आसामच्या शमीमा रहमान यांनी छंदाचे रूपांतर केले यशस्वी व्यवसायात

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 h ago
गुवाहाटी येथील इंग्रजी साहित्याच्या माजी प्राध्यापिका अन् टायनी प्लांटर्सच्या संस्थापक शमीमा रहमान
गुवाहाटी येथील इंग्रजी साहित्याच्या माजी प्राध्यापिका अन् टायनी प्लांटर्सच्या संस्थापक शमीमा रहमान

 

मुन्नी बेगम

आयुष्याच्या प्रवासात कधी कधी चालती वाट सोडावी लागते अन् भलत्याच अनपेक्षित वाटेवर पाऊल ठेवावे लागते. या अनपेक्षित वळणावर काही लोक हात टेकतात, तर काही ध्येयवादी संकटांनाच नव्या यशाची दारे बनवतात. गुवाहाटीच्या शमीमा रहमान यांची कहाणी अगदी अशीच आहे. कालपर्यंत इंग्रजी साहित्याच्या प्राध्यापिका असलेल्या शमीमा आज एक यशस्वी महिला उद्योजिका म्हणून नावारूपाला आल्या आहेत.

इंग्रजी साहित्यातील अध्यापनाचे यशस्वी करिअर ऐन भरात असताना, अचानक आलेल्या आजारपणामुळे त्यांना नोकरी सोडावी लागली. पण या संकटापुढे त्यांनी हार मानली नाही. झाडं-वेलींवरील मनापासूनचे प्रेम, कला-कौशल्याची आवड आणि काहीतरी नवीन उभारण्याची जिद्द याच्या बळावर त्यांनी ‘टायनी प्लांटर्स - अ गिफ्ट दॅट ग्रोझ’ या अनोख्या उपक्रमाची पायाभरणी केली.

आज हा छोटासा व्यवसाय लोकांच्या गळ्यातील ताईत बनला आहे. हे केवळ झाडांचे दुकान राहिले नसून, निसर्गपूरक जीवनशैली आणि अर्थपूर्ण भेटवस्तू देण्याची नवी संस्कृती बनले आहे.

अध्यापन, संशोधन अन् तो आव्हानात्मक काळ
अलिगड मुस्लिम विद्यापीठातून २००९ मध्ये इंग्रजीत पदव्युत्तर पदवी (एम.ए.) पूर्ण केल्यावर शमीमा यांनी 'ईएफएलयू' (EFLU) च्या शिलाँग कॅम्पसमधून एम.फिल. आणि पीएच.डी. पूर्ण केली. संशोधन चालू असतानाच त्यांनी अध्यापनाला सुरुवात केली होती.

२०११ ते २०१३ या काळात त्यांनी नगाव येथील एडीपी कॉलेजमध्ये इंग्रजी विभागात प्राध्यापक म्हणून काम केले. २०१३ मध्ये लग्न झाल्यावर त्या गुवाहाटीला आल्या अन् चांदमारी येथील 'आसाम इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट'च्या इंग्रजी विभागात रुजू झाल्या. पुढे २०१८ मध्ये त्या एनईएफ (NEF) कॉलेजमध्ये इंग्रजी विभागप्रमुख (HOD) बनल्या.

अध्यापन, संशोधन अन् शैक्षणिक क्षेत्रात त्यांचे करिअर उत्तम फुलत होते. पण जानेवारी २०१९ मध्ये जुळ्या मुलींच्या जन्मानंतर त्यांच्या आयुष्यात मोठे संकट आले. आजारपणामुळे डॉक्टरांनी त्यांना प्रदीर्घ विश्रांतीचा सल्ला दिला. मुलींचा सांभाळ करत दोन-तीन वर्षे उपचार घेताना त्यांना प्राध्यापकाची नोकरी सोडावी लागली.

त्या कठीण काळाबद्दल बोलताना ‘टायनी प्लांटर्स’च्या संस्थापक शमीमा रहमान सांगतात, "अध्यापन हा माझ्या आवडीचा पेशा होता. आजारपणामुळे नोकरी सोडावी लागल्याने मी मानसिकदृष्ट्या कोलमडले होते. पण आयुष्यात नवीन काहीतरी करण्याची संधी नक्की मिळेल असा विश्वास वाटायचा, अन् याच विश्वासाने मला पुढे नेले."
 

छंदाला मिळाले व्यवसायाचे रूप
घरी घालवलेल्या काळात शमीमा यांच्या आयुष्याचा नवा अध्याय सुरू झाला. लहानपणापासून मनात जपलेली झाडांची आवड अन् कलेची हौस यांना प्रत्यक्ष रूप देण्याचे त्यांनी ठरवले.

