गुरु नानक देव जयंतीनिमित्त २,३०० हून अधिक भारतीय शीख भाविक पाकिस्तानात दाखल

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 30 m ago
गुरु नानक देव यांच्या ५५७ व्या जयंती सोहळ्यासाठी २,३०० हून अधिक भारतीय शीख भाविक वाघा सीमेवरून पाकिस्तानात दाखल!
गुरु नानक देव यांच्या ५५७ व्या जयंती सोहळ्यासाठी २,३०० हून अधिक भारतीय शीख भाविक वाघा सीमेवरून पाकिस्तानात दाखल!

 

लाहोर 

शीख धर्माचे संस्थापक गुरु नानक देव यांच्या ५५७ व्या जयंती सोहळ्यासाठी २,३०० हून अधिक भारतीय शीख भाविक रविवारी वाघा सीमेवरून पाकिस्तानात पोहोचले. एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली. इव्हॅक्युई ट्रस्ट प्रॉपर्टी बोर्डाचे (ETPB) अध्यक्ष कमर झमान, पंजाब अल्पसंख्याक मंत्री आणि पाकिस्तान शीख गुरुद्वारा प्रबंधक समितीचे (PSGPC) अध्यक्ष सरदार रमेश सिंग अरोरा यांच्यासह इतर अधिकाऱ्यांनी सीमेवर भाविकांचे स्वागत केले.

ईटीपीबीचे प्रवक्ते अमीर हाश्मी यांनी सांगितले की, सुमारे २,३३९ भारतीय भाविक लाहोरमध्ये आले आहेत. या सोहळ्यासाठी पाकिस्तान सरकारने ३,००० हून अधिक व्हिसा दिले होते. १ डिसेंबर रोजी मायदेशी परतण्यापूर्वी भाविक करतारपूर साहिबसह पाकिस्तानमधील विविध ऐतिहासिक शीख गुरुद्वारांना भेट देतील.

वाघा सीमा व्यवस्था आणि ननकाना साहिब सोहळा

इमिग्रेशन आणि सामान तपासणीसाठी वाघा सीमेवर विशेष काउंटर्स उभारले होते. सुरक्षेसाठी पाकिस्तान रेंजर्स तैनात केले होते. पुढील प्रवासासाठी ईटीपीबीने चलन विनिमय सुविधा उपलब्ध करून दिली आणि भाविकांना ओळखपत्रे व बसची तिकिटे दिली.

१९४७ च्या फाळणीदरम्यान स्थलांतरित झालेल्या हिंदू आणि शीख समुदायांच्या विश्वस्त मालमत्ता आणि जमिनींचे व्यवस्थापन, नियंत्रण आणि विल्हेवाट पाहणारे ईटीपीबी हे पाकिस्तान सरकारचे वैधानिक मंडळ आहे. कडक बंदोबस्तात भाविकांना तीन ताफ्यांतून लाहोरपासून सुमारे ८० किलोमीटर अंतरावरील ननकाना साहिब येथे नेले.

गुरु नानक देव यांच्या जन्मस्थानी असलेल्या ननकाना साहिब येथील गुरुद्वारा जन्म अस्थान येथे मंगळवारी मुख्य सोहळा होईल. धार्मिक व्यवहार मंत्री सरदार मुहम्मद युसूफ यांच्यासह इतर केंद्रीय आणि प्रांतीय मंत्री उपस्थित राहण्याची शक्यता आहे. भारत आणि इतर देशांतील शीख भाविक भोग आणि अखंड पाठ साहिबसह धार्मिक विधींमध्ये सहभागी होतील. त्यानंतर नगर कीर्तन नावाची पारंपरिक पालखी मिरवणूक निघेल.

करतारपूर कॉरिडॉर आणि भाविकांच्या भावना

वाघा सीमेवर बोलताना ईटीपीबीचे अध्यक्ष झमान म्हणाले की, पाकिस्तानातील वास्तव्यादरम्यान भाविकांना कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी मंडळ सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. प्रेम, शांतता आणि बंधुभावाच्या गोड आठवणी घेऊन भाविक मायदेशी परततील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पाकिस्तानच्या करतारपूरमधील गुरुद्वारा दरबार साहिबकडे जाण्यासाठी असलेला करतारपूर कॉरिडॉर भारत सरकारने पुन्हा सुरू करावा, असे आवाहन अल्पसंख्याक मंत्री अरोरा यांनी केले. भारतातील अकाल तख्त गटाचे नेते कुलदीप सिंग गुरगज म्हणाले की, शीख समुदायाचे पाकिस्तानशी खोलवर आदराचे नाते आहे आणि तेथे समुदायाच्या सदस्यांना मान व सन्मान मिळतो. "पाकिस्तानातील आमचे गुरुद्वारे सुरक्षित असून मूळ स्वरूपात जतन केले आहेत," असे त्यांनी सांगितले. दिल्ली गुरुद्वारा व्यवस्थापन समितीच्या शिष्टमंडळाचे सदस्य परमजीत सिंग म्हणाले की, गुरूंशी संबंधित भूमी म्हणून पाकिस्तानला शीख समाजासाठी विशेष महत्त्व आहे.