मोईन खान : इस्लामचे धार्मिक माहिती देणारा लोकप्रिय क्रिएटर

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 4 h ago
मोईन खान
मोईन खान

 

फरहान इस्रायली

राजस्थानच्या जयपूरमधील अवघ्या २७ वर्षीय मोईन खानची कहाणी म्हणजे स्वतःमध्ये घडवून आणलेले आमूलाग्र परिवर्तन, चिकाटी आणि बदललेल्या हेतूचा एक सुंदर प्रवास आहे. सोशल मीडियावर त्यांची ओळख एका रात्रीत निर्माण झालेली नाही. वर्षानुवर्षे घेतलेले कष्ट, कुटुंबाचा संघर्ष, हास्य-विनोद आणि प्रेक्षकांशी जोडले जाण्याच्या पद्धतीत केलेला एक मोठा बदल याचे ते फलित आहे.

मित्रांसोबतच्या साध्या गप्पा-टप्पा आणि थट्टेमधून सुरू झालेला हा प्रवास हळूहळू एका व्यवसायात बदलला. मोईनने सुरुवातीला प्रँक व्हिडिओ आणि सोशल एक्सपेरिमेंट बनवून लाखो लोकांचे लक्ष वेधून घेतले. पण एका टप्प्यावर त्याने आपल्या कंटेंटला पूर्णपणे एका नव्या दिशेने नेण्याचा निर्णय घेतला. आज तो इस्लामिक शिक्षण, हजरत मोहम्मद पैगंबर यांचे जीवन आणि इस्लामिक इतिहासावर आधारित व्हिडिओ बनवतो.

सोशल मीडियावर 'मोईन जयपूर टीव्ही' (Moin Jaipur TV) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मोईनचे विविध डिजिटल प्लॅटफॉर्मवर मिळून १.७७ दशलष्टांहून अधिक फॉलोअर्स आणि सबस्क्राईबर्स आहेत.

जयपूरच्या खो नागोरियान भागात राहणाऱ्या मोईनने कोणतीही मोठी व्यावसायिक योजना डोक्यात ठेवून या प्रवासाची सुरुवात केली नव्हती. कॉलेजच्या दिवसांत मित्रांसोबत थट्टा करण्याची त्याची सवय कॅमेऱ्यासमोर कशी आली, हे त्याचे त्यालाच समजत गेले. बारावीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याने ग्रॅजुएशन केले आणि पुढे पत्रकारितेमध्ये मास्टर डिग्री घेतली, जी त्याने २०२२ मध्ये पूर्ण केली. मात्र, सोशल मीडियाबद्दलची त्याची रुची कॉलेजच्या काळातच निर्माण झाली होती.

सर्वसामान्य लोकांना सोबत घेऊन प्रँक व्हिडिओ बनवावेत, असा सल्ला त्याच्या मित्रांनी त्याला दिला. मोईनचा हसमुख स्वभाव आणि कॉमेडीमधील रस यामुळे त्याला ही कल्पना खूप आवडली. तो परदेशी युट्यूब चॅनल 'रेबेल टीव्ही'चे प्रँक व्हिडिओ नियमितपणे पाहत असे, ज्याने त्याला स्वतःचे चॅनल सुरू करण्याची प्रेरणा दिली.

आपल्या चॅनलच्या नावामध्ये जयपूरशी असलेल्या आपल्या जोडणीची झलक असावी, अशी त्याची इच्छा होती. सुरुवातीला त्याने त्याचे नाव 'जयपूर प्रँक टीव्ही' ठेवले. जसजसे त्याचे काम विस्तारले, तसतसे त्याने नाव लहान करून 'जयपूर टीव्ही' केले. २०१७ मध्ये त्याने त्या नावा ंर एक डोमेन देखील नोंदवले.
 

व्हिडिओ झाले व्हायरल 
सुरुवातीच्या काळात प्रेक्षकवर्ग तयार करणे सोपे नव्हते. मोईनला सतत नवीन व्हिडिओ बनवावे लागत असत आणि बऱ्याचदा हवी तशी व्ह्यूज न मिळताही तो प्रचंड मेहनत घेत होता. २०१८ मध्ये परिस्थिती बदलली, जेव्हा त्याने इतर एका कन्टेन्ट क्रिएटरसोबत मिळून एक सोशल एक्सपेरिमेंट व्हिडिओ बनवला. तो चार-पाच मिनिटांचा व्हिडिओ पाहता पाहता एका रात्रीत १.२ दशलष्टांपेक्षा जास्त वेळा पाहिला गेला, ज्यामुळे त्याच्या डिजिटल करिअरला एक मोठी गती मिळाली.

