योगेश जगताप
सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावाच्या काळात वाचनात पूर्णपणे गढून गेलेला तरुण पहायला मिळणं तसं दुर्मिळच. रोजच्या जगण्याचे ढीगभर अपडेट सोशल मीडियावर टाकून लाईक, कमेंट आणि शेअरच्या पाठीमागे लागलेले बहुतांश लोक आसपास ढिगाने सापडतील. बुलढाण्याच्या लोणार तालुक्यातील सुल्तानपूर गावचा मोईन काब्रा मात्र याला अपवाद आहे.
मागील १२ वर्षांत १२०० हून अधिक पुस्तकांचं वाचन केलेल्या मोईनची ओळख खंदा वाचक अशी आहेच, याशिवाय वाचन चळवळ महाराष्ट्रातील गावागावांत रुजावी म्हणून तो करत असलेले प्रयत्नही वाखाणण्याजोगे आहेत. स्वतःची ओळख मोईन ह्युमनिस्ट (मानवतावादी मोईन) अशी सांगणाऱ्या अवलिया तरुणाच्या वाचनवेडाची ही गोष्ट.
मोईनचे वडील हारूण काबरा हे रोज-मजुरी करतात तर आई एलिजा या गृहिणी आहेत. मोईनचा लहान भाऊ फैजान हा सध्या बारावीचं शिक्षण घेण्यासोबतच फोटोग्राफी करतो . मोईनचं प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषद शाळेत झालं तर दहावीपर्यंतचं शिक्षण गावातील श्री शिवाजी हायस्कुलमध्ये झालं. स्पर्धा परीक्षा करण्याचा विचार शालेय जीवनात असतानाच त्याच्या डोक्यात आला. आसपासच्या मुलांना पोलीस भरती करताना पाहून आपणही पोलीस व्हायचं असं मोईनने मनाशी पक्कं केलं.
गावातीलच दोन सुज्ञ पोरांनी त्याला उंची चांगली असल्याने पोलीस भरतीऐवजी यूपीएससी करण्याचा आणि त्यासाठी सायन्सला ऍडमिशन घेण्याचा सल्ला दिला. मोईनने त्यांचा सल्ला ऐकून सायन्स शाखा निवडत सुल्तानपूरमधेच बारावी पूर्ण केली. खरंतर मोईनला अभ्यासाची फार आवड नव्हती. मात्र सातवीत शाळेला उन्हाळ्याची सुट्टी लागल्यानंतर त्याने जब्बार पटेल दिग्दर्शित डॉ बाबासाहेब आंबेडकर चित्रपट पाहिला. त्यातील बाबासाहेब आंबेडकरांच्या पात्राने त्याला झपाटून टाकलं. आपणही डॉ बाबासाहेबांसारखं भरपूर वाचन आणि अभ्यास करायचा हे त्याने मनाशी पक्कं ठरवलं. त्यानंतर तो शालेय अभ्यासक्रमाच्या पुस्तकासोबतच अवांतर वाचनही भरपूर करू लागला.
एसटी स्टँडवरच्या पुस्तक स्टॉलवरून, शाळा-कॉलेजच्या लायब्ररीमधून तो पुस्तकं वाचायला आणायचा. आठवीत असताना त्याने डॉ एपीजे अब्दुल कलाम यांचं अग्निपंख हे पुस्तक विकत घेतलं. या पुस्तकातून त्याला आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी मेहनत करणं सोडायचं नाही ही शिकवण मिळाली. बारावीपर्यंत मोईनने मराठीतील ऐतिहासिक कादंबऱ्या (छावा, मृत्युंजय, श्रीमान योगी, पानिपत) वाचून काढल्या होत्या.
सायन्समध्ये फार रुची वाटत नसल्याने त्याने पदवीसाठी आर्टसला प्रवेश घ्यायचं ठरवलं. यासाठी एक कारण इतिहासात निर्माण झालेला रस हेसुद्धा होतंच. यूपीएससी करायची तर गावात राहून उपयोग नाही असा विचार करून मोईनने एकट्यानेच पुणे गाठलं. तिथे क्लासेसची चौकशी केली. फी वगैरेची विचारपूस करून तो परत गावाला गेला. परतच्या खेपेस येताना क्लासची अर्धी फी घेऊन आला. पदवी आणि यूपीएससी क्लास असं पॅकेज त्याला क्लासवाल्यांकडून देण्यात आलं होतं.
