इंदूर
आयबीएसएफ विश्व स्नूकर स्पर्धेत भारताच्या अनुपमा रामचंद्रनने सलग दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावले आहे. अंतिम सामन्यात तिने हाँगकाँगच्या सो मान यान हिचा ३-१ असा पराभव करून आपला किताब कायम राखला. सलग दोन वेळा विश्व स्नूकर विजेतेपद जिंकणारी ती पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे. इंदूर येथील यशवंत क्लबमध्ये हा अंतिम सामना खेळला गेला.
सुरुवातीच्या फ्रेममध्ये पराभव पत्करल्यानंतर अनुपमाने खेळावर पकड मजबूत केली. पहिल्या फ्रेममध्ये १६-५८ अशा पिछाडीनंतर तिने ८३-७, ८५-२६ आणि ६५-३७ असे सलग तीन फ्रेम जिंकून विजेतेपदावर नाव कोरले.
उपांत्य फेरीत अनुपमाने इंग्लंडच्या टेसा डेव्हिडसन हिचा ३-१ असा पराभव करत अंतिम फेरी गाठली होती. तिने पहिल्या फ्रेममध्ये ४१-४३ असा निसटता पराभव स्वीकारला, मात्र त्यानंतर ५५-२०, ६०-२६ आणि ६६-४४ असे फ्रेम जिंकून आगेकूच केली.
पुरुष गटात इराणच्या अली घाराहगोज्लू याने अंतिम सामन्यात हाँगकाँगच्या टॅम युन फुंग याचा ५-१ असा पराभव करून विजेतेपद पटकावले. याआधी उपांत्य फेरीत त्याने भारताच्या पंकज अडवाणी याला ५-३ असे हरवले होते. पंकज अडवाणीने या स्पर्धेत कांस्यपदक मिळवले.