तिबेटमधील नाग्चू भागात भूकंपाचे जोरदार धक्के; जीवितहानीची नोंद नाही

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 36 m ago
तिबेटमध्ये ७.० तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के
तिबेटमध्ये ७.० तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के

 

बेइजिंंग

चीनच्या तिबेट स्वायत्त प्रदेशात गुरुवारी रात्री ७.० तीव्रतेचा जोरदार भूकंप झाला. चीनच्या भूकंप नेटवर्क केंद्राने (CENC) दिलेल्या माहितीनुसार, या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ७.० नोंदवण्यात आली असून अद्याप कोणतीही जीवितहानी किंवा नुकसानीचे वृत्त समोर आलेले नाही.

नाग्चू शहरातील बाकेन काउंटीमध्ये रात्री १०:३३ वाजता (स्थानिक वेळ) हा भूकंप झाला. या भूकंपाचा केंद्रबिंदू उत्तर अक्षांश ३२.४० अंश आणि पूर्व रेखांश ९३.७९ अंश एवढा होता. भूकंपाची खोली जमिनीपासून १० किलोमीटर खोलीवर असल्यामुळे तिबेटच्या विस्तृत भागात तीव्र धक्के जाणवले, असे वृत्त सरकारी वृत्तसंस्था शिन्हुआने दिले आहे.

युरेशियन आणि भारतीय टेकटोनिक प्लेट्सच्या मिलनस्थळावर तिबेटी पठार वसलेले असल्यामुळे या भागात तीव्र स्वरूपाचे भूकंप होण्याचा धोका नेहमीच असतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. स्थानिक प्रशासनाकडून नुकसानीचा आढावा घेतला जात आहे.