काठमांडू
प्रबल अल नीनोमुळे हिंदुकुश हिमालय क्षेत्रातील काही भागांत सामान्यपेक्षा अधिक वृष्टी होऊ शकते. यातून हिवाळ्यात नेपाळमध्ये पूर, भूस्खलन आणि हिमस्खलनाचा धोका वाढू शकतो, असा इशारा एका अहवालात दिला आहे. काठमांडूस्थित 'इंटरनॅशनल सेंटर फॉर इंटिग्रेटेड माउंटन डेव्हलपमेंट' (ICIMOD), बीजिंग नॉर्मल युनिव्हर्सिटी आणि चायनीज अॅकॅडमी ऑफ सायन्सेसच्या अॅटमॉस्फेरिक फिजिक्स संस्थेने संयुक्तपणे 'हिंदुकुश हिमालय विंटर आउटलुक २०२६' हा अहवाल तयार केला आहे. नेपाळ, अफगाणिस्तान आणि बांगलादेशसह इतर देशांत अधिक आर्द्र हवामानाचा अंदाज अहवालात मांडला आहे.
पश्चिम हिमालयात मुसळधार वृष्टीमुळे स्थानिक पातळीवर पूर, भूस्खलन आणि हिमस्खलन होऊ शकते. काही भागांत कोरडे हवामान राहून वणव्याचा धोका वाढू शकतो. अमेरिकेच्या नॅशनल ओशनिक अॅण्ड अॅटमॉस्फेरिक अॅडमिनिस्ट्रेशनने (NOAA) प्रबल ते अत्यंत प्रबल अल नीनोची नोंद केली आहे. १९५० मध्ये नोंदी सुरू झाल्यापासून हा सर्वात प्रबल अल नीनो ठरण्याची शक्यता सुमारे ६० टक्के आहे. हिमालयाच्या पायथ्याशी अधिक पाऊस आणि उंच भागांत अधिक हिमवृष्टी होऊ शकते, असे आयसीआयएमओडीच्या शास्त्रज्ञांनी सांगितले.
अफगाणिस्तान, पाकिस्तान, उत्तर भारत आणि नेपाळच्या काही भागांत नेहमीपेक्षा जास्त बर्फ पडण्याचा अंदाज आहे. भूतान आणि चीनच्या पूर्व भागात कमी बर्फवृष्टी होऊ शकते. कमी बर्फामुळे नद्यांचा प्रवाह, सिंचन, जलविद्युत निर्मिती आणि झऱ्यांतील पाण्यावर परिणाम होऊ शकतो.
ऑगस्टमध्ये नेपाळमध्ये झालेल्या भीषण पुरात किमान १,५०० जणांचा मृत्यू झाला होता आणि ५,००० हून अधिक लोक बेपत्ता झाले होते. मदत आणि पुनर्वसनाचा खर्च सुमारे ४.७ अब्ज डॉलर्स इतका अंदाजित आहे.
पावसाचे प्रमाण अनियमित होत असल्याने हंगामी नियोजन आणि स्थानिक हवामान अंदाजांची गरज आयसीआयएमओडीचे जलशास्त्रज्ञ मनीष श्रेष्ठा यांनी व्यक्त केली. २५ ते २७ नोव्हेंबरदरम्यान काठमांडूमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेत या निष्कर्षांवर चर्चा होईल.