कुराणातील जकातची संकल्पना यापेक्षाही व्यापक आहे. गरिबांना केवळ जिवंत राहण्यासाठी मदत करणे एवढाच तिचा हेतू नाही. गरिबांनी स्वतःच्या पायावर उभे राहावे, स्वावलंबी व्हावे आणि पुढे जाऊन समाजाला परत काहीतरी देण्याइतपत सक्षम व्हावे, ही त्यामागची दृष्टी आहे.
इस्लामच्या पाच मुख्य स्तंभांपैकी जकात हा तिसरा स्तंभ आहे. इस्लामिक जीवनदृष्टीत याला अनन्यसाधारण स्थान आहे. कुराणामध्ये नमाज अदा करण्याच्या आज्ञेसोबतच वारंवार जकात देण्याचीही आज्ञा दिली आहे. हा सहसंबंध योगायोगाने आलेला नाही. माणसाचे केवळ अल्लाहशी असलेले नाते महत्त्वाचे नसून, समाजाप्रती असलेल्या जबाबदाऱ्याही तितक्याच महत्त्वाच्या आहेत, हे यातून स्पष्ट होते.
.png)
इतके महत्त्व असूनही आज मुस्लिमांमध्ये जकात या कर्तव्याबद्दलची समज सर्वात कमी आहे. नमाज, रोजा आणि इतर दृश्य उपासना पद्धतींचा प्रचार करण्यासाठी प्रचंड प्रयत्न केले जातात. मात्र जकातचे खरे उद्दिष्ट आणि सामाजिक परिवर्तनातील तिची भूमिका समजून घेण्याकडे फारसे लक्ष दिले जात नाही.
या कमतरतेमागे एक महत्त्वाची गोष्ट आहे. अनेक मुस्लिम जकातकडे केवळ "दानधर्म" किंवा "चॅरिटी" म्हणून पाहतात. गरजू व्यक्तीला काहीतरी देणे एवढेच पुरेसे मानले जाते. एखाद्या गरीब कुटुंबाला थोडी मदत मिळाल्यास जकातचा हेतू साध्य झाला, असा समज करून घेतला जातो.
मात्र या समजुतीमुळे एक प्रभावी सामाजिक संस्था केवळ तात्पुरती मलमपट्टी करणारी यंत्रणा बनून राहिली आहे. दानधर्मामुळे एखाद्याचे दुःख एखाद-दोन दिवस किंवा आठवडाभर हलके होऊ शकते. जकातची रचना मात्र कायमस्वरूपी बदल घडवण्यासाठी झाली आहे. केवळ भुकेल्यांना अन्न देणे हा तिचा उद्देश नाही, तर लोकांना गरिबीच्या गर्तेत अडकवून ठेवणाऱ्या परिस्थितीवर मात करणे हा खरा उद्देश आहे.
या गैरसमजाचे परिणाम आज अनेक मुस्लिम समाजांमध्ये दिसून येतात. दरवर्षी जकातच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचे वाटप होते, तरीही तीच कुटुंबे वर्षानुवर्षे मदतीवर अवलंबून राहतात. त्यांच्या तात्काळ गरजा भागतात, पण त्यांची आर्थिक स्थिती क्वचितच बदलते. त्यामुळे जकात दिली जाते का, हा खरा प्रश्न नाही. तिचा वापर मूळ हेतू साध्य करण्यासाठी होतो का, हा खरा प्रश्न आहे.
जकात मिळण्यास पात्र असलेल्या लोकांचे गट कुराणामध्ये स्पष्टपणे सांगितले आहेत. मात्र यात केवळ वाटपावर भर नसून न्याय, सक्षमीकरण आणि समाजकल्याण या गोष्टी केंद्रस्थानी आहेत. नियोजनाशिवाय जकात वाटली, तर तिचा प्रभाव मर्यादित राहतो. याउलट तिचे योग्य व्यवस्थापन केले, तर अनेकांचे आयुष्य बदलण्याची ताकद तिच्यात आहे.
.png)
एखाद्या विधवा महिलेला छोटा व्यवसाय सुरू करण्यासाठी पुरेशी मदत मिळाल्यास तिचे आयुष्य बदलू शकते. एखाद्या कुशल कामगाराला उपजीविकेसाठी आवश्यक अवजारे मिळाल्यास तो स्वाभिमानाने जगू शकतो. एखाद्या तरुणाला जकात निधीतून व्यावसायिक प्रशिक्षण मिळाल्यास तो आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होऊ शकतो. काही दिवसांत संपून जाणाऱ्या तात्पुरत्या मदतीपेक्षा हे परिणाम जकातच्या मूळ भावनेशी अधिक सुसंगत आहेत.
जकात घेणारी आदर्श व्यक्ती कायमची "घेणारी" राहता कामा नये. आज मदत घेणारा उद्या "देणारा" बनला पाहिजे, यातच या व्यवस्थेचे खरे यश दडलेले आहे. पूर्वी जकात घेणारे लोक पुढे जाऊन जकात देणारे बनतात, तोच समाज या संस्थेचे खरे यश दाखवून देतो.
जकातचा हेतू केवळ आर्थिक मदतीपुरता मर्यादित नाही, असे इस्लामिक विद्वानांनी नेहमीच सांगितले आहे. कुराण आणि सुन्नाहचा सखोल अभ्यास केल्यास जकात एकाच वेळी आध्यात्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक पातळीवर कार्य करते, हे लक्षात येते.
जकातचे पहिले उद्दिष्ट व्यक्तीची शुद्धी करणे हे आहे. संपत्तीचा मानवी मनावर जबरदस्त प्रभाव असतो. त्यातून लोभ, स्वार्थ आणि ऐहिक गोष्टींबद्दल आसक्ती निर्माण होऊ शकते. अल्लाहने आपल्याकडे सोपवलेली संपत्ती इतरांसोबत वाटून घेण्याची शिकवण देऊन जकात या प्रवृत्तींवर उतारा म्हणून काम करते. कुराणात या पैलूवर प्रकाश टाकताना म्हटले आहे, "आणि जो स्वतःच्या शुद्धीसाठी आपली संपत्ती दान करतो." (कुराण ९२:१८).
दान करणे ही कृती केवळ दुसऱ्या व्यक्तीला मदत करण्यापुरती मर्यादित नसते, तर ती देणाऱ्याच्या व्यक्तिमत्त्वातही बदल घडवते. जकातच्या माध्यमातून संपत्ती ही पूजेची वस्तू न राहता अल्लाह आणि मानवतेच्या सेवेचे साधन बनते. कुराणातील एका दुसऱ्या आयतमध्ये हीच कल्पना अधिक दृढ केली आहे. यात अल्लाह पैगंबर मुहम्मद यांना आदेश देतात, "त्यांच्या संपत्तीतून दान घ्या, यातून तुम्ही त्यांना शुद्ध कराल आणि त्यांच्यातील पावित्र्य वाढवाल." (कुराण ९:१०३). येथे सांगितलेली शुद्धी केवळ आर्थिक नाही. ती नैतिक, आध्यात्मिक आणि भावनिक शुद्धी आहे. समृद्धीसोबत जबाबदारी येते आणि इतरांच्या उपयोगी पडण्यातच खरे यश असते, ही शिकवण जकात देते.
.png)
जकातचे दुसरे उद्दिष्ट समाजकल्याण हे आहे. समाजातील विशाल वर्ग मूलभूत गरजांपासून वंचित असताना कोणताही समाज प्रगती करू शकत नाही, हे इस्लामने ओळखले आहे. आर्थिक विषमता ही केवळ आर्थिक समस्या नसून ते एक नैतिक आव्हान आहे. पैगंबर मुहम्मद यांनी हे तत्त्व स्पष्ट शब्दांत मांडले आहे. श्रीमंतांकडून जकात घेतली जाते आणि ती त्यांच्यातीलच गरिबांना परत केली जाते, असे त्यांनी सांगितले. या साध्या विधानातून मुस्लिम समुदायातील एक गहिरा सामाजिक करार प्रस्थापित होतो.
संपत्ती केवळ काही मोजक्याच लोकांच्या हातात फिरती राहू नये, हा यामागचा विचार आहे. जकातच्या माध्यमातून संसाधनांचे फेरवाटप होते आणि समाजातील दुर्बल घटक सन्मानाने व सुरक्षिततेने जगू शकतात. परावलंबित्व निर्माण करणे हा याचा उद्देश नसून सक्षमीकरण करणे हा आहे. जकातची योग्य अंमलबजावणी झाल्यास व्यक्ती आर्थिक संकटातून बाहेर पडू शकते. डोक्यावरचे कर्ज फेडणे, नवीन कौशल्ये शिकणे, उपजीविकेचे साधन उभे करणे आणि भविष्याबद्दलचा आत्मविश्वास पुन्हा मिळवणे यातून शक्य होते. अशा प्रकारे ही व्यवस्था कायमस्वरूपी मदतीऐवजी सामाजिक प्रगतीचे माध्यम बनते.