याच काळात त्याने हिंदू-मुस्लिम बंधुभाव आणि सामाजिक सलोखा वाढवणारे व्हिडिओही तयार केले. रक्षाबंधनासारख्या सणांच्या निमित्ताने बनवलेल्या व्हिडिओना प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. कॉलेजच्या काळात त्याच्या एका जुन्या व्हिडिओला तब्बल पाच कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले, ज्यामुळे त्याला मोठी ओळख मिळाली. तसेच, २०१७ च्या सुरुवातीला १००,००० सबस्क्राईबर्स पूर्ण केल्याबद्दल त्याला युट्यूबचा सिल्व्हर प्ले बटण पुरस्कार मिळाला.

या वाढत्या लोकप्रियतेमागे एक अत्यंत वैयक्तिक प्रेरणा होती: आपल्या कुटुंबाला आर्थिक आधार देणे. मोईनचे वडील बांधकाम साहित्याचा व्यवसाय करतात आणि कुटुंबाची आर्थिक जबाबदारी सांभाळण्याची मोठी जबाबदारी होती. त्यामुळे युट्यूब आणि प्रमोशनल असाइनमेंटमधून मिळणारे उत्पन्न हे केवळ वैयक्तिक यश नव्हते, तर घर चालवण्यास हातभार लावण्याचा एक मार्ग होता.

कोविड लॉकडाऊनच्या अगदी आधी, युट्यूब आणि प्रमोशनल कामातून मिळणारी त्याची मासिक कमाई सुमारे १.५ लाख ते २ लाख रुपयांपर्यंत पोहोचली होती. महामारीच्या काळात काही पेमेंट्स मिळण्यास उशीर झाला. जेव्हा ती अडकलेली रक्कम अखेरीस खात्यात जमा झाली, तेव्हा एकूण २.५८ लाख रुपये आले. मोईनने ती रक्कम मिळताच एका जुन्या इच्छेला पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. त्याने एक मारुती अल्टो कार विकत घेतली आणि ती आपल्या वडिलांना भेट दिली. हा त्याच्या आयुष्यातील सर्वात संस्मरणीय क्षणांपैकी एक असल्याचे तो मानतो.
 

एक नवी सुरुवात
सुरुवातीला यश मिळाले असले, तरी हा प्रवास इतका सोपा नव्हता. २०१९ ते २०२१ या काळात त्याच्या कामात अडथळे आले आणि लॉकडाऊनमुळे व्हिडिओचे शूटिंग पूर्णपणे ठप्प झाले. २०२१ च्या शेवटी, त्याचे जुने इन्स्टाग्राम अकाऊंट, ज्यावर २ लाखांहून अधिक फॉलोअर्स होते, सस्पेंड करण्यात आले. त्याला नवीन अकाऊंटवरून पुन्हा नव्याने सुरुवात करावी लागली.

२०२२ नंतर मोईनने सुमारे दीड वर्ष एका प्रोडक्शन हाऊसमध्ये काम केले, तिथे त्याने अभिनय आणि दिग्दर्शनाचे धडे गिरवले. काही काळ दिल्लीत राहून त्याने 'ड्रीम ११' सारख्या मोठ्या ब्रँड्सच्या जाहिरातींवरही काम केले. मात्र, पारंपरिक नोकरी करणे आपल्यासाठी नाही, याची त्याला शेवटी जाणीव झाली. त्याला स्वतंत्रपणे काम करणे आणि स्वतःचे काहीतरी उभे करणे अधिक आवडत होते. तो पुन्हा जयपूरला परतला आणि आपल्या चॅनलचे काम नव्याने सुरू केले.

त्याच्या डिजिटल करिअरमधील सर्वात मोठा टप्पा २०२४ च्या रमझान महिन्यात आला. त्या काळाच्या आधी, त्याच्या कुटुंबातील सदस्य उमराहसाठी बाहेर गेले होते, ज्यामुळे घरी धार्मिक विषयांवर अधिक चर्चा होऊ लागली. रमझानच्या काळात मोईनने एका उपवाशी व्यक्तीवर स्क्रिप्टेड व्हिडिओ बनवला, ज्याला पैशांचे आमिष दाखवूनही तो आपल्या श्रद्धेमुळे उपवास सोडण्यास नकार देतो. त्या व्हिडिओला जवळपास पाच लाख व्ह्यूज मिळाले.

या प्रतिसादाने प्रोत्साहित होऊन त्याने इस्लामिक ज्ञानावर आधारित प्रश्न-उत्तरे करणारा एक व्हिडिओ बनवला. त्याचा विस्तार त्याच्या अपेक्षेपेक्षा खूप जास्त होता. फेसबुकवर त्याला १.२ कोटी, इन्स्टाग्रामवर ८० लाख आणि युट्यूबवर २५ लाख व्ह्यूज मिळाले. या अभूतपूर्व प्रतिसादाने त्याला आपल्या कंटेंटची दिशा बदलण्यास प्रवृत्त केले. २०२४ च्या शेवटी, त्याने इस्लामिक कंटेंटसाठी एक स्वतंत्र युट्यूब चॅनल सुरू केले.
 

