भारतात धर्माच्या आधारावर भेदभाव नाही; मोहम्मद सिराज वादावर किरेन रिजिजू यांचे स्पष्टीकरण

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 11 h ago
किरेन रिजिजू आणि मोहम्मद सिराज
किरेन रिजिजू आणि मोहम्मद सिराज

 

नवी दिल्ली

न्यूझीलंडविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी सामन्याच्या अंतिम अकरा खेळाडूंतून वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला वगळल्यावरून सुरू झालेल्या वादावर अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी स्पष्टीकरण दिले आहे. भारतात कोणावरही धर्माच्या आधारावर भेदभाव किंवा अन्याय होत नाही, असे रिजिजू यांनी सांगितले. सहारनपूरचे खासदार आणि उत्तर प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष इम्रान मसूद यांनी नावामुळे सिराजला संधी न मिळाल्याचा आरोप केल्यानंतर रिजिजू यांनी ही प्रतिक्रिया दिली.

मसूद यांच्या विधानाबाबत पत्रकारांनी विचारले असता रिजिजू म्हणाले, "येथे कोणावरही धर्माच्या आधारावर भेदभाव किंवा दुर्लक्ष केले जात नाही. आपल्या देशात गुणवत्तेच्या आधारावर संधी मिळतात." कोणाचा धर्म किंवा जात याचा याच्याशी संबंध नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

राजकीय प्रतिक्रिया आणि राजकीय भूमिका

"कोणाला असे वाटत असेल, तर ते योग्य नाही. आपण सर्व एक आहोत आणि आपले 'सबका साथ, सबका विकास' व 'एक भारत श्रेष्ठ भारत' हे ध्येय आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले आहे. त्यामुळे जात किंवा धर्माच्या आधारावर फूट पाडण्याची गरज नाही," असे रिजिजू म्हणाले.

मसूद यांच्या विधानावरून काँग्रेसवर टीका करताना भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रदीप भंडारी यांनी 'एक्स'वर म्हटले, "काँग्रेस पक्षाची लाज वाटते! काँग्रेस पक्षाने व्होट बँकेच्या राजकारणातून भारतीय क्रिकेट संघालाही सोडले नाही! काँग्रेस पक्ष जातीयवादी आहे!" "भारतीय जर्सी परिधान करणारी व्यक्ती भारतीय असते! काँग्रेस पक्ष भारताच्या राष्ट्रीय हितापेक्षा नेहमी व्होट बँकेचे राजकारण निवडतो," असे ते म्हणाले.

संघ निवडीवर माजी खेळाडू आणि प्रशिक्षकांचे मत

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी मोहम्मद सिराजला अंतिम अकरा जणांत स्थान न मिळाल्याने सुनील गावस्कर आणि रवी शास्त्री यांनी प्रश्न उपस्थित केले होते. संघ व्यवस्थापनाने या वेगवान गोलंदाजाच्या अनुभवाचा विचार करायला हवा होता, असे दोघांनी म्हटले होते.

जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखाली भारताने चार वेगवान गोलंदाजांची निवड केली. प्रसिद्ध कृष्णा, आकाश दीप आणि अंशुल कंबोज हे इतर तीन गोलंदाज संघात होते. सिराजची निवड न होणे गोंधळात टाकणारे असल्याचे गावस्कर यांनी म्हटले. तर अनुभव आणि कामाची वृत्ती पाहता सिराज संघात असायला हवा होता, असे शास्त्री यांनी सोशल मीडियावर नमूद केले.

मात्र, पहिल्या कसोटीसाठी अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला बाहेर ठेवण्याच्या निर्णयाचा भारताचे फलंदाजी प्रशिक्षक सीतांशू कोटक यांनी बचाव केला. केवळ पहिला दिवस न पाहता सामन्याचे सर्व पाच दिवस लक्षात घेऊन ही संघरचना निवडली असल्याचे कोटक यांनी सांगितले.