सुरुवातीला त्यांनी लहान इनडोअर रोपे आकर्षकपणे सजवून नातेवाईक, मित्र-मैत्रिणी अन् कॉलेजातील सहकाऱ्यांना वाढदिवस किंवा खास प्रसंगी भेट म्हणून देण्यास सुरुवात केली. या हिरव्यागार भेटवस्तूंनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. हळूहळू तोंडी प्रसिद्धी होत गेली अन् शैक्षणिक संस्था, विविध कार्यक्रम आणि राष्ट्रीय स्तरावरील सांस्कृतिक सोहळ्यांमधून त्यांच्याकडे रोपांची मागणी वाढू लागली.

'टायनी प्लांटर्स'च्या सुरुवातीबद्दल त्या म्हणतात, "सुरुवातीला व्यवसाय सुरू करण्याचा माझा कोणताही विचार नव्हता. मी फक्त माझ्या आवडीचे काम करत होते. लोक जेव्हा ही रोपे भेट म्हणून आनंदाने नेऊ लागले, तेव्हा या छंदाचे रूपांतर माझ्या नव्या ओळखीत होऊ शकते याची जाणीव झाली."

आसामी संस्कृती अन् आधुनिक कलाकुसर
आजघडीला शमीमा या जेड प्लांट, स्नेक प्लांट, स्पायडर प्लांट आणि झेब्रा हॅवर्थिया यांसारखी इनडोअर रोपे आकर्षक कुंडीत सजवून ग्राहकांपर्यंत पोहोचवतात. कमी देखभालीतही ही रोपे दीर्घकाळ जगतात अन् घरातील हवा शुद्ध ठेवतात. जेड अन् स्नेक प्लांटला भेटवस्तू म्हणून मोठी मागणी असते.

या कुंड्यांची किंमत ₹२५० पासून सुरू होते, तर मोठ्या ऑर्डर्ससाठी ₹१७० ते ₹१८० पर्यंत उपलब्ध करून दिल्या जातात. प्रत्येक कुंडीवर शमीमा स्वतःच्या कल्पकतेने कलाकुसर करतात. कोणत्याही ठरलेल्या डिझाईनची कॉपी न करता, मनात येईल ती नवी कल्पना त्या कुंडीवर उतरवतात.

आसामी संस्कृतीचे प्रतीक असलेली गामोछा (पारंपरिक रुमाल), जापी (पारंपरिक टोपी), ताग (Jute), काच, विविध रंग, रिबिन अन् फुलांचा वापर करून त्या कुंडीला अप्रतिम रूप देतात. ग्राहकांच्या गरजेनुसार (Customized) डिझाईनसुद्धा बनवून दिले जातात.

एका कॉलेजकडून अवघ्या दोन दिवसांत गामोछा-थीमवर आधारित कुंड्यांची ऑर्डर आली होती. अत्यंत कमी वेळेत त्यांनी हे काम फत्ते केले. तेव्हापासून अशा प्रकारच्या सांस्कृतिक कुंड्यांना प्रचंड मागणी आहे.

आपल्या डिझाईन्सबद्दल शमीमा सांगतात, "मी कोणाचीही डिझाईन कॉपी करत नाही. मनात अचानक आलेली कल्पना मी कुंडीवर उतरवते. माझ्यासाठी प्रत्येक कुंडी ही एक कलाकृती आहे. गामोछा, जापी, ताग अन् आसामी संस्कृतीचे घटक वापरून मी प्रत्येक कुंडीला वेगळा लूक देण्याचा प्रयत्न करते."
 

प्रत्येक कुंडीत स्वतःचे कष्ट अन् मायेचा स्पर्श
मातीची कुंडी धुणे, रंगवणे, सजावट करणे, कोकोपीटमध्ये रोप लावणे ते पॅकेजिंगपर्यंतची सर्व कामे शमीमा स्वतःच्या हातांनी करतात. प्रत्येक कुंडीसोबत “राईट युअर विश नोट” हे एक खास कार्ड दिले जाते, ज्यावर ग्राहक स्वतःचा संदेश लिहून भेटवस्तू अधिक आठवणीत राहणारी बनवू शकतात. त्या इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सॲपवरून ऑर्डर्स स्वीकारतात अन् होम डिलीव्हरीची सोयसुद्धा उपलब्ध आहे.

