मशिदीतील जिमपासून ते रोजगार निर्मितीपर्यंत: मुस्लिम समुदायाचे प्रेरणादायी उपक्रम!

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 2 h ago
एआय निर्मित इमेज
एआय निर्मित इमेज

 

सबिहा फातिमा बेगम

भारतात सध्या एक अतिशय सकारात्मक चित्र पाहायला मिळत आहे. मुस्लिम संस्था आणि समुदाय स्थानिक प्रश्नांवर आता अत्यंत व्यावहारिक उत्तरे शोधत आहेत. आरोग्य, शिक्षण, कुटुंब कल्याण आणि धार्मिक समावेशकता अशा अनेक आघाड्यांवर हे काम सुरू आहे. परंपरा आणि समाजसेवा हातात हात घालून कशा चालू शकतात, याचे हे एक उत्तम उदाहरण आहे. देशाच्या विविध भागांतील हे उपक्रम सर्वत्र राबवल्यास समाजाच्या भल्यासाठी त्याचा मोठा फायदा होऊ शकतो.

या बदलाची सुरुवात एका चिंताजनक सर्वेक्षणातून झाली. राजेंद्रनगरच्या 'वाडी-ए-महमूद' परिसरातील झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या महिलांमध्ये जीवनशैलीशी संबंधित आजारांचे प्रमाण खूप वाढल्याचे समोर आले. अर्ध्याहून अधिक महिलांना 'कार्डिओमेटाबोलिक सिंड्रोम'चा धोका होता. तसेच अनेक जणी लठ्ठपणा, पीसीओडी (PCOD), मधुमेह, उच्च रक्तदाब आणि थायरॉईडसारख्या आजारांनी त्रस्त होत्या. यावर केवळ वैद्यकीय उपचार पुरेसे नव्हते. महिलांना नियमित व्यायाम आणि प्रतिबंधात्मक काळजी घेण्यासाठी एका सुरक्षित जागेची गरज होती. मशिदीच्या आत महिलांसाठी जिम असू शकते, असा विचारही कोणी केला नसेल. पण २०२१ मध्ये तेलंगणातील 'मस्जिद-ए-मुस्तफा'ने महिलांसाठी पहिले 'वेलनेस सेंटर' आणि 'जिम' सुरू केले. तिथे एक व्यावसायिक ट्रेनर, आरोग्य सल्लागार आणि डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली. एका प्रार्थनास्थळाचे रूपांतर आता आरोग्याची काळजी घेणाऱ्या एका विश्वासार्ह केंद्रात झाले आहे. तिथे अतिशय सुरक्षित वातावरणात फिटनेस, आरोग्य तपासणी आणि जीवनशैलीविषयी समुपदेशन दिले जाते.

हे केवळ एकाच ठिकाणी घडत नाहीये. अशा अनेक कल्पक आणि नावीन्यपूर्ण गोष्टी विविध ठिकाणी पाहायला मिळतात. मुंबईतील धारावी झोपडपट्टीत मुस्लिम तरुणांनी 'प्लास्टिक रिसायकलिंग कोऑपरेटिव्ह' सुरू केले आहेत. कचरा गोळा करण्याच्या कामाचे रूपांतर त्यांनी एका शाश्वत उद्योगात केले आहे. यातून कचऱ्याचा भार कमी झाला असून अनेकांना रोजगारही मिळाला आहे. किनारी भागात राहणाऱ्या स्थानिक मच्छिमार समुदायांनीही पर्यावरण संरक्षण आणि उत्पन्नाच्या सुरक्षेसाठी कांदळवन (Mangrove) संवर्धनाचे मोठे काम हाती घेतले आहे.

दक्षिण आशियात अनेक पिढ्यांपासून महिलांना मशिदीत जाण्यास मज्जाव होता. खुद्द प्रेषितांच्या काळात महिला मशिदीत प्रार्थना करत असत आणि सामाजिक जीवनातही सहभागी होत असत. हाच ऐतिहासिक वारसा पुन्हा मिळवण्यासाठी कोलकाता येथील 'मुस्लिम वुमेन्स स्टडी सर्कल'ने २०२० मध्ये देशभरात 'मशिदीत मुस्लिम महिला' ही चळवळ सुरू केली. या चळवळीच्या संस्थापिका सानिया मरियम यांनी यामागची प्रेरणा स्पष्ट केली. "इतिहासाकडे परत जाणे, हा यामागचा मुख्य उद्देश होता," असे त्या म्हणाल्या. त्यांनी मदिनेतील 'मस्जिद अन-नबवी' मधील महिलांच्या सक्रिय भूमिकेचा दाखला दिला.

या चळवळीने आतापर्यंत १५० हून अधिक महिला-स्नेही मशिदींची नोंद केली आहे. त्यांनी अनेक हेरिटेज वॉक आयोजित केले आहेत. देशभरात महिलांसाठी सामुदायिक प्रार्थना आयोजित केल्या आहेत. महिलांसाठी मशिदीत स्वतंत्र जागा निर्माण करण्यासाठी त्यांनी मशिदींच्या प्रमुखांशी यशस्वी चर्चाही केली आहे. सामाजिक कार्यकर्त्या असरा नोमानी यांनी यावर अत्यंत स्पष्ट मत मांडले. "आजकाल मशिदीत प्रार्थना करणे निषिद्ध मानले जाते. इस्लामच्या चुकीच्या आणि प्रतिगामी व्याख्यांनी महिलांच्या अधिकारांवर गदा आणली आहे. प्रत्यक्षात सातव्या शतकातच इस्लामने महिलांना हे अधिकार दिले होते," असे नोमानी यांनी सांगितले.

अनेक महिलांसाठी हा अनुभव खूप भावूक करणारा आहे. अनेक जणी आयुष्यात पहिल्यांदाच मशिदीत पाऊल ठेवतात. त्यांना केवळ प्रार्थनेची जागा मिळत नाही, तर आपलेपणाची भावनाही मिळते. या कथा ऑनलाइन शेअर करून ही चळवळ मशिदीत जाण्यातील अडथळे दूर करत आहे आणि महिलांचा आत्मविश्वास वाढवत आहे.

प्रत्येक जखम बाहेरून दिसत नाही. अनेक मशिदी आता प्रार्थना आणि शारीरिक आरोग्यापलीकडे जाऊन लोकांच्या भावनिक समस्या सोडवण्याचे काम करत आहेत. विवाह आणि कौटुंबिक जीवनात निर्माण होणारा ताण दूर करण्यासाठी पुढाकार घेतला जात आहे. देशभरातील अनेक मशिदी, स्थानिक इमाम आणि सामाजिक संस्था आता इस्लामी शिकवणीवर आधारित समुपदेशन आणि कौटुंबिक मार्गदर्शन करत आहेत. जोडप्यांमधील वाद सोडवणे, त्यांच्यातील संवाद सुधारणे आणि एकमेकांचे हक्क व जबाबदाऱ्या समजावून सांगणे, हा या सेवांचा मुख्य उद्देश आहे. कौटुंबिक नातेसंबंध टिकवण्यावर यात भर दिला जातो. 'खुश्तार'सारखे कार्यक्रम आरोग्य सेवेद्वारे मानसिक आणि शारीरिक कल्याण साधतात. तर 'हेल्पिंग हँड फाउंडेशन' (HHF) सारख्या संस्था आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या कुटुंबांना समुपदेशनासोबतच व्यावहारिक मदतही पुरवतात.

सामाजिक परिवर्तनासाठी शिक्षण हे एक अत्यंत प्रभावी माध्यम बनले आहे. केरळमधील 'मापिल्ला मुस्लिम' समुदायाने मदरशांमध्ये धार्मिक शिक्षणासोबतच आधुनिक शिक्षणाचीही सांगड घातली आहे. याचा परिणाम म्हणून तिथे साक्षरतेचे प्रमाण ९० टक्क्यांच्या वर गेले आहे. उच्च शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये महिलांचा सहभाग लक्षणीयरीत्या वाढला आहे. दुसरीकडे, 'रहकानी३०' (Rahmani30) सारखे उपक्रम इंजिनिअरिंग, मेडिकल आणि नागरी सेवा परीक्षांची तयारी करणाऱ्या गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी मोफत निवासी कोचिंगची सोय करत आहेत. यातून अनेक विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण आणि चांगल्या करिअरच्या संधी मिळाल्या आहेत.

तळागाळातूनही अनेक नवनवीन उपक्रम राबवले जात आहेत. हैदराबाद आणि आजूबाजूच्या परिसरात तरुण मुस्लिम स्वयंसेवकांनी मानसिक आरोग्याबाबत जनजागृती मोहीम सुरू केली आहे. कोलकात्याच्या राजाबाजार आणि पार्क सर्कस झोपडपट्टीत मुस्लिम तरुणांनी चक्क 'सायकल-कार्ट मोबाईल लायब्ररी' (फिरते ग्रंथालय) सुरू केली आहे. शेकडो पुस्तके असलेली ही सायकल झोपडपट्टीतील मुलांपर्यंत पोहोचते. तिथे मुलांसाठी वाचन सत्रे आयोजित केली जातात. वाचनालय नसलेल्या ठिकाणी मुलांच्या दारात पुस्तके पोहोचवणारे हे एक अत्यंत कल्पक आणि कमी खर्चाचे मॉडेल आहे.

हा सामाजिक बांधिलकीचा वसा केवळ वर्गांपुरता मर्यादित नाही. WIRSA आणि IMRC सारख्या संस्था विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देणे, अनाथांची काळजी घेणे आणि कौशल्य विकास कार्यक्रम राबवण्याचे मोठे काम करत आहेत. अनेकदा ते सरकारी उपक्रमांनाही मोलाची साथ देतात. परस्परांना मदत करण्याच्या जुन्या परंपरेसोबतच, तातडीची मदत आणि दीर्घकालीन सामाजिक प्रगतीसाठी ही अत्यंत महत्त्वाची गुंतवणूक आहे.

हे उपक्रम जरी स्थानिक पातळीवर सुरू असले, तरी त्यांचे महत्त्व खूप मोठे आहे. प्रसारमाध्यमे आणि संशोधनामुळे या प्रयत्नांना मोठी ओळख मिळत आहे. यातून जगाला एक नवीन प्रेरणा मिळतेय. मुस्लिम नागरिक अनपेक्षित ठिकाणीही नावीन्यपूर्ण काम करून सामाजिक प्रभाव निर्माण करत आहेत. फ्रान्समध्ये जेआर (JR) यांनी सार्वजनिक जागांचे रूपांतर संवादाच्या मंचावर केले आहे. त्यासाठी त्यांनी विशाल छायाचित्रांचा वापर केला आहे.

हसन मिन्हाज याने 'पॅट्रियट अॅक्ट' (Patriot Act) या आपल्या शोमधून सार्वजनिक धोरणे आणि जागतिक प्रश्नांवर व्यंगात्मक पद्धतीने भाष्य केले. या शोला एमी आणि पीबॉडी पुरस्कारही मिळाले आहेत. ऑलिम्पिक विजेता खेळाडू मो फराह याने आपल्या यशाचा उपयोग तरुणांना प्रेरणा देण्यासाठी आणि धर्मादाय कामांसाठी केला आहे. व्यावसायिक क्षेत्रात, मलेशियन उद्योजक टोनी फर्नांडिस यांनी 'एअर एशिया'च्या माध्यमातून आग्नेय आशियात अत्यंत स्वस्त विमान प्रवास शक्य करून दाखवला. लाखो लोकांसाठी विमान प्रवास आता आवाक्यात आला आहे.

हेही वाचा: भारतीय इस्लामी विचारवंत: संपूर्ण जगाला दिशा देणारे नेतृत्व!

हैदराबादच्या मशिदीतील जिम असो, कोलकात्याच्या झोपडपट्टीतील सायकल लायब्ररी असो, धारावीतील रिसायकलिंग कोऑपरेटिव्ह असो किंवा सार्वजनिक चर्चेला आकार देणारे जागतिक आवाज असोत, हे सर्व उपक्रम एक अत्यंत सखोल सत्य समोर आणतात. कृतीतून जगलेला धर्म हा सर्जनशीलता, करुणा आणि मानवी प्रगतीची एक मोठी ताकद बनतो. आधुनिक जगात समाज, लवचिकता आणि सेवा कशी असू शकते, याचे एक नवे चित्र सामान्य मुस्लिम नागरिक रेखाटत आहेत. खऱ्या बदलाची सुरुवात मोठ्या घोषणांनी होत नाही, तर इतरांच्या सेवेसाठी उचललेल्या छोट्या आणि धाडसी पावलांनी होते. यातून ते केवळ बदलत्या काळाशी जुळवून घेत नाहीत, तर सर्वांसाठी एक अधिक समावेशक आणि आशादायी भविष्यही घडवत आहेत.