जगात मुस्लिम लोकसंख्या वेगाने वाढणार; भारतातील कल मात्र वेगळा

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 11 h ago
प्रातिनिधिक इमेज
प्रातिनिधिक इमेज

 

विदुषी गौर 

पुढील पाच दशकांत जगभरातील इतर कोणत्याही प्रमुख धार्मिक समुदायापेक्षा मुस्लिम लोकसंख्या वेगाने वाढण्याचा अंदाज आहे. प्यू रिसर्च सेंटरच्या (Pew Research Centre) एका नवीन अहवालातून ही माहिती समोर आली आहे. याउलट भारतातील लोकसंख्येचे चित्र वेगळे आहे. भारतात मुस्लिमांमधील प्रजनन दर घटत असून लोकसंख्या वाढीचा वेग हळूहळू मंदावत चालला आहे.

"द फ्युचर ऑफ वर्ल्ड रिलिजन्स: पॉप्युलेशन ग्रोथ प्रोजेक्शन्स, २०२०-२०७०" नावाचा हा अहवाल १८ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध झाला. २०२० ते २०७० या काळात जागतिक मुस्लिम लोकसंख्येत ८० टक्क्यांनी वाढ होईल, असा अंदाज या अहवालात वर्तवला आहे. याच काळात बिगर-मुस्लिम लोकसंख्या ११ टक्क्यांनी वाढेल. हा कल असाच राहिल्यास २०७० पर्यंत जगातील मुस्लिमांची संख्या सुमारे ३.६ अब्जांवर पोहोचेल. २०२० मध्ये जागतिक लोकसंख्येत मुस्लिमांचा वाटा सुमारे २६ टक्के होता, तो २०७० पर्यंत ३६ टक्के होईल. २०३५ पर्यंत इस्लाम हा ख्रिश्चन धर्माला मागे टाकून जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा धार्मिक गट बनू शकतो, असेही या अहवालात म्हटले आहे.

प्यू रिसर्च सेंटरच्या मते, उप-सहारा आफ्रिकेत मुस्लिम लोकसंख्येची वाढ विशेष लक्षणीय राहील. या भागातील मुस्लिमांची संख्या २०२० मधील ३६.९ कोटींवरून २०७० मध्ये सुमारे ९८ कोटींपर्यंत जाईल. २०२० मध्ये जगातील एकूण मुस्लिम लोकसंख्येपैकी १८ टक्के लोक या भागात होते, हा वाटा २०७० पर्यंत २७ टक्क्यांवर जाईल. या बदलामुळे आफ्रिका हे मुस्लिम लोकसंख्या वाढीचे महत्त्वाचे केंद्र बनेल. युरोपमध्येही मुस्लिमांचे प्रमाण वाढेल. युरोपच्या लोकसंख्येतील त्यांचा वाटा २०२० मधील ६ टक्क्यांवरून २०७० मध्ये १३ टक्क्यांपर्यंत पोहोचू शकतो. उत्तर अमेरिकेत मुस्लिम लोकसंख्या तिपटीहून अधिक होऊन सुमारे ६० लाखांवरून २ कोटींवर जाण्याचा अंदाज आहे.

युरोप आणि उत्तर अमेरिकेतील या बदलांत स्थलांतराचा वाटा राहील. मात्र या संभाव्य वाढीमागे दोन मुख्य लोकसंख्याशास्त्रीय घटक असल्याचे प्यूने स्पष्ट केले आहे. तरुण लोकसंख्या आणि अधिक प्रजनन दर हे ते दोन घटक आहेत. २०२० मध्ये जगभरातील दर दहा मुस्लिमांमागे सुमारे सहा जण ३० वर्षांपेक्षा कमी वयाचे होते. लोकसंख्येतील या तरुण वर्गामुळे समुदायातील मोठा हिस्सा पालक होण्याच्या वयोगटात येत आहे आणि त्यातून लोकसंख्या वाढत आहे.

