नवी दिल्ली
नेपाळचे पंतप्रधान बालेंद्र शाह २२ नोव्हेंबर रोजी दोन दिवसांच्या अधिकृत भारत दौऱ्यावर नवी दिल्लीला रवाना होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून हा दौरा होत आहे. परराष्ट्र मंत्रालयाने शुक्रवारी ही माहिती दिली. २७ मार्च रोजी पदभार स्वीकारल्यानंतर शाह यांचा हा पहिला अधिकृत द्विपक्षीय परदेश दौरा आहे. सप्टेंबरमध्ये त्यांनी संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेसाठी अमेरिकेचा दौरा केला होता.
परराष्ट्र सचिव अमृत बहादूर राय यांनी माध्यमांना सांगितले की, ३६ वर्षीय शाह यांच्या नेतृत्वाखाली ३४ सदस्यीय शिष्टमंडळ भारतात येईल. यामध्ये अर्थमंत्री स्वर्णिम वाग्ले आणि परराष्ट्र मंत्री शिशिर खनाल यांचा समावेश आहे. पंतप्रधानांचे मुख्य सल्लागार कुमार ब्यंजणकर आणि इतर वरिष्ठ अधिकारीही त्यांच्यासोबत असतील.
दौऱ्यादरम्यान शाह राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतील. तसेच पंतप्रधान मोदी यांच्यासोबत शिष्टमंडळ स्तरावर चर्चा करतील. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर शाह यांची सदिच्छा भेट घेतील, असे परराष्ट्र सचिवांनी स्पष्ट केले.
परराष्ट्र मंत्रालयाच्या निवेदनानुसार, दोन्ही देशांमधील कनेक्टिव्हिटी वाढवण्यावर चर्चा होईल. ऊर्जा सहकार्याशी संबंधित विविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि नवीन प्रकल्पांची पायाभरणीही या दौऱ्यात होईल. व्यापार, पारगमन, ऊर्जा, गुंतवणूक, कनेक्टिव्हिटी जाळे आणि पायाभूत सुविधा विकासाद्वारे आर्थिक सहकार्य वाढवण्यावर उच्चस्तरीय बैठकीत लक्ष केंद्रित केले जाईल.
द्विपक्षीय बैठकांदरम्यान शिक्षण, आरोग्य, कृषी, अवकाश, आपत्ती व्यवस्थापन आणि मानव संसाधन विकास या क्षेत्रांत सामंजस्य करार (MoU) होतील. यातून प्राधान्याच्या क्षेत्रांत परस्पर सहकार्य अधिक वाढेल, असे परराष्ट्र सचिव राय यांनी सांगितले. दोन्ही पंतप्रधान द्विपक्षीय संबंधांच्या सर्व पैलूंवर चर्चा करतील. २३ नोव्हेंबर रोजी दोन दिवसांचा अधिकृत दौरा आटोपून ते मायदेशी परततील. पंतप्रधानांच्या शिष्टमंडळासोबत एक स्वतंत्र व्यापारी शिष्टमंडळही भारतात येणार आहे.
राष्ट्रीय स्वतंत्र पक्षाच्या नेत्याच्या नेतृत्वाखालील सरकार मार्चमध्ये स्थापन झाल्यावर शाह यांना मोदींचे निमंत्रण मिळाले होते. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये तरुणांच्या नेतृत्वाखालील 'जेन झी' आंदोलनाने के. पी. शर्मा ओली यांचे सरकार कोसळल्यानंतर सुमारे सहा महिन्यांनी हे सरकार आले होते. नवनिर्वाचित नेपाळी पंतप्रधानांनी पहिला अधिकृत द्विपक्षीय परदेश दौरा भारतासाठी करण्याची जुनी परंपरा आहे. मात्र हा कठोर नियम नाही. माजी पंतप्रधान ओली यांनी २०२४ मध्ये प्रथम चीनचा दौरा करत ही परंपरा मोडली होती.