अर्धी फी भरल्यानंतर त्याला वाटलं की राहण्या-खाण्याची सोयसुद्धा क्लासवाल्यांकडूनच केली जाईल. मात्र हा त्याचा भ्रमनिरास होता. क्लासवाल्यांनी त्याला काही संपर्क दिले. त्या संपर्काच्या आधारावर तो रूम शोधण्यासाठी फिरला, मात्र जागा शिल्लक नसल्याचं त्याला समजलं. पुण्यात एकट्याने केवळ दुसऱ्यांदा आलेल्या मोईनला पुणे शहर तेव्हा खायला उठलं होतं. दिवसभर रूम शोधल्यानंतर एका जागी त्याची राहण्याची सोय होणार होती पण काही कारणाने ती रूम त्याला नाकारल्या गेली.
त्या हताश अवस्थेत मोईनने घरी फोन लावला आणि वडिलांना पुण्यात रहायची इच्छा नाही असं स्पष्ट सांगितलं. मी जे काही करेन ते गावात, तुमच्यासोबत राहून असा शब्द त्याने वडिलांना दिला. ग्रामीण भागातून अचानक शहरात आल्यानंतर मनात निर्माण झालेल्या न्यूनगंडामुळे मोईनने परत गावचा रस्ता धरला. क्लासला भरलेली फीही त्याला परत मिळणार नव्हती. खिन्न मानसिकतेने गावाकडे गेलेल्या मोईनने वडिलांकडे आणखी पैशांची मागणी केली. वडिलांनी त्याला २५ हजार रुपये देऊ केले.

यातून मोईनने स्टडी आयक्यू हा यूपीएससीचा ऑनलाईन क्लास लावला. शिवाय उरलेल्या पैशांत एनसीईआरटीची, काही अवांतर वाचनाची पुस्तकं विकत घेतली. घरी राहूनच पदवी पूर्ण करायची या विचाराने मुक्त विद्यापीठात बीएला ऍडमिशन घेतलं. घराशेजारीच एक पत्र्याची खोली त्याने तयार करून घेतली. तो याच ठिकाणी अभ्यासाला बसायचा. अभ्यासासोबत अवांतर वाचनाच्या पुस्तकांसाठी त्याने छोटेखानी कपाटही घेतलं होतं. हे साल होतं २०१७. मोईनने या काळात स्वतःला अभ्यासात पूर्णपणे झोकून दिलं. अवांतर वाचनही तो भरपूर करायचा. पुढील दोन वर्षांत त्याने जवळपास शंभरहून अधिक पुस्तकांचं वाचन केलं. २०१८ साली त्याने फेसबुकवर स्वतः वाचलेल्या पुस्तकांविषयी मत व्यक्त करायला सुरुवात केली.
वाचनाची आवड असलेले भरपूर लोक त्याला सोशल मीडियावर जोडले गेले. पुढे २०१९ साली मोईनला काही विविध आजारांनी विळखा घातला. त्याची तब्येत खालावली. युपीएसी च्या अभ्यासात खंड पडला. त्याच दरम्यान देशात सीएए-एनआरसी मुद्द्यावरून मुस्लिमांना टार्गेट करण्याचे प्रयत्न केले जात होते. स्वतःची बिघडलेली तब्येत, अभ्यास-वाचनाकडे होत असलेलं दुर्लक्ष आणि सामाजिक वातावरणातील तणाव यामुळे मोईन खच्ची झालेला होता. ज्या वाचनाने त्याचं संवेदनशील मन तयार केलं होतं, ते या काळात कोलमडून पडलं होतं. पुन्हा लगोलग कोरोना संकटामुळे लॉकडाऊन लागला. या सगळ्या घडामोडींनंतर मोईनने यूपीएससीचा अभ्यास बंद केला.
