मुंबई
महाराष्ट्रातील पाच विधानपरिषद (MLC) मतदारसंघांच्या निवडणुकांसाठी आज सकाळी ८ वाजता मतदानाला सुरुवात झाली आहे. यामध्ये तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंंचा समावेश असून, या निवडणुकीत सत्ताधारी महायुती आणि विरोधी महाविकास आघाडीची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. मतमोजणी २७ ऑक्टोबर रोजी होणार आहे.
७८ सदस्यीय विधानपरिषदेतील ५ सदस्यांचा कार्यकाल ६ डिसेंबर रोजी संपत असल्याने या द्विवार्षिक निवडणुका होत आहेत. यात पुणे विभाग पदवीधर, नागपूर विभाग पदवीधर, पुणे विभाग शिक्षक, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) पदवीधर आणि अमरावती शिक्षक मतदारसंंचा समावेश आहे. या सर्व ५ जागांवर महायुती (भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी) आणि महाविकास आघाडी (काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उबाठा) यांनी आपले उमेदवार उभे केले आहेत. निवडणुकीत दोन्ही बाजूंना बंडखोरीचा सामना करावा लागला आहे.
एकूण १८२ उमेदवार रिंगणात असून, १० लाख ६८ हजार ०७२ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. राज्यभरात २,४१९ मतदान केंद्रांवर सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत मतदान पार पडत आहे. पुणे पदवीधर मतदारसंघात सर्वाधिक ४७ उमेदवार रिंगणात आहेत. निवडणूक प्रक्रिया ३१ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण केली जाणार असून २७ ऑक्टोबरला मतमोजणी होईल. सध्या ७८ सदस्यीय विधानपरिषदेत ३५ सदस्यांसह भाजप सर्वात मोठा पक्ष आहे.