मोहम्मद अली शाह
काही व्यवसाय आपल्याला पैसा देतात. काही व्यवसाय समाजात प्रतिष्ठा मिळवून देतात. पण असे काही मोजकेच मार्ग आहेत, त्यातून जगण्याला एक सखोल अर्थ प्राप्त होतो. भारतीय सशस्त्र दलात सेवा करणे हा असाच एक पवित्र मार्ग आहे.
मी एका अशा कुटुंबातून आलो आहे, तिथे लष्करी सेवा ही एक पिढ्यानपिढ्या चालत आलेली परंपरा आहे. माझे वडील मेजर जनरल जमीरउद्दीन शाह देशाच्या लष्करातील दुसऱ्या सर्वोच्च पदावरून निवृत्त झाले. ते लेफ्टनंट जनरल आणि लष्कर उपप्रमुख म्हणून निवृत्त झाले. मी स्वतः 'शॉर्ट सर्व्हिस कमिशन' पूर्ण केले. मला या गोष्टीचा सार्थ अभिमान आहे. माझे काका लष्करात होते. माझे मेहुणे कमोडोर रिझवान अली शाह काही महिन्यांपूर्वीच नौदलातून निवृत्त झाले. माझ्या चुलत बहिणीचे पती भारतीय हवाई दलात सेवा करत आहेत. याच पार्श्वभूमीवरून मला आपल्या देशातील मुस्लिम तरुणांना एक खास सल्ला द्यायचा आहे.
.jpeg)
एअर चीफ मार्शल लतीफ
नोकरी नव्हे, देशाप्रती असलेली बांधिलकी
लष्करात सेवा करणे ही केवळ एक नोकरी नाही. ही देशाप्रती असलेली एक बांधिलकी आहे. लाखो लोकांच्या रक्षणाचे ते एक वचन आहे. हा एक असा प्रवास आहे, यातून सामान्य तरुण धैर्य, त्याग आणि सन्मानाचे प्रतीक बनतात. आजच्या अनिश्चितता, ताणतणाव आणि गोंधळाने भरलेल्या जगात, सशस्त्र दल आजच्या तरुणांना एक अनमोल गोष्ट देतात. ती अनमोल गोष्ट म्हणजे 'जीवनाचा उद्देश' किंवा "पर्पज".
भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दल केवळ सैनिक घडवत नाहीत. ते माणसाचे चारित्र्य घडवतात. ते तरुणांना शिस्त, लवचिकता, स्वाभिमान आणि नेतृत्व शिकवतात. भीतीवर मात करून कठीण प्रसंगातही खंबीरपणे कसे उभे राहावे, हे तरुण येथे शिकतात.

लेफ्टनंट जनरल (निवृत्त) जमीर उद्दीन शाह
मुस्लिम तरुणांसाठी भारतीय सशस्त्र दल एक शक्तिशाली माध्यम आहे. 'देशभक्तीला कोणताही धर्म नसतो' याची ही एक कायमस्वरूपी आठवण आहे. एकदा अंगावर लष्करी गणवेश चढवला, तिथे कोणताही हिंदू, मुस्लिम, शीख किंवा ख्रिश्चन नसतो. तिथे सर्वांची फक्त एकच ओळख असते. ती ओळख म्हणजे 'भारतीय'.
विविधतेतील एकतेचे जिवंत उदाहरण
भारतीय लष्कर हे नेहमीच 'विविधतेतील एकतेचे' एक उत्तम उदाहरण राहिले आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेले तरुण-तरुणी एकत्र प्रशिक्षण घेतात. ते एकत्र जेवतात, एकत्र लढतात आणि वेळ पडल्यास देशासाठी एकत्र बलिदानही देतात. सर्वात कठीण परिस्थितीत एखाद्याचा धर्म किंवा आडनाव महत्त्वाचे नसते. तिथे फक्त निष्ठा, धैर्य आणि बंधुभाव महत्त्वाचा असतो.
.jpeg)
लेफ्टनंट जनरल (निवृत्त) सय्यद अता हसनैन, बिहारचे राज्यपाल
आज समाजात अनेकदा भेदाभेद ठळकपणे समोर येतात. अशा वेळी सशस्त्र दले भारताचा खरा आत्मा दाखवून देतात. लोक एकत्र उभे राहतात, तिथेच देश बलवान होतो, हे ते सिद्ध करतात. मुस्लिम तरुणांसाठी लष्करात सामील होणे ही केवळ एका सन्माननीय आणि स्थिर करिअरची संधी नाहीये. देशासाठी योगदान देण्याची आणि भारताच्या कल्पनेला बळकट करण्याची ती एक सुवर्णसंधी आहे. इथे प्रत्येक नागरिक समान आहे.
लष्करी गणवेशाची प्रतिष्ठा
लष्करी गणवेश घालण्यात एक वेगळीच प्रतिष्ठा आहे. सैनिकांना दिला जाणारा सन्मान इतर कोणत्याही गोष्टीसारखा नसतो. एखादा सैनिक गणवेशात चालताना लोक त्याची संपत्ती किंवा सामाजिक दर्जा पाहत नाहीत. ते त्याचा त्याग पाहतात. ते त्याची शिस्त पाहतात. स्वतःच्या आरामापेक्षा देशाला प्राधान्य देणारा व्यक्ती ते पाहतात. हा सन्मान पैशाने विकत घेता येत नाही. तो सन्मान केवळ सेवा आणि धैर्याने मिळवावा लागतो.
सशस्त्र दले तरुणांना त्यांचे संपूर्ण भविष्य घडवणाऱ्या अनेक संधी देतात. ते आर्थिक सुरक्षितता, जागतिक दर्जाचे प्रशिक्षण, उत्तम आरोग्यसेवा, शिक्षण आणि साहस देतात. कोणी 'स्पेशल फोर्सेस'मध्ये सामील होवो, तांत्रिक शाखेत जावो, वैद्यकीय क्षेत्रात किंवा उड्डाण शाखेत जावो. लष्कर हे नेतृत्व आणि उत्कृष्टतेचे दरवाजे उघडे करते.
.jpeg)
लेफ्टनंट जनरल (निवृत्त) एम. ए. झाकी
लष्कर तरुणांना एक अतुलनीय आंतरिक ताकद देते. आज अनेक तरुण स्वतःवर शंका घेतात आणि एकटेपणाने लढत असतात. अनेक यश मिळवूनही ते दिशाहीन वाटतात. लष्कर हे चित्र बदलते. ते तरुणांना त्यांच्या क्षमतेच्या पलीकडे जाऊन काम करण्यास भाग पाडते. स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवते. स्वतःपेक्षा एका उदात्त उद्दिष्टासाठी काम करायला आणि धैर्याने जीवनाला सामोरे जायला शिकवते.
मुस्लिम योद्ध्यांचा अभिमानास्पद इतिहास
भारताला असा एक अभिमानास्पद इतिहास लाभला आहे. मुस्लिम योद्ध्यांनी येथे धैर्याने देशाची सेवा केली आहे. रणांगणापासून ते शांतता मोहिमांपर्यंत, असंख्य मुस्लिम सैनिकांनी आणि अधिकाऱ्यांनी सन्मानाने देशाचे रक्षण केले आहे. त्यांच्या या शौर्यकथा आपल्याला एक संदेश देतात. मातृभूमीवरील प्रेम हे प्रत्येक भिंतीच्या पलीकडे असते, हा तो संदेश आहे.
त्यांची बलिदाने भारताच्या आत्म्यात कायमची गुंफलेली आहेत. कंपनी क्वार्टर मास्टर हवालदार (CQMH) मीर अब्दुल हमीद यांना मरणोत्तर परमवीर चक्र मिळाले. नौशेराचे सिंह ब्रिगेडियर उस्मान, कारगिल युद्धातील वीर चक्र विजेते लेफ्टनंट हनीफउद्दीन अशी कितीतरी नावे सांगता येतील. ही यादी न संपणारी आहे. या शूरवीरांनी देशासाठी आपले सर्वस्व अर्पण केले.
भेदभावाचा गैरसमज आणि वास्तव
लष्करात मुस्लिम अधिकाऱ्यांबद्दल काही भेदभाव आहे, असा विचार काही लोक करतात. त्यांना मला एक स्पष्ट उत्तर द्यायचे आहे. सशस्त्र दले ही एकमेव अशी स्वच्छ आणि धर्मनिरपेक्ष संघटना आहे. तिथे कोणीही तुमचा धर्म विचारत नाही. तुम्ही काही दिग्गज आणि वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांची उदाहरणे पाहू शकता.
हेही वाचा: भारतीय मुस्लिमांसमोर प्रगतीचा रोडमॅप काय असू शकतो?
माजी हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल इद्रिस हसन लतीफ यांचे नाव आघाडीवर आहे. जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाचे माजी कुलगुरू लेफ्टनंट जनरल एम. ए. झकी, लेफ्टनंट जनरल सामी खान, लेफ्टनंट जनरल जलील महमूद यांची उदाहरणे आपल्यासमोर आहेत. लष्कर उपप्रमुख आणि अलिगढ मुस्लिम विद्यापीठाचे माजी कुलगुरू लेफ्टनंट जनरल जमीरउद्दीन शाह तसेच बिहारचे विद्यमान राज्यपाल लेफ्टनंट जनरल सय्यद अता हसनैन ही काही ठळक नावे आहेत. अशी अनेक उदाहरणे देता येतील. या सर्व अधिकाऱ्यांनी आपल्या कर्तृत्वाने देशाची मान उंचावली आहे.
एका अर्थपूर्ण जीवनाची निवड
भारतीय सशस्त्र दले केवळ संरक्षण संस्था नाहीत. त्या देशभक्ती, शिस्त आणि मानवतेच्या शाळा आहेत. राष्ट्राची ताकद त्याच्या विभाजनात नसून एकतेमध्ये आहे, याची आठवण ते करून देतात. लष्करात सामील होणे म्हणजे केवळ एक व्यवसाय निवडणे नव्हे. ती एका अर्थपूर्ण जीवनाची निवड आहे. आपल्या अस्तित्वाचा काहीतरी हेतू आहे, हे जाणून दररोज सकाळी उठणे यात सामावले आहे. स्वतःपेक्षा एका उदात्त गोष्टीचा भाग बनण्याची ही प्रक्रिया आहे.
आज अनेक तरुण ओळख, सन्मान आणि जगण्याचा उद्देश शोधत आहेत. त्यांच्यासाठी भारतीय सशस्त्र दल हा सर्वात उदात्त मार्ग आहे. काही लोक केवळ स्वतःसाठी जगतात. पण काही जण देशासाठी जगणे निवडतात. देशासाठी जगण्याचा हा मार्ग खऱ्या अर्थाने प्रेरणादायी आहे.
(लेखक मेजर (निवृत्त) मोहम्मद अली शाह हे माजी भारतीय लष्करी अधिकारी, प्रेरक वक्ते आणि संरक्षण विश्लेषक आहेत.)