भक्ती चाळक
जपानमधील नुकत्याच संपलेल्या एशियन गेम्सच्या कबड्डी फायनलमध्ये शेवटची दोन मिनिटं शिल्लक असताना भारतासमोर इराण होता. स्कोअर ३७-३० असा होता. सामना कोणत्याही बाजूला झुकू शकेल, असं चित्र होतं. त्याच वेळी रेडसाठी आलेल्या एका खेळाडूनं जोखीम पत्करत आणखी दोन गुण मिळवले. तणाव काहीसा कमी झाला आणि शेवटी ३९-३३ अशा फरकानं भारतानं सुवर्णपदक जिंकलं. तो खेळाडू होता अस्लम इनामदार. त्यांनतर तो भारतात प्रसिद्ध झाला.
अहिल्यानगरमधील टाकळीभान हे अस्लमचं छोटसं गाव. वयाच्या चौदाव्या वर्षी तो कबड्डीच्या प्राईज मॅच खेळायला लागला होता. मोठा भाऊ क्लबसाठी खेळत होता. बाहेर गेल्यावर लोक कबड्डीमुळं भावाचं नाव आदरानं घेत असल्याचं अस्लमला जाणवलं. त्या ओळखीमुळं स्वतःही या खेळात नाव कमवावं, असं त्याला वाटलं. २००९-१० च्या दरम्यान त्यानं नियमित सराव सुरू केला. कबड्डी हा खेळ त्याच्यासाठी हळूहळू पॅशन बनला.
संघर्षाचे दिवस
अशातच २०११ मध्ये वडिलांचं निधन झालं. घरात पाच भावंडं होती. स्वतःचं घर नव्हतं, शेती नव्हती, उत्पन्नाचं साधन नव्हतं. आईवर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी आली. ती वेगवेगळ्या घरी धुण्या-भांडी करायची. महिन्याला तीनशे रुपये मिळायचे. मुलं उपाशी राहू नयेत म्हणून ती कायम झटत राहायची. अस्लमनं हे सगळं डोळ्यांसमोर पाहिलं. आई एवढ्या कठीण परिस्थितीत सगळं सांभाळू शकते, तर मी स्वतःही काहीतरी करू शकतो, हा विचार त्याने केला. त्याच्या भावांनीही वेगवेगळी कामं करून कुटुंबाला हातभार लावला.
अस्लम स्वतः चहाच्या टपरीवर ग्लास धुवायचा, ज्यूस सेंटरवर काम करायचा, शेतात मजुरी करायचा. वेळप्रसंगी टॉयलेट साफ करण्याची कामंही त्यानं केलं. टाकून दिलेल्या बाटल्या गोळा करून भंगारवाल्यांना विकायचा, जेणेकरून जेवणाचा खर्च भागेल. दिवसभर काम करून रात्री सरावासाठी जायचं, असा दिनक्रम त्यानं अनेक दिवस पाळला.
असा होता कब्बडीचा प्रवास
गावातल्या प्राईज मॅचनंतर अस्लम महाराष्ट्रभरातील स्पर्धांच्या शोधात निघाला. खिशात तिकिटाचे पैसे नसायचे. रेल्वेच्या सीटखाली झोपून प्रवास करायचा. स्पर्धेत मिळणाऱ्या जेवणावर दिवस काढायचा. कधी एका वडापाववर भागवायचा तर कधी उरलेलं जेवण बॅगेत भरून नंतर खाण्यासाठी ठेवायचा. एका मॅचसाठी दोनशे ते पाचशे रुपये मिळायचे. कधी फक्त जेवण मिळालं तरी तो खेळायचा. यातून त्याला कबड्डीच्या जगाची ओळख होत गेली.