सोशल मीडियाद्वारे धार्मिक ज्ञानाचा प्रसार
आज मोईनचे व्हिडिओ हजरत मोहम्मद पैगंबर यांचे जीवन, इस्लामिक इतिहास आणि इस्लामविषयीचे गैरसमज दूर करण्यावर केंद्रित असतात. विविध प्लॅटफॉर्मवर त्याचे डिजिटल अस्तित्व सातत्याने वाढत आहे. इन्स्टाग्रामवर त्याचे ४.२१ लाख फॉलोअर्स आहेत, तर त्याच्या दोन फेसबुक पेजेसना सुमारे नऊ लाख लोकांचे अनुसरण आहे. त्याच्या नवीन इस्लामिक युट्यूब चॅनलने एक लाख सबस्क्राईबर्सचा टप्पा ओलांडला आहे, तर जुन्या 'जयपूर टीव्ही' चॅनलचे ३.४७ लाख सबस्क्राईबर्स आहेत.

धार्मिक कंटेंट बनवताना आपण अत्यंत काळजी घेतो, असे मोईन सांगतो. आपण स्वतःला कोणताही इस्लामिक अभ्यासक मानत नाही आणि मोठ्या प्रेक्षकांसमोर कोणतीही माहिती मांडण्यापूर्वी ती तपासून घेतली पाहिजे, यावर त्याचा विश्वास आहे. विश्वसनीय पुस्तकांमधून तो तथ्यांची पडताळणी करतो आणि गरज भासल्यास इस्लामिक विद्वान मंडळींचा सल्ला घेतो.

प्रँक क्रिएटर म्हणून आलेल्या अनुभवाने त्याला जबाबदारीचे महत्त्वही शिकवले आहे. २०१९ मध्ये एका प्रँकदरम्यान एक व्यक्ती इतकी घाबरली की तो प्रकार पोलिसांपर्यंत पोहोचला. या अनुभवामुळे मनोरंजनाच्या नावाखाली कोणाला त्रास देणे चुकीचे आहे, याची मोईनला जाणीव झाली. त्यानंतर त्याने संबंधित लोकांच्या संमतीशिवाय प्रँक व्हिडिओ बनवणे बंद केले.

तसेच बेटिंग आणि गेमिंग ॲप्लिकेशन्सच्या lucratice (नफ्याच्या) जाहिरातींच्या मोठ्या ऑफर्स तो नाकारतो. अशा प्रकारच्या जाहिराती त्याच्या तत्त्वांच्या विरोधात आहेत आणि त्याचे वडीलही त्याला या गोष्टीची परवानगी देत ​​नाहीत, असे मोईन सांगतो. त्याऐवजी तो जयपूरमधील स्थानिक दुकाने, रेस्टॉरंट्स आणि कॅफेचे प्रमोशन करणे पसंत करतो.
 

भविष्याची स्वप्ने
मोईन आपल्या भावंडांमध्ये सर्वात मोठा आहे. त्याचा लहान भाऊ मोहसीन हा फिजिओथेरपिस्ट आहे. तो त्याचे अधिकांश शूटिंग आणि एडिटिंगचे काम घरूनच करतो, ज्यामध्ये अनमोल, चेतना आणि समीर यांचा समावेश असलेली त्याची छोटीशी टीम त्याला मदत करते. जयपूर हे त्याच्या सर्जनशील कामाचे केंद्रस्थान राहिले आहे. मालवीय नगर, मानसरोवर, सिटी पार्क, जलमहाल आणि अल्बर्ट हॉल ही त्याच्या व्हिडिओ शूटिंगसाठी अत्यंत आवडती ठिकाणे आहेत.

त्याच्या या प्रयत्नांमुळे त्याला अनेक पुरस्कारांनीही गौरवले गेले आहे. कोटा येथे त्याला 'बेस्ट क्रिएटर' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आणि राजस्थानच्या 'RIFA' पुरस्कार सोहळ्यातही त्याचा सत्कार झाला. भविष्यात मोईनला पत्रकारितेतील आपले शैक्षणिक पार्श्वभूमी आणि डिजिटल कन्टेन्ट क्रिएटर म्हणून असलेला अनुभव एकत्र आणायचा आहे. रिपोर्टर आणि अँकर यांना इस्लामिक विषयांचे अधिक सखोल आणि अचूक ज्ञान असलेले एक मीडिया प्लॅटफॉर्म उभे करणे हे त्याचे स्वप्न आहे.

रस्त्यावर लोकांची मने जिंकून हसवण्यापासून ते श्रद्धा आणि इतिहासावर आधारित व्हिडिओ बनवण्यापर्यंतचा मोईनचा हा प्रवास डिजिटल क्रिएटर्स स्वतःमध्ये कसा बदल घडवू शकतात, हे सुंदरपणे दाखवून देतो. त्याच्यासाठी पुढचा टप्पा केवळ प्रेक्षकसंख्या वाढवणे हा नसून, कन्टेन्ट क्रिएशन आणि जबाबदार पत्रकारिता यांचा सुवर्णसंगम घडवणारे एक हक्काचे व्यासपीठ तयार करणे हा आहे.
 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter