सबिहा फातिमा
भारतीय मुस्लिमांची धार्मिक स्थळे कायदेशीर वादांत का अडकत आहेत? याचे सोपे उत्तर राजकीय घडामोडींवर खापर फोडणे हे असू शकते. मात्र हा प्रश्न त्यापेक्षाही खोल आहे. अशा वादांमुळे हा समाज आपल्याच सहनागरिकांच्या विरोधात उभा ठाकतो आणि समाजातील दरी अधिक रुंदावते. याउलट इस्लामिक इतिहासात पवित्र स्थळे वादांपासून मुक्त राहण्यावर भर दिला गेला आहे. ही स्थळे उभी असलेली जमीन न्याय्य आणि पारदर्शक मार्गाने मिळवलेली असावी, असा आग्रह इतिहासात दिसतो. अनेक ऐतिहासिक उदाहरणे हेच तत्त्व स्पष्ट करतात.
हिजरी सन ६१ मधील मोहरमच्या दुसऱ्या दिवशी मैदानावरून धूळ उडवणारे वारे वाहत होते. इमाम हुसेन इब्न अली यांचा घोडा पुढे जाण्यास नकार देतो आणि एक छोटा तांडा अचानक थांबतो. त्या ठिकाणाचे नाव एखाद्या भविष्यवाणीसारखे घुमते: करबला, दुःख आणि यातनांची भूमी. पुढे घडणाऱ्या शोकांतिकेची पूर्ण जाणीव असतानाही इमाम हुसेन यांनी लढाई सुरू होण्यापूर्वी नैतिक स्पष्टता दाखवली. त्यांनी स्थानिक आदिवासींना, प्रामुख्याने बानू असद जमातीच्या लोकांना आणि जवळच्या नयनावा व गदिरिया येथील रहिवाशांना बोलावून घेतले. त्यांनी सुमारे चार मैल बाय चार मैल आकाराची ती जमीन साठ हजार दिरहम देऊन विकत घेतली.
ती जमीन नापीक असल्याचे सांगत मालकांनी हरकत घेतली. "या शापित जमिनीत काहीच पिकत नाही," असे ते म्हणाले. भविष्यवेधी दृष्टीने इमाम हुसेन यांनी उत्तर दिले, "माझ्या आणि माझ्या कुटुंबीयांच्या व सोबत्यांच्या रक्ताने ही भूमी सुपीक होईल. इथे यात्रेकरू येतील." त्यांनी या खरेदीची नोंद आपला मुलगा अली अल-अकबर याच्या नावावर केली. त्यानंतर स्थानिक लोकांनी कबरींच्या दर्शनाला येणाऱ्या यात्रेकरूंना मार्गदर्शन करावे आणि तीन दिवस आश्रय द्यावा, या अटीवर ती जमीन धर्मादाय ट्रस्ट म्हणून परत दान केली. हा केवळ कायदेशीर व्यवहार नव्हता. हुतात्म्यांचे विश्रांतीस्थळ कायदेशीर आणि योग्य मार्गाने मिळवलेल्या जमिनीवर असावे, हा त्यामागचा कायमस्वरूपी नैतिक विचार होता.
.jpg)
"अल-मुस्तदरक" आणि इतर ऐतिहासिक परंपरांमधील नोंदी या नैतिक उदाहरणाची साक्ष देतात. मदिनेतील पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या पायाभूत कृतीतूनही हाच विचार दिसून येतो. इबादत आणि सामुदायिक जीवनासाठी जमीन शोधताना त्यांनी खजूर वाळवण्यासाठी वापरली जाणारी एक जागा निवडली. ही जमीन सहल आणि सुहेल या दोन अनाथ भावांची होती. या भावांनी ती जमीन भेट म्हणून देऊ केली, तरीही पैगंबरांनी योग्य किंमत मोजण्याचा आग्रह धरला आणि पूर्ण पारदर्शकता व न्याय राखला. वादापासून मुक्त असलेल्या या जमिनीवर मस्जिद-ए-नबवी बांधताना पैगंबरांनी अम्मार इब्न यासिर यांसारख्या सोबत्यांसोबत स्वतः श्रम केले. तिथे कोणतीही बळजबरी नव्हती, जमीन बळकावणे नव्हते आणि संदिग्धताही नव्हती; केवळ सद्भावना आणि कायदेशीर हक्क होता. हाच इस्लामचा कायमस्वरूपी आदर्श ठरला. अन्यायाचा डाग किंवा प्रलंबित दावे नसलेल्या पवित्र स्थळांमधून "दीनी हिदायत" म्हणजेच ईश्वरी मार्गदर्शन प्रकट व्हावे, हा यामागचा उद्देश होता.