जकातचे तिसरे उद्दिष्ट संपूर्ण समाजाचे संरक्षण आणि बळकटीकरण करणे हे आहे. कुराणामध्ये जकात घेणाऱ्यांच्या विविध गटांचा उल्लेख केला आहे. यामध्ये मुस्लिम समाजाच्या व्यापक हितासाठी आणि भल्यासाठी काम करणाऱ्यांचाही समावेश आहे. जकात ही केवळ वैयक्तिक उदारतेची एकटी कृती नसल्याची जाणीव ही व्यापक दृष्टी करून देते. न्याय टिकवून ठेवणे, एकोपा मजबूत करणे आणि सामूहिक कल्याण साधणे यासाठी तयार केलेल्या सर्वसमावेशक सामाजिक चौकटीचा हा एक भाग आहे.
दुर्दैवाने आजकालच्या अनेक चर्चांमध्ये जकातचा अर्थ केवळ वैयक्तिक देवाणघेवाणीपुरता मर्यादित केला जातो. संस्था उभारणी, समाजविकास आणि गरिबी निर्मूलन ही व्यापक दृष्टी अनेकदा गायब असते. याचा परिणाम म्हणून जकातची अफाट क्षमता वापरली न जाता तशीच पडून राहते.
मुस्लिम समाजांनी जकातकडे धोरणात्मक दृष्टिकोनातून पाहिल्यास काय घडू शकते? जकातच्या निधीतून शैक्षणिक संधी, व्यावसायिक प्रशिक्षण कार्यक्रम, छोटे व्यवसाय आणि शाश्वत उपजीविकेचे प्रकल्प उभे राहिल्यास त्याचे परिणाम क्रांतिकारी ठरू शकतात. याचा अर्थ तात्काळ गरजांकडे दुर्लक्ष करावे, असा होत नाही. भुकेल्यांना अन्न मिळालेच पाहिजे, संकटग्रस्तांना मदत झालीच पाहिजे आणि आणीबाणीच्या प्रसंगी धावून गेलेच पाहिजे. मात्र या तात्पुरत्या मदतीसोबतच पुनर्वसन आणि सक्षमीकरणाची बांधिलकीही असायला हवी.
हा फरक समजून घेणे महत्त्वाचे आहे. तात्पुरत्या मदतीमुळे माणूस आजचा दिवस तरून नेतो. सक्षमीकरणामुळे तो स्वतःचे भविष्य घडवतो. या दोन्ही गोष्टी साध्य करण्यासाठीच जकातची निर्मिती झाली आहे. आजच्या मुस्लिमांसमोर केवळ जकातचा निधी वाढवण्याचे आव्हान नाही. जकातचा मूळ उद्देश पुन्हा शोधणे हे यापेक्षाही महत्त्वाचे आव्हान आहे. आपण केवळ "वाटपाच्या संस्कृतीकडून" आता "परिवर्तनाच्या संस्कृतीकडे" वळायला हवे.
हेही वाचा: केवळ नमाज पढवणे हेच इमामाचे काम नाही! भारतीय संदर्भात इमामांची भूमिका नेमकी काय?
योग्य प्रकारे समजून घेतल्यास जकात हे केवळ वार्षिक धार्मिक कर्तव्य राहत नाही. ते अंतःकरण शुद्ध करण्याचे, विषमता कमी करण्याचे, स्वाभिमान परत मिळवून देण्याचे आणि समाजाला बळकट करण्याचे माध्यम बनते. यातून करुणेचे रूपांतर एका व्यवस्थेत होते आणि उदारता ही कायमस्वरूपी बदल घडवणारी शक्ती बनते.
जकातचे यश किती संपत्ती वाटली गेली यावरून मोजले जात नाही. किती आयुष्ये बदलली, किती कुटुंबे गरिबीतून बाहेर पडली आणि दीर्घकाळात किती "घेणारे" लोक "देणारे" बनले, यावरून ते मोजले जाते. कुराणाची हीच दृष्टी चौदा शतकांपूर्वी जितकी समर्पक होती, तितकीच ती आजही लागू पडते.
(लेखक एच. अब्दुर रकीब हे 'इंडियन सेंटर फॉर इस्लामिक फायनान्स'चे सरचिटणीस असून चेन्नई येथे कार्यरत आहेत.)