नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्या एससीओ सभ्यता संवाद मंचाच्या उद्घाटन सोहळ्याला हजेरी लावली. या प्रदेशाचा समृद्ध आणि परस्पर जोडलेला सांस्कृतिक वारसा साजरा करणे, लोकांमधील संपर्क वाढवणे आणि आंतर-सांस्कृतिक संवाद व सहकार्याला चालना देणे हा या मंचाचा उद्देश आहे. नवी दिल्लीतील ऐतिहासिक पुराणा किल्ला येथे तीन दिवसांचा हा कार्यक्रम होत आहे. पाकिस्तानचे मंत्री मुसादिक मलिक यांच्यासह विविध एससीओ सदस्य देशांचे प्रतिनिधी या कार्यक्रमाला उपस्थित आहेत.
उद्घाटन सोहळ्यापूर्वी पंतप्रधान मोदींनी प्रदर्शनांना भेट दिली. 'महाभारत स्क्रोल पॅव्हेलियन - अनंत: अ रेअर १८थ सेंच्युरी महाभारत स्क्रोल' या प्रदर्शनात भारताची महाकाव्य आणि कलात्मक परंपरा दर्शवणारा चित्रित स्क्रोल मांडला होता. त्यानंतर त्यांनी 'अस्तित्व - द एसन्स ऑफ अवर एक्झिस्टन्स' या प्रदर्शनाला भेट दिली. इसवी सन पूर्व १२०० ते इसवी सन १२०० या काळातील पुराव्यांद्वारे दिल्लीचा इतिहास या प्रदर्शनात मांडला आहे. त्यामध्ये उत्खननातील अवशेष, कलाकृती, वास्तुकलेचे भाग आणि इतर महत्त्वाचे शोध समाविष्ट आहेत. केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत आधीच कार्यक्रमस्थळी पोहोचले होते आणि त्यांनी विविध प्रतिनिधींचे स्वागत केले.
पुराणा किल्ल्यावर होणाऱ्या पहिल्या एससीओ सभ्यता संवाद मंचाच्या उद्घाटनापूर्वी परराष्ट्र मंत्रालयाने शुक्रवारी स्पष्ट केले की, एससीओ चौकटीतील हा एक बहुपक्षीय कार्यक्रम आहे. पाकिस्तानसह या गटातील सर्व सदस्यांना निमंत्रणे पाठवली होती. उद्घाटनापूर्वीच विविध एससीओ सदस्य देश आणि इतर देशांतील प्रतिनिधी या संरक्षित स्मारकाच्या ठिकाणी जमले होते. सांस्कृतिक मंत्रालय आणि परराष्ट्र मंत्रालयामार्फत २० ते २२ नोव्हेंबरदरम्यान हा कार्यक्रम होत आहे.
रशिया, चीन, किर्गिझ प्रजासत्ताक, कझाकस्तान, ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तानच्या अध्यक्षांनी २००१ मध्ये शांघाय येथील शिखर परिषदेत एससीओची स्थापना केली. भारत आणि पाकिस्तान २०१७ मध्ये त्याचे कायमस्वरूपी सदस्य झाले. इराण २०२३ मध्ये सदस्य झाला. "भारत २० ते २२ नोव्हेंबर २०२६ दरम्यान नवी दिल्लीत पहिल्या एससीओ सभ्यता संवादाचे आयोजन करत आहे. एससीओ चौकटीतील हा बहुपक्षीय कार्यक्रम असून पाकिस्तानसह सर्व सदस्यांना निमंत्रणे पाठवली आहेत. एससीओचे निरीक्षक आणि संवाद भागीदारांनाही आमंत्रित केले आहे," असे परराष्ट्र मंत्रालयाने 'एक्स'वरील पोस्टमध्ये म्हटले होते.
चीन, कझाकस्तान, इराण, ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तानसह अनेक देशांनी या मंचातील सहभाग निश्चित केल्याची घोषणा केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी १३ नोव्हेंबर रोजी केली होती. पाकिस्तानही या कार्यक्रमात सहभागी होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली होती. हवामान बदल मंत्री मुसादिक मलिक एससीओ सभ्यता संवाद मंचावर उपस्थित राहतील, अशी घोषणा पाकिस्तानने १४ नोव्हेंबर रोजी केली होती.
एससीओ देशांचा सामायिक सांस्कृतिक वारसा जाणून घेण्यासाठी विद्वान, अभ्यासक, तज्ज्ञ आणि सांस्कृतिक प्रतिनिधी या तीन दिवसांच्या मंचावर एकत्र येतील. एससीओ चौकटीत सभ्यता संवादासाठी स्वतंत्र व्यासपीठ उभारण्याचा प्रस्ताव पंतप्रधान मोदींनी २०२५ मध्ये चीनमधील तियानजिन येथील एससीओ शिखर परिषदेत मांडला होता. पुढे एससीओच्या बिश्केक घोषणापत्रात या प्रस्तावाचे स्वागत केले होते.