वक्फ मालमत्ता या कायमस्वरूपी कराराप्रमाणे असतात. कलंकित पायावर बरकत किंवा आशीर्वाद नांदू शकत नाहीत, असा इशारा जुन्या विद्वानांनी सातत्याने दिला आहे. पहाटेच्या नमाजाची, कुराण शिक्षणाची, दानाची आणि आध्यात्मिक आश्रय शोधणाऱ्या पिढ्यांची ती जमीन स्वतःच साक्षीदार बनते. आजच्या भारतात मशिदी आणि मदरशांसाठी जमीन शोधणे ही संधी आणि आव्हान दोन्ही आहे. मालकी हक्क निर्विवाद असणे, वक्फची कागदपत्रे पूर्ण असणे, समाजाची संमती असणे आणि केवळ नमाज पठण करणाऱ्यांसोबतच संपूर्ण शेजारच्या परिसराला उपयोगी पडेल असे नियोजन असणे यातूनच आदर्श संस्था उभ्या राहतात. नमाज हॉल, वर्गखोल्या, आरोग्य सुविधा आणि सामुदायिक जागा एकत्र येऊन एकोप्याची आणि लोकसेवेची केंद्रे बनू शकतात. विस्तारणाऱ्या भारतीय शहरांतील अनेक नव्या मशिदी या दृष्टिकोनाचे उदाहरण आहेत. समाजाच्या ऐच्छिक आणि पारदर्शक योगदानातून या वास्तू उभारल्या गेल्या आहेत.

तरीही अनेक ऐतिहासिक स्थळांवर मालकी हक्काचे वाद, अतिक्रमणे, प्रदीर्घ खटले आणि विकासाच्या नावाखाली येणाऱ्या दबावांचे सावट कायम आहे. कोट्यवधी भाविकांसाठी या ठिकाणांवरील संकटे केवळ मालमत्तेचे वाद नसतात, तर ती त्यांच्या धार्मिक ओळखीसमोरील आणि सामूहिक स्मृतीसमोरील आव्हाने असतात. अजानच्या सुरांनी भाविक एकत्र येण्याची, मदरशांमध्ये कोवळी मने घडण्याची आणि वडीलधाऱ्यांनी पुढच्या पिढीकडे धार्मिक परंपरा सोपवण्याची ही ठिकाणे आहेत. असे वाद निर्माण झाल्यावर समाजाची ऊर्जा खर्च होते, सामाजिक ध्रुवीकरण वाढते आणि राजकीय फायद्यासाठी त्याचा वापर करण्याची संधी मिळते. अशा वेळी इस्लामिक शहाणपण "सब्र" म्हणजेच संयम बाळगण्याचा, न्यायालये किंवा मध्यस्थीद्वारे कायदेशीर तोडगा काढण्याचा आणि "फितना" म्हणजेच कलह टाळण्याचा सल्ला देते. मशिदीची खरी ताकद तिच्या भिंतींमध्ये नसून तिच्या निर्विवाद नैतिक आणि कायदेशीर वैधतेत असते.
भारताचा इतिहास आपल्याला महत्त्वाचे धडे देतो. प्राचीन हिंदू मंदिरे आणि इतर प्रार्थनास्थळांसह पूर्वीच्या पवित्र जागांवरील दाव्यांमुळे दशकानुदशके कायदेशीर आणि राजकीय संघर्ष पेटत राहिले आहेत. सोळाव्या शतकात बांधलेली अयोध्येतील बाबरी मशीद हे याचे ठळक उदाहरण ठरले. ही मशीद प्रभू रामाच्या जन्मस्थानी उभी असल्याच्या दाव्यांतून दशकानुदशके खटले चालले, जातीय हिंसाचार घडला आणि अखेर १९९२ मध्ये ती मशीद पाडली गेली. सर्वोच्च न्यायालयाने २०१९ मध्ये दिलेल्या निकालात वादग्रस्त जागा राम मंदिराच्या उभारणीसाठी दिली आणि मशिदीसाठी पर्यायी जमीन देण्याचे निर्देश दिले. कायदेशीर प्रक्रिया आणि पुराव्यांच्या तपासणीतून हा गुंतागुंतीचा वाद सोडवण्याचा हा न्यायालयीन प्रयत्न होता. वाराणसीतील ज्ञानवापी संकुलाबाबतही असेच प्रश्न समोर येत आहेत. तिथे पूर्वी शिवमंदिर असल्याच्या दाव्यांमधून सर्वेक्षणे, न्यायालयीन कार्यवाही आणि १९९१ च्या प्रार्थनास्थळ कायद्यांतर्गत खटले सुरू आहेत.
असेच वाद इतर ठिकाणीही उफाळून आले आहेत. न सुटलेले ऐतिहासिक दावे पवित्र स्थळांना दीर्घकाळ संघर्षात अडकवून ठेवतात, हे यातून दिसून येते. अतिक्रमणांमुळे अनेक धार्मिक संस्थांची असुरक्षितता आणखी वाढली आहे. देशभरातील मशिदी आणि मदरशांसह अनेक वक्फ मालमत्तांवर बेकायदेशीर ताबा आहे. मालकीच्या अस्पष्ट नोंदी आणि अंतर्गत प्रशासकीय कमकुवतपणा यामुळे प्रदीर्घ खटले चालतात आणि समाजाची मौल्यवान मालमत्ता हातातून जाते. त्याच वेळी बांधकाम नियमांचे उल्लंघन किंवा सार्वजनिक जमिनीवरील अतिक्रमणाच्या आरोपाखाली राबवल्या जाणाऱ्या मोहिमांतून म्हणजेच "बुलडोझर संस्कृती"तून अनेक बांधकामे पाडली गेली आहेत. अनेक राज्यांत मशिदी, मदरसे आणि संबंधित संस्थांवर झालेल्या पाडकामाच्या कारवायांच्या नोंदी समोर आल्या आहेत. प्रशासनाने या कारवायांना कायद्याची अंमलबजावणी म्हटले आहे. मात्र विशेषतः जातीय तणावाच्या काळात योग्य कायदेशीर प्रक्रिया, पुरेशी नोटीस आणि समान निकष पाळले गेले का, असा प्रश्न टीकाकारांनी उपस्थित केला आहे.