कोविड काळात पैशांची फार अडचण येऊ नये यासाठी मोईनने याच जागेत छोटं किराणा दुकान सुरू केलं. दिवसभर दुकान आणि वाचन करत तो वेळ घालवायचा. कधीकधी आई आणि भाऊसुद्धा दुकान सांभाळण्यासाठी मदत करायचे. याशिवाय संध्याकाळच्या वेळेत मन रमवण्यासाठी मोईनने शालेय विद्यार्थ्यांची रात्री मोफत शिकवणी घ्यायला सुरुवात केली. सोशल डिस्टनसिंगचे नियम पाळून 4 थी ते 9 वी च्या मुलांचे शिकवणी वर्ग घ्यायचा. लॉकडाऊन काळात मोईनने वाचनाचा जोर पुन्हा वाढवला. मोकळ्या रानात जाऊन झाडाखाली बसून त्याने मारुती चितमपल्ली, व्यंकटेस्श माडगूळकर वि.स.खांडेकर, हेन्री डेव्हिड थोरो, डॉ बाबासाहेब आंबेडकर, डॉ आ.ह.साळुंखे यांची पुस्तकं या काळात वाचून काढली. वाचलेल्या पुस्तकांविषयी फेसबुकवर लिहायचं त्याचं काम चालूच होतं.

मोईनच्या सोशल मीडिया पोस्ट पाहून अनेकजण त्याला पुस्तकांविषयी अभिप्राय लिहायला सांगू लागले . याच काळात पुण्यातील डॉ प्रकाश कोयाडे आणि शरद तांदळे हे मोईन च्या संपर्कात आले यांनी मोईनला वाचायला पुस्तके पाठवली. मोईनचं वाचनवेड आणि आकलन पाहून हे दोघेही भलतेच खुश झाले. विदर्भातील दुर्गम गाव खेड्यांत वाचनासाठी पुस्तकं सहज उपलब्ध होत नाहीत ही अडचण मोईनच्या लक्षात आली होती. त्यामुळे गावाकडे राहूनच पुस्तकविक्रीचं काम सुरू करता येईल का अशी विचारणा त्याने आष्टेकर यांच्याकडे केली. आष्टेकरांनी त्याला ग्रीन सिग्नल दिल्यावर त्याने तात्काळ १५ हजारांची पुस्तकं खरेदी केली.
'खजिना पुस्तकांचा' असं या पुस्तक विक्री उपक्रमाला त्याने नाव दिलं. ऑक्टोबर २०२० ते फेब्रुवारी २०२१ या काळात फेसबुक आणि व्हाट्सअपवर जोडलेल्या शेकडो लोकांपर्यंत पोहचून मोईनने जवळपास लाखभर रुपयांची पुस्तकं विकली. या कामाने त्याला आत्मविश्वास दिला. स्वतःची वाचन आवड जोपासत व्यवसायही करता येऊ शकतो हे यानिमित्ताने त्याच्या लक्षात आलं. याच कालावधीत त्याला पुण्याच्या न्यु इरा पब्लिकेशन मार्फत देण्यात येणारा पहिला स्वप्निल कोलते साहित्य प्रेरणा पुरस्कार 2022 मिळाला. जवळपास एक लाख रुपयांचं बक्षीस त्याला या पुरस्काराच्या निमित्त मिळालं.
२०१६ पासून सातत्याने वाचन प्रसारासाठी करत असलेल्या कामाबद्दल आणि स्वतः वाचनातून घडलेल्या एका जबाबदार व्यक्तिमत्त्वाबद्दल त्याला हा सन्मान मिळालेला होता. या बक्षिसाची रक्कम त्याने स्वतःची पुस्तकांची जागा म्हणजेच स्टडी बंकर व्यवस्थित करण्यासाठी आणि नवीन पुस्तकं खरेदी करण्यासाठी वापरली. या पुरस्कारानंतर अनेक माध्यमांनी सकाळ ,महाराष्ट्र टाइम्स नि bbc मराठीने त्याची दखल घेतली. यामुळे त्याचं काम अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचलं. त्याच्या वाचन चळवळीसोबत अनेक लोक जोडले गेले.

मोईनने त्याच्या पुस्तकांच्या आणि अभ्यास करण्याच्या जागेला स्टडी बंकर असं नाव दिलं आहे. आधी या जागेला तो स्टडी रूम म्हणायचा. या जागेला बंकर नाव देण्याची आठवण सांगताना मोईन म्हणतो, "माझं घर तसं बौद्ध वस्तीत. आसपासच्या लोकांना शिक्षणाचा फारसा गंध नाही. जवळच दारूच दुकान असल्याने भांडणं-मारामाऱ्या रोजच्याच. व्यसनाच्या आहारी गेलेले बरेचसे लोक. कुणी चार गोष्टी सांगायला गेलं तर त्या शांतपणे ऐकून घेण्याची मानसिकता लोकांची नाही. एकूणच सगळं नकारात्मक वातावरण. माझी स्टडी रूम मात्र या सगळ्या वातावरणापेक्षा वेगळा अनुभव देणारी. युध्दासंदर्भात काही पुस्तकं वाचत असताना बंकर हा शब्द मला समजला होता. बंकर म्हणजे अशी जागा ज्या ठिकाणी बॉम्ब पडला तरी सुखरूप लपून राहता येतं. कुठल्याही हल्ल्यापासून वाचता येतं. माझी वाचनाची आणि पुस्तकाची जागा अशीच तर आहे. आसपासच्या नकारात्मकतेपासून दूर जात मला याठिकाणी शांतपणे माझं काम करता येतं. म्हणून ही जागा माझ्यासाठी स्टडी बंकर आहे."
लॉकडाऊन आणि त्यानंतरच्या काळात मोईनला वाचन आणि त्याच्याशी निगडित विषयांवर ऑनलाईन आणि ऑफलाईन व्याख्यान देण्यासाठी अनेक संस्थांनी बोलावलं. शाळा-कॉलेजच्या मुलांसोबतच वाचनालयाच्या सभासदांसमोर बोलण्याची मोईनला आता सवयच झाली आहे. आधी मोफत मोईन व्याख्यानाला जायचा. विषय वाचन ,पुस्तके हाच असायचा आता मात्र अनेक ठिकाणी त्याला चांगलं मानधन आणि पुस्तकंही भेट मिळतात. आतापर्यंत मोईन अशा ७० हून अधिक कार्यक्रमांना उपस्थित राहिला आहे.
स्वतः करत असलेल्या कामाची स्पष्टता मोईनला आहे. केवळ पदवी शिक्षण घेऊन उपयोग नाही हे त्याच्या लक्षात आल्यानंतर त्याने पदव्युत्तर शिक्षणासाठी आणखी अभ्यास करायचं ठरवलं. पुस्तक विक्रीचं काम दुसऱ्या बाजूला सुरूच होतं. बुलढाण्याच्याच राजू केंद्रे या तरुणाची मदत घेऊन मोईनने पदव्युत्तर शिक्षणाची तयारी सुरु केली. २०२४ साली त्याला हैद्राबादमधील कौटिल्य स्कुल ऑफ पब्लिक पॉलिसीला २ वर्षांच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळाला.
महाराष्ट्राबाहेर जाण्याची मोईनची ही पहिलीच वेळ. याठिकाणी त्याने स्वतःमधील न्यूनगंड आणि भीती दूर करत भारतभरातून आलेल्या तरुणांशी मैत्री केली. शिक्षण आणि पर्यावरण विषयातील महत्त्वाच्या संकल्पना समजून घेतल्या. सामाजिक हिताची धोरणं आखताना आणि राबवताना कोणत्या गोष्टी बारकाईने अभ्यासायच्या हे त्याला इथल्या अभ्यासक्रमात शिकायला मिळालं. इंग्रजी भाषेच्या लिखाणात आणि बोलण्यात येणाऱ्या अडचणीही त्याने इथे सरावाने दूर केल्या.
याशिवाय स्वतःच्या वाचन प्रवासाशी साधर्म्य असणारा Revive Reading Culture in Rural Maharashtra या प्रकल्प घेऊन अभ्यासक्रम पूर्ण केला. हा अभ्यासक्रम सुरू असताना मोईनच्या सहकाऱ्यांनी पुस्तक विक्रीचं काम थोडक्या स्वरूपात का होईना सुरू ठेवलं. यंदाच्या एप्रिल महिन्यात मोईन महाराष्ट्रात परतला. आल्यानंतर त्याने पुण्यातील प्रवीण निकम यांच्या समावेश संस्थेसोबत इंटर्नशीप पूर्ण केली. एनजीओची कार्यपद्धती, सेक्शन ८, सीएसआर, देणगी मिळवण्यासाठी कराव्या लागणाऱ्या खटपटी या सगळ्यांचा अभ्यास त्याने इंटर्नशिप कालावधीत केला.
मागील चार-पाच महिन्यांत मोईनने स्टडी बंकरचा विस्तार करण्याकडे लक्ष दिलेलं आहे. खजिना पुस्तकांचा हे सुरुवातीला त्याने पुस्तक विक्री आणि वाचन चळवळीला दिलेलं नाव बदलून आता We Read असं केलेलं आहे. अधिकाधिक ऍक्टीव्हीटी राबवून वाचकांना जोडून घेण्याचे त्याचे प्रयत्न सुरू आहेत. ज्ञानप्रेमी उपक्रमाच्या माध्यमातून तो वाचकांच्या शंका समजून घेऊन त्यांना उत्तरं देतो. बुक टॉक विथ मोईन या उपक्रमाच्या माध्यमातून तो स्वतः वाचलेल्या पुस्तकांची माहिती सोशल मिडियाबर जोडलेल्या वाचकांना देतो.
We Read Circle च्या माध्यमातून आठवड्यातून एक दिवस ऑनलाईन वाचन कट्टा आयोजित करून आपल्या आवडीचं कोणतंही पुस्तक तासभर वाचून त्याविषयी संवाद साधण्याची संधी तो वाचकांना देतो. फकिरा या अण्णाभाऊ साठे लिखित कादंबरीबर त्याने राज्यस्तरीय निबंध स्पर्धाही घेतली होती. एका पत्रलेखन स्पर्धेचं आयोजनही त्याने केलं. स्पर्धेला महाराष्ट्रभरातून लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. मोईन हा त्याच्या घरातील पहिलाच पदवीधर. शिक्षण पूर्ण झाल्यानंतरही पैसा कमावण्याच्या मागे न लागता त्याने आणखी गोष्टी शिकण्याचा विचार केला. गाव-खेड्यांतील मुलांना शिक्षणाच्या बऱ्याच संधी माहीत नसतात.
गावाकडे व्यसन आणि अंधश्रद्धेत गुरफटल्यामुळे त्यांचं करिअरकडे पूर्णपणे दुर्लक्ष झालेलं असतं. मोईनने ही परिस्थिती जवळून अनुभवलेली असल्याने शाळा-कॉलेजमधील मुलांशी तो वारंवार संवाद साधत असतो. त्याच्यामध्ये ही सगळी प्रेरणा वाचनातून आलेली आहे. आतापर्यंत त्याने दहा मुला-मुलींना उच्च शिक्षणासाठी बाहेरच्या शहरात जाण्यासाठी मदत केलेली आहे. शिक्षण विषयात चांगलं काम करणाऱ्या राजू केंद्रे, प्रवीण निकम यांना अशी मुलं जोडून देऊन मोईन शिक्षणातील दरी मिटवण्याचं काम करत आहे.
मोईनच्या या संपूर्ण प्रवासात त्याने आदर्श मानलेल्या तीन व्यक्तींचा मोलाचा वाटा आहे. तथागत गोतम बुद्ध, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि तत्त्वचिंतक हेन्री डेव्हिड थोरो. गोतम बुद्धाच्या मार्गावर चालत असताना त्याने प्रज्ञा, दया, करुणा हे गुण स्वतःमध्ये निर्माण केले आहेत. डॉ बाबासाहेब आंबेडकरांकडून त्याला भरपूर वाचनाची आणि उच्च शिक्षण घेण्याची प्रेरणा मिळाली. तर थोरोच्या वाचनातून साधी राहणी, निसर्गाशी अधिक जवळीकता आणि सर्व प्राणिमात्रांविषयी आदर आणि प्रेमभाव मोईनने अंगीकारला आहे.
भारतातील जाती-धर्मांचं वैविध्य पाहता धर्मग्रंथ आणि इतर अध्यात्मिक साहित्याचं आकलन करून घेणं मोईनला गरजेचं वाटत होतं. त्यातून त्याने कुराण, भगवद्गीता, बायबल, ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा यांचं वाचन केलं. तो विचार समजून घेतला. सोबतच रिचर्ड डॉकिन्स आणि युवाल नोआ हरारी यांनी लिहिलेली बुद्धीप्रामाण्यवादी पुस्तकंही त्याने वाचून काढली. मोईनने आजअखेर वाचलेल्या पुस्तकांचा आकडा जवळपास १३२२ इतका आहे. वाचलेल्या प्रत्येक पुस्तकाची नोंद करणं, त्याचं टिपण काढणं हे काम तो न चुकता करतो. अलीकडे त्याने पुस्तक वाचण्याचा वेग कमी केलाय. वाचलेलं प्रत्येक पुस्तक मी जगायला हवं अशी त्याची भूमिका आहे. "वाचनामुळे माझ्यात अंतर्बाह्य बदल झाला. मी अधिक संवेदनशील माणूस बनलो. स्वच्छंदी जगू लागलो.
शिवाय जे बोलतो ते कृतीत आणण्यासाठी भरपूर मेहनत करायची ही शिकवणसुद्धा मला वाचनाने दिली, असं मोईन आवर्जून सांगतो. पुण्यातील ऍडमिशन कॅन्सल करून आल्यानंतर मोईनला अनेकांनी नावं ठेवली होती. गावात राहून काय करणार असा उपहासात्मक प्रश्नही विचारला होता. मागील आठ नऊ वर्षांतील मोईनचा प्रवास हा त्या सगळ्यांना उत्तर आहे. मोईनला अलीकडेच ग्रामरत्न पुरस्काराने गौरवण्यात आलं. शिवाय महाराष्ट्र शासनाच्या भाषा संचालनालयामार्फत १५ ऑक्टोबर २०२६ रोजी वाचन प्रेरणा दिनानिमित्त त्याचा मुंबईत वाचन प्रेरणा पुरस्कार देऊन सत्कारही करण्यात आला. दाभोलकर कुटुंबियांनीही मोईनच्या कामाची दखल घेऊन त्याला २ लाख रुपयांची आर्थिक मदत केली आहे. मोईनच्या प्रामाणिक मेहनतीची ही पोचपावतीच म्हणायची.
वंचित,मुस्लिम नि दुर्लक्षित समाजामध्ये शिक्षणाविषयी असलेली अनास्था मोईनला दूर करायची आहे. पारंपरिक रूढी आणि विचारांमध्ये गुरफटलेल्या मुस्लिम समाजातील मुलांनी चांगलं शिक्षण घेतलं तर ते स्वतः प्रगती करतीलच, शिवाय सामाजिक भेदभावाची दरी कमी करण्यासाठीही त्याचा उपयोग होईल असं मोईनला वाटतं. विवेकी आणि वैज्ञानिक विचार अंगीकारून प्रगती केलेल्या मुस्लिम बांधवांची उदाहरणं मुस्लिम समाजात आवर्जून सांगायला हवीत.
त्यांच्या कामाची ओळख करून द्यायला हवी अशी मोईनची भावना आहे.
गावातील स्टडी बंकरच्या जागेतच थोडं बांधकाम वाढवून दवाखान्यानिमित्त सुल्तानपूर, मेहकर भागात दुरून येणाऱ्या गरजू लोकांच्या राहण्याची सोय मोईन सध्या करत आहे. ग्रामीण भागात हॉटेल किंवा राहण्याच्या फारशा सोयी उपलब्ध नसल्याने मोईनने स्वतःहुनच यासाठी पुढाकार घेतला आहे. येत्या काळात पब्लिक पॉलिसीच्या उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याचा मोईनचा विचार आहे. त्यासाठी त्याची तयारी सुरू आहे. तूर्तास स्टडी बंकर आणि वी रीड वाचन चळवळीच्या कामात त्याचे ४-५ मित्र मैत्रीण सक्रिय आहेत. सुल्तानपूरच्या स्टडी बंकरचं मॉडेल महाराष्ट्रभरात जवळपास १०० ठिकाणी उभारण्याचं मोईनचं दीर्घकालीन स्वप्न आहे.
या बंकरमध्ये वाचनासाठी भरपूर पुस्तकं उपलब्ध असतील, लोक याठिकाणी येऊन पुस्तक वाचतील, चर्चा करतील, वेगवेगळे विचार समजून घेतील आणि त्यातूनच समाजाचं वैचारिक भरणपोषण होईल असा विश्वास मोईनला वाटतो. सध्या तंत्रज्ञानाचा वापर वाढलेला असून ते जितकं फायद्याचं तितकंच तोट्याचं आहे याची जाणीव मोईनला आहे. वाढता स्क्रीन टाईम आणि आयती उत्तरं मिळवण्याची सवय तरुणांसाठी हानिकारक असल्याचं मोईनला वाटतं. अशा परिस्थितीत मन आणि मेंदूची मशागत करण्यासाठी भेसळ नसलेली सकस पुस्तकं लोकांनी वाचायला हवीत हाच मोईनच्या एकूण धडपडीचा उद्देश आहे. त्याच्या धडपडीला आवाज द व्हॉईस टीमच्या सदिच्छा..!