सुरुवातीला खेळासाठी भावानं विरोध केला होता. कबड्डीमुळं करिअरमध्ये फारशी प्रगती होत नाही, म्हणून अभ्यासाकडे लक्ष द्यावं, असं त्याला वाटत होतं. वडिलांच्या निधनानंतर सहा महिन्यांनी भाऊ पोलीस दलात भरती झाला. त्यानंतर परिस्थितीत बदल झाला. अस्लमला सरावाची संधी मिळू लागली. बाहेरून होणाऱ्या कौतुकामुळं भावाचा विश्वास वाढला आणि अस्लमला त्यानं पाठिंबा द्यायला सुरुवात केली.
गावापुरता खेळ मर्यादित राहू नये, म्हणून अस्लम ठाण्याला गेला. तिथला मित्र राजू यानं त्याला आपल्या कुटुंबासोबत राहू दिलं. ठाण्यात गेल्यावर त्याला कबड्डीचं वेगळं रूप दिसलं. एअर इंडिया, युनियन बँक यांसारख्या कॉर्पोरेट संघांबद्दल त्याला कळलं. अशा संघात खेळल्यावर पैसे मिळतात, ही गोष्ट त्याला समजली. गावाबाहेर जाऊन मोठ्या पातळीवर खेळाण्याचा त्याने घेतला.
शारीरिक संकटाचा सामना
२०१४ मध्ये अस्लमच्या पायाला फ्रॅक्चर झालं. त्याला दोन-तीन वर्षं मैदानापासून दूर राहावं लागलं. कुटुंबाकडे उपचारासाठी पैसे नव्हते. शस्त्रक्रियेसाठी अनेक अडचणी आल्या. शेवटी शासकीय योजनेतून शस्त्रक्रिया झाली. त्यावर्षीच्या एशियन गेम्समधील कबड्डीचे सामने त्यानं टीव्हीवर पाहिले. दुखापतीमुळं मैदानावर नसला तरी त्या काळात त्यानं बरीच शिकवण घेतली. उपचार पूर्ण झाल्यानंतर तो पुन्हा सरावाकडे वळला.
जवळपास दशकभर मेहनत केल्यानंतर अस्लमला प्रो कबड्डी लीगची संधी मिळाली. आठव्या हंगामात त्यानं पदार्पण केलं. पहिल्याच हंगामात त्यानं संघासाठी १९० गुण मिळवले. त्या हंगामात त्याला आठ लाख रुपये मिळाले. त्या रकमेतून त्यानं आईसाठी सोन्याचा हार घेतला. सध्या तो पुणेरी पलटनचा कर्णधार आहे. वयाच्या पंचविसाव्या वर्षी ही जबाबदारी त्याच्यावर आली. सलग अनेक हंगाम त्यानं संघाचं नेतृत्व केलं. दहाव्या हंगामात त्याच्या नेतृत्वाखाली पुणेरी पलटननं विजेतेपद मिळवलं. बाराव्या हंगामात संघ फायनलपर्यंत पोहोचला.
महाराष्ट्राच्या कर्णधारपदावरही त्यानं कामगिरी केली. राज्यासाठी तीन रौप्य आणि तीन कांस्य पदकं त्यानं मिळवली. भारतासाठी त्यानं दोन सुवर्णपदकं जिंकली. २०२३-२४ साठीचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार त्याला मिळाला. एशियन गेम्सच्या फायनलमध्ये तो पहिल्या अर्धात सबस्टिट्यूट म्हणून मैदानात उतरला. भारताची बाजू मागे असताना त्यानं रेड करून सामना फिरवण्यात मदत केली. डाव्या कव्हरच्या जागेवरून तो हल्ला आणि बचाव दोन्ही बाजूंनी योगदान देतो.
ठाण्यातील सराव मैदानावर तो आता तरुण खेळाडूंशी त्याने आपला प्रवास शेअर केला. प्रो कबड्डीमुळं नाव, पैसा आणि सन्मान मिळाल्याचं त्यानं सांगितलं. आर्थिक अडचणीत असलेल्या खेळाडूंनी मोठं स्वप्न बघावं, असा सल्ला देखील त्यानं नव्या खेळाडूंना देतो.