ऐतिहासिक दावे असोत, वादग्रस्त मालकी हक्क असो, अनधिकृत बांधकाम असो किंवा सरकारी कारवाई असो; या सर्वांमागचा धडा एकच आहे. कायदेशीर स्थिती अनिश्चित असलेली जमीन नेहमीच संघर्षाला निमंत्रण देते, समाजाची संसाधने खर्ची पाडते आणि सामाजिक दरी अधिक रुंदावते. तरीही तणावाच्या काळात आशा पल्लवित करणारी उदाहरणे पाहायला मिळतात. केरळ, तामिळनाडू, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमधील गावांमध्ये बिगर-मुस्लिम नागरिकांनी सद्भावना आणि माणुसकीच्या नात्याने मशिदी व मदरशांसाठी स्वेच्छेने जमीन दान केली आहे. "तुमची मुले शांततेत नमाज अदा करू शकतील," यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील जमिनीचे तुकडे दिले आहेत. मदरसे संपूर्ण समाजाची नैतिक वीण घट्ट करतात, या भावनेतून जमीनमालकांनी मदतीचा हात पुढे केला आहे.
धर्माच्या भिंती ओलांडणारी मैत्री, परस्पर सहकार्य आणि आंतरधर्मीय ऐक्यातून विश्वासाच्या अनेक कथा घडल्या आहेत. धर्मांतरित नागरिकांनी आणि संमिश्र कुटुंबांतील सदस्यांनीही वैयक्तिक श्रद्धेतून आपली वडिलोपार्जित जमीन दान केली आहे. मनापासून दिलेली आणि सन्मानाने स्वीकारलेली जमीन माणसांना जोडण्याची ताकद ठेवते, याची जाणीव या शांत कृती करून देतात. मदिना आणि करबलाची उदाहरणे केवळ ऐतिहासिक आठवणी नाहीत, तर नैतिक आचरणाचा कायमस्वरूपी आराखडा आहेत. मालकी हक्क, जमिनीची कागदपत्रे आणि वक्फ नोंदींबाबत समाजाने काटेकोर तपासणी केली पाहिजे. सुरुवातीपासूनच शेजारच्या समुदायांना मोकळेपणाने आणि प्रामाणिकपणे विश्वासात घेतले पाहिजे. निधी संकलन पारदर्शक आणि पूर्णपणे "हलाल" म्हणजेच न्याय्य मार्गाने झालेले असावे. इबादतीसोबतच शिक्षण, दानधर्म, आरोग्यसेवा आणि सामाजिक सलोखा यांतून समाजसेवा घडेल, अशी धार्मिक संस्थांची रचना असावी. वाद निर्माण झाल्यास न्याय्य चौकटीत आणि कायद्याचे पूर्ण पालन करत मध्यस्थी व न्यायालयांच्या माध्यमातूनच न्याय मिळवला पाहिजे.
.jpg)
आपल्या रक्ताने करबलाची भूमी पावन होणार आहे हे माहीत असूनही इमाम हुसेन यांनी ती जमीन कायदेशीररीत्या खरेदी केली. पवित्र उद्दिष्टे नेहमीच पवित्र मार्गांनी साध्य केली पाहिजेत, हा आदर्श पैगंबर मुहम्मद यांनी घालून दिला. भारताच्या विविधतेने नटलेल्या लोकशाहीत या तत्त्वांचे पालन केल्यास मुस्लिम संस्थांचे रक्षण होईल आणि देशाचे बहुलतावादी स्वरूपही अधिक बळकट होईल.
हेही वाचा: इस्लाममध्ये स्वच्छता हा निम्मा ईमान; परिसरातील शुद्धतेबाबत जागरूकता का गरजेची?
पवित्र भूमी म्हणजे केवळ माती नसते. तिच्यात गुंतवलेला प्रामाणिकपणा, तिचे रक्षण करणारा न्याय आणि तिच्यातून वाहणारी सेवा यांमुळे ती पवित्र बनते. प्रत्येक मशीद, मदरसा आणि वक्फ संस्था कायदेशीरदृष्ट्या सुरक्षित, नैतिक मार्गाने मिळवलेल्या आणि वादांपासून मुक्त असलेल्या जमिनीवर उभी राहील, तेव्हा सर्वाधिक वादग्रस्त जमीनही एके दिवशी शांती आणि स्मरणाची बाग बनेल. आधी मूळ भावना जपा, जमीन आपोआप सुरक्षित राहील.