२०२० ते २०२५ या काळासाठी मुस्लिमांचा जागतिक प्रजनन दर प्रति महिला ३.१ मुले इतका अंदाजित केला आहे. बिगर-मुस्लिमांमध्ये हा दर २.० इतका आहे. उप-सहारा आफ्रिकेत हा फरक अधिक स्पष्ट दिसतो, तिथे मुस्लिम महिलांचा प्रजनन दर ५.१ मुले इतका आहे. धर्मांतराचा एकूण मुस्लिम लोकसंख्येवर फारसा परिणाम होत नसल्याचेही अहवालात नोंदवले आहे. मुस्लिम म्हणून वाढलेल्या लोकांपैकी सुमारे ९९ टक्के लोक प्रौढ झाल्यावरही इस्लाम धर्माशीच जोडलेले राहतात.

जागतिक चित्र वेगवान वाढ दाखवत असताना भारतातील मुस्लिम लोकसंख्येबाबतच्या चर्चा वेगळ्या कलावर लक्ष केंद्रित करतात. भारतात लोकसंख्या वाढीचा दर घटत आहे. एकूण लोकसंख्येत घट होणे आणि लोकसंख्या वाढीचा वेग कमी होणे यातील फरक समजून घेणे महत्त्वाचे आहे. भारतातील मुस्लिम लोकसंख्या प्रत्यक्ष संख्येने कमी झालेली नाही. त्याऐवजी, गेल्या अनेक दशकांत तिच्या वाढीचा वेग लक्षणीयरीत्या मंदावला आहे.

२०११ च्या जनगणनेनुसार भारतातील मुस्लिम लोकसंख्या सुमारे १७.२ कोटी होती. देशाच्या एकूण लोकसंख्येत हे प्रमाण १४.२ टक्के होते, २००१ मध्ये हा आकडा १३.४ टक्के होता. प्यूच्या ताज्या अंदाजानुसार २०२० मध्ये भारतातील मुस्लिम लोकसंख्या सुमारे २१.३ कोटी होती. २०७० पर्यंत ही संख्या ३३.४ कोटींपर्यंत पोहोचण्याचा अंदाज असून पाकिस्ताननंतर भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या असलेला देश ठरेल. भारताच्या लोकसंख्येतील मुस्लिमांचा वाटाही २०२० मधील १५.२ टक्क्यांवरून २०७० मध्ये सुमारे १९.६ टक्क्यांपर्यंत वाढेल. हिंदू हा देशातील प्रमुख धार्मिक समुदाय राहील आणि एकूण लोकसंख्येत त्यांचा वाटा सुमारे ७६ टक्के असेल.

भारतातील सर्वच धार्मिक समुदायांमध्ये प्रजनन दर कमी होणे हा एक निर्णायक बदल ठरला आहे. यात दीर्घकाळात सर्वाधिक घट मुस्लिमांमध्ये नोंदवली गेली आहे. भारताच्या धार्मिक रचनेवरील प्यूच्या २०२१ च्या अभ्यासानुसार, एका मुस्लिम महिलेमागील मुलांची सरासरी संख्या १९९२ मधील ४.४ वरून २०१५ मध्ये २.६ इतकी खाली आली. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण-५ (२०१९-२१) मध्ये यात आणखी घट नोंदवली गेली आणि मुस्लिमांचा प्रजनन दर प्रति महिला २.३ मुलांवर आला. याच काळात हिंदूंमध्ये हा दर १.९४ होता, आणि भारताचा एकूण प्रजनन दर सुमारे २.० पर्यंत खाली आला होता.

वेगवेगळ्या धार्मिक समुदायांतील प्रजनन दरातील तफावत आता कमी होत असल्याचे या आकडेवारीतून दिसते. शिक्षण, आरोग्यसेवा, कुटुंब नियोजन आणि शहरी संधींची वाढलेली उपलब्धता हे घटक या सामाजिक बदलाशी जोडलेले आहेत. प्रजनन दरात घट झाल्याने मुस्लिम आणि हिंदूंच्या लोकसंख्या वाढीच्या दरातील अंतरही कमी झाले आहे. जनगणनेच्या आकडेवारीनुसार, मुस्लिम लोकसंख्या वाढीचा दर १९९१-२००१ मधील २९.३ टक्क्यांवरून २००१-२०११ मध्ये २४.७ टक्क्यांवर खाली आला आहे.