डॉ. नसीम अख्तर
इस्लाममध्ये नेतृत्व केवळ अधिकारांवर चालत नाही. ते शहाणपण, नम्रता, करुणा आणि जबाबदारीवर आधारलेले असते. सध्याच्या भारतीय परिस्थितीत तर एका 'इमामा'ची (Imam) भूमिका पूर्वीपेक्षा खूपच जास्त महत्त्वाची बनली आहे. याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे इमामांच्या एका नवीन आणि तरुण पिढीला घडवणे गरजेचे आहे. तेच पुढे जाऊन समाजाचे योग्य नेतृत्व करू शकतील. 'इमाम' म्हणजे केवळ मशिदीत नमाज पढवणारी व्यक्ती नाही. तो एक मार्गदर्शक, शिक्षक, समुपदेशक आणि मध्यस्थ असतो. या सर्वांपेक्षा तो समाजात इस्लामी मूल्यांचा एक खरा प्रतिनिधी असतो. इमामाने कोणत्याही पक्षीय राजकारणापासून दूर राहावे, त्याच्या विचारांत स्पष्टता असावी आणि त्याची पाळेमुळे इस्लामी तत्त्वज्ञानात घट्ट रुजलेली असावीत, अशी अपेक्षा असते.
आज देशाच्या राजकीय पटलावर मुस्लिमांचे प्रतिनिधित्व कमी होत आहे. अशा वेळी इमाम स्थानिक पातळीवर समाजाला योग्य दिशा दाखवण्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. लोकांना त्यांच्या धर्माशी जोडून ठेवतानाच, त्यांच्यात राष्ट्रीय एकात्मतेची भावना जागृत करण्याचा अधिकार आणि क्षमता एका इमामाकडे नक्कीच असते.

समाजात फूट नको, एकता हवी!
समाजात एकता टिकवून ठेवणे, ही इमामाची सर्वात मोठी जबाबदारी आहे. अल्लाह म्हणतो, "आणि सर्व मिळून अल्लाहच्या दोरीला घट्ट पकडून ठेवा आणि आपापसात फूट पाडू नका." (सुरा अल-इमरान ३:१०३) त्यामुळे इमामाची भाषा नेहमी लोकांना जोडणारी असावी, तोडणारी नसावी. त्याने धार्मिक वाद, राजकीय शत्रुत्व किंवा वैयक्तिक वैमनस्य वाढवण्यापासून स्वतःला दूर ठेवले पाहिजे. याचा अर्थ सत्याशी तडजोड करणे असा अजिबात होत नाही. पण समाजाचे व्यापक हित जपताना अत्यंत हुशारीने आणि शांतपणे सत्य मांडता आले पाहिजे. आधुनिक जगात लोक आधीच अनेक गोष्टींवरून दुभंगलेले आहेत. अशा वेळी मशिद हे असे ठिकाण असले पाहिजे, जिथे मतभेद वाढवण्याऐवजी मने जोडली जातील.
जगातील बहुतांश धर्मांप्रमाणेच इस्लाममध्येही धार्मिक नेतृत्व ही मुख्यत्वे पुरुषप्रधान संकल्पना आहे. इमामाच्या शब्दांना मोठे वजन असते. त्याच्या वागणुकीचा लोकांच्या मनावर खोल परिणाम होतो आणि अनेकदा तो लोकांशी कसा संवाद साधतो, यावरूनच लोक धर्माकडे कसे पाहतात हे ठरते. लोकांचा दृष्टिकोन बदलण्यात तो एक मोठी भूमिका बजावू शकतो. त्यामुळे इमामाच्या भाषणाने इस्लामचा खरा संदेश अधिक सुंदर केला पाहिजे. अनावश्यक कठोरपणा किंवा राजकारण आणून त्याने तो संदेश विकृत करू नये. एक नेता म्हणून इमामाने लोकांना योग्य शब्द आणि विचारांची ताकद दिली पाहिजे. सध्याच्या वास्तव्याशी धर्माची सांगड कशी घालावी, हे त्याने लोकांना शिकवले पाहिजे. लोक अनेकदा प्रवचन विसरतात, पण इमाम त्यांच्याशी कसे बोलले, ही पद्धत ते कधीच विसरत नाहीत.

संवाद जिंकण्यासाठी नाही, मने जिंकण्यासाठी असावा!
अरबी भाषेत 'इमाम' या शब्दाचा अर्थच नेतृत्व असा होतो. पण इस्लाममधील नेतृत्व केवळ राजकीय अधिकारावर चालत नाही. त्यामुळे इमामाचे भाषण - त्याचे 'कलाम' (Kalaam) - हा केवळ एक सामान्य संवाद नसतो. ती एक अमानत (Amanah) असते. ती मने दुखावू शकते किंवा त्यांना जोडू शकते, समाज एकत्र करू शकते किंवा त्यात फूट पाडू शकते. आजच्या सोशल मीडियाच्या (Social Media) काळात, वैचारिक संघर्षात आणि लोकांचा संयम संपत असताना इमामाची भूमिका आणखीनच मोठी झाली आहे. समाजाला केवळ पुस्तकातील ओळी वाचून दाखवणारे विद्वान नकोत, तर त्या शिकवणीचे रूपांतर लोकांच्या आयुष्याशी जोडणाऱ्या शहाणपणात करणारे खरे नेते हवे आहेत.
पवित्र कुराणमध्ये अल्लाह सांगतो: "लोकांना आपल्या पालनकर्त्याच्या मार्गाकडे शहाणपणाने आणि चांगल्या उपदेशाने बोलवा, आणि त्यांच्याशी अत्यंत उत्तम पद्धतीने संवाद साधा." (सुरा अन-नहल १६:१२५) हा श्लोक इस्लामी संवादाचा मुख्य पाया आहे. इमामाचे ध्येय केवळ वाद जिंकणे नसून लोकांची मने जिंकणे हे असले पाहिजे. यासाठी श्रोते, त्यांची परिस्थिती, त्यांचे संघर्ष आणि त्यांच्या समजुतीची पातळी ओळखणे अत्यंत गरजेचे आहे.
मशिदीत येणारे अनेक लोक आधीच कुटुंबाच्या समस्या, आर्थिक अडचणी, भावनिक ताण आणि आध्यात्मिक गोंधळात अडकलेले असतात. जर इमामाने त्यांच्याशी कठोर शब्दांत आणि गर्विष्ठपणे संवाद साधला, तर ते लोक धर्मापासून आणखी दूर जातील. पण जर त्याने प्रेमाने आणि समजुतीने संवाद साधला, तर तो त्यांच्यासाठी आशेचा एक मोठा किरण बनतो. इस्लाममधील संवादाचा उद्देश कधीही कोणाचा अपमान करणे हा नसतो, तर लोकांमध्ये चांगले परिवर्तन घडवणे हाच असतो.
कठोरतेपेक्षा प्रेमात मोठी ताकद!
प्रभावी संवादाचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे अल्लाहचे प्रेषित! प्रेषितांना त्यांच्या काळात प्रचंड विरोध, टिंगलटवाळी आणि छळाचा सामना करावा लागला. तरीही त्यांच्या बोलण्यात कायम एक विलक्षण मृदुता होती. अल्लाह म्हणतो: "हे अल्लाहच्या कृपेनेच आहे की तुम्ही त्यांच्याशी सौम्यपणे वागता. जर तुम्ही कठोर आणि निर्दयी असता, तर ते तुमच्यापासून दूर गेले असते." (सुरा अल-इमरान ३:१५९)
या श्लोकात प्रत्येक इमामासाठी एक कायमस्वरूपी धडा आहे. लोक नेहमीच दयाळूपणाकडे आकर्षित होतात आणि कठोरपणापासून दूर पळतात. जो इमाम सतत लोकांवर टीका करतो आणि त्यांना कमी लेखतो, त्याला कदाचित लोकांचे लक्ष मिळेल. पण लोकांचे प्रेम आणि विश्वास जिंकणे त्याला कधीच जमणार नाही. सौम्यपणा हा कधीही कमकुवतपणा नसतो, तर ते सामर्थ्य आणि परिपक्वतेचे मोठे लक्षण आहे.
यशस्वी धार्मिक नेतृत्वाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे लोकांशी बोलण्यापूर्वी त्यांना समजून घेणे. मशिदीत येणाऱ्या लोकांमध्ये मोठे विद्वान, मजूर, विद्यार्थी, व्यावसायिक, वृद्ध, महिला आणि तरुण अशा सर्वांचाच समावेश असतो. त्यांच्या समस्याही वेगवेगळ्या असतात. त्यामुळे एका इमामाने स्वतःला कायम काही प्रश्न विचारले पाहिजेत. लोक कोणत्या आव्हानांचा सामना करत आहेत? त्यांच्या मनात कोणते प्रश्न आहेत? कोणत्या सामाजिक प्रश्नांवर मार्गदर्शनाची गरज आहे? आणि इस्लामी शिकवणी त्यांच्या खऱ्या आयुष्याशी कशी जोडता येईल?

लोकांच्या प्रत्यक्ष आयुष्याशी जोडले न गेलेले प्रवचन कधीही बदल घडवू शकत नाही. अनेकांना वाटते की इमामाचे काम फक्त बोलणे आहे. पण खऱ्या नेतृत्वाची सुरुवात नेहमी ऐकण्यापासून होते. लोक फक्त धार्मिक प्रश्नांसाठीच नव्हे, तर भावनिक आधारासाठीही इमामाकडे येतात. जो इमाम काळजीपूर्वक लोकांचे ऐकतो, तो त्यांचा विश्वास जिंकतो.
गर्वाचे घर खाली आणि कृतीतून सिद्ध व्हावे नेतृत्व!
ज्ञान हा एक आशीर्वाद आहे, पण जेव्हा त्यातून गर्व निर्माण होतो, तेव्हा ते विनाशाचे कारण बनते. इमामाने आपण इतर सर्वांपेक्षा नैतिकदृष्ट्या श्रेष्ठ आहोत, असा समज कधीच करून देऊ नये. लोक नेहमी नम्र आणि सहज संवाद साधता येणाऱ्या विद्वानांचा आदर करतात. जेव्हा एखादा इमाम आपणच बरोबर आणि बाकी सर्व चुकीचे आहेत, अशा थाटात बोलतो, तेव्हा तो समाज आणि स्वतःमध्ये एक मोठी दरी निर्माण करतो. नम्रतेमुळे लोक कोणतीही भीती न बाळगता त्याच्याकडे येऊ शकतात.
अनेक लोक अपराधीपणाच्या भावनेने झगडत असतात. इमामाच्या बोलण्यातून आशेचे दरवाजे बंद होण्याऐवजी उघडले गेले पाहिजेत. इमामाची विश्वासार्हता फक्त त्याच्या शब्दांतून नाही, तर त्याच्या चारित्र्यातून येते. अल्लाह विचारतो: "तुम्ही स्वतः धर्मग्रंथाचे पठण करता आणि इतरांना नीतिमत्तेचा आदेश देता, पण स्वतःला विसरता का?" (सुरा अल-बकरा २:४४). जेव्हा कृती आणि शब्दांत फरक असतो, तेव्हा लोकांचा विश्वास उडतो. मशिदीच्या आत आणि बाहेर इमामाची वागणूक कशी आहे, यावर लोकांचे बारीक लक्ष असते.
तरुणांशी जोडा आणि समाजाच्या हितासाठी काम करा!
आजच्या तरुण पिढीसमोरील आव्हाने पूर्णपणे वेगळी आहेत. सोशल मीडिया, ओळखीचा संघर्ष, मानसिक आरोग्य आणि सतत होणारा विचारांचा भडीमार यामुळे समाज पूर्णपणे बदलून गेला आहे. इमामाने तरुणांशी संवाद साधताना त्यांच्यावर टीका न करता त्यांना समजून घेतले पाहिजे. मशिदीने जर तरुणांशी संपर्क गमावला, तर समाज आपल्या पुढच्या पिढ्या गमावण्याच्या मोठ्या धोक्यात येईल.
इमामाचा प्रभाव केवळ मशिदीपुरता मर्यादित राहता कामा नये. त्याने समाज कल्याण, शिक्षण, सामाजिक सलोखा आणि मानवतावादी कार्यात हिरीरीने सहभागी झाले पाहिजे. इमामाने जेव्हा समाजाची सेवा केली, तेव्हाच त्याच्या शब्दांना खरे वजन प्राप्त होईल. त्याचे प्रवचन केवळ पुस्तकी न राहता, ते खऱ्या मूल्यांचे प्रतिबिंब बनेल.
इमामाचे 'कलाम' ही अल्लाह आणि समाजाप्रती असलेली ती एक खूप मोठी जबाबदारी आहे. त्याचे प्रत्येक प्रवचन, प्रत्येक संवाद आणि प्रत्येक सल्ला लोकांची मने आणि त्यांचे आयुष्य बदलण्याची मोठी ताकद ठेवतो!
(लेखक डॉ. नसीम अख्तर हे बिहार राज्य मदरसा शिक्षण मंडळाचे एक प्रतिष्ठित इस्लामिक विद्वान आहेत.)