कष्टाबद्दल सांगताना त्या म्हणतात, "या कामात मेहनत खूप आहे. एका कुंडीची सजावट पूर्ण करायला दोन दिवस जातात. मोठ्या ऑर्डर्स असतील तर दिवसाला फक्त १० कुंड्या तयार होतात. पॅकेजिंग, ब्रँड लोगो अन् चांगल्या साहित्यामुळे खर्च होतो, पण ग्राहकांचे समाधान सर्व थकवा घालवते. व्यवसायाच्या सुरुवातीला नफ्यापेक्षा ग्राहकांचा विश्वास जिंकणे महत्त्वाचे होते. काही वेळा एका कुंडीमागे फक्त ₹७० नफा ठेवूनही काम केले आहे."

त्या पुढे म्हणतात, "अनेक लोक म्हणतात की कुंड्या खूप सुंदर आहेत, किंमत थोडी वाढवा. पण माझ्यासाठी नफ्यापेक्षा लोकांचा विश्वास जिंकणे जास्त गरजेचे होते. आजसुद्धा उत्तम दर्जा आणि कलात्मकता वाजवी दरात देण्याचा माझा प्रयत्न असतो."

'प्लांट डॉक्टर' म्हणून नवी ओळख
फक्त रोप विकले म्हणजे जबाबदारी संपली, असे त्या मानत नाहीत. प्रत्येक रोपासोबत काळजी कशी घ्यावी याची माहितीपत्रक दिले जाते अन् गरज पडल्यास त्या फोनवरून मार्गदर्शन करतात. म्हणूनच अनेक ग्राहक त्यांना आपुलकीने ‘प्लांट डॉक्टर’ म्हणतात.

त्यावर शमीमा आनंदाने सांगतात, "मी फक्त रोपे विकत नाही, तर ते रोप अनेक वर्षे हिरवेगार राहावे अशी माझी इच्छा असते. म्हणूनच प्रत्येक ग्राहकाला मी रोपाची निगा कशी राखावी हे समजावून सांगते. लोक मला 'प्लांट डॉक्टर' म्हणतात, हा शब्द माझ्यासाठी ऊर्जेचा सर्वात मोठा स्त्रोत आहे."

सामाजिक बांधिलकी अन् भविष्यातील स्वप्ने
फक्त स्वतःचा फायदा न बघता इतर छोट्या व्यावसायिकांना सोबत घेऊन जाण्याची त्यांची धडपड असते. अलीकडेच त्यांनी एका परिचित महिला उद्योजिकेने बनवलेली हाताने तयार केलेली राखी स्वतःच्या गिफ्ट बॉक्समध्ये समाविष्ट केली होती.

"व्यवसाय म्हणजे फक्त स्वतःचा नफा नव्हे. माझ्या कामातून जर इतर छोट्या व्यावसायिकाला मदत होत असेल, तर तोच माझा खरा विजय आहे," असे त्या मानतात.

शमीमा यांच्या भविष्यातील योजना मोठ्या आहेत. आगामी ऑगस्ट महिन्यातील प्रदर्शन आणि ऑक्टोबरमधील दुर्गापूजेच्या काळात होणाऱ्या प्रदर्शनात सहभागी होण्याची त्यांची तयारी सुरू आहे. पूजेसाठी त्या खास थीमवर आधारित 'टायनी प्लांटर्स' आणणार आहेत.

याशिवाय मोठ्या कुंड्या, इनडोअर गार्डनिंग, गॅलरी बाग (Balcony Garden) आणि निसर्गपूरक स्पेस डिझायनिंग या क्षेत्रात पाऊल ठेवण्याचा त्यांचा मानस आहे. नवीन फ्लॅटच्या गॅलरी अन् छोट्या बागा सजवण्यासाठी अनेक ग्राहकांनी त्यांच्याशी संपर्क साधला आहे.

आपल्या स्वप्नांबद्दल सांगताना शमीमा म्हणतात, "माझे ध्येय फक्त टायनी प्लांटर्सपुरते मर्यादित नाही. पुढे जाऊन मला 'ग्रीन डेकोर सर्व्हिस' सुरू करायची आहे, जिथे लोकांना केवळ झाडेच नाही तर संपूर्ण हिरवेगार वातावरण निर्माण करण्याची संधी मिळेल."

शिक्षिका, संशोधक, आई आणि यशस्वी उद्योजिका अशा सर्व भूमिका लीलया पेलणाऱ्या शमीमा रहमान यांचा हा प्रवास एकच गोष्ट सिद्ध करतो की आयुष्यात येणारे प्रत्येक संकट आपल्यासोबत नव्या संधीची पहाट घेऊन येत असते.

आज ‘टायनी प्लांटर्स’ हा केवळ एक ब्रँड राहिला नसून, धैर्य, चिकाटी, कल्पकता अन् हिरव्यागार जीवनशैलीची एक प्रेरणादायी यशोगाथा बनला आहे.
 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter