रुबाब अजीज शहा : शेतकऱ्याच्या हक्काचा व्यापारी

Story by  Bhakti Chalak | Published by  Bhakti Chalak • 12 h ago
रुबाब अजीज शहा
रुबाब अजीज शहा

 

भक्ती चाळक

सकाळी बाजारात कोणत्या शेतीमालाला किती भाव मिळतोय, कोणत्या पिकाला मागणी वाढतेय आणि शेतकऱ्यांनी आपला माल कधी विकावा, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आज १९ वर्षांच्या एक तरुण देतोय. मोबाईलवरून त्याचे व्हिडिओ पाहणारे हजारो शेतकरी त्याच्या बाजारभावाच्या अंदाजाकडे लक्ष ठेवून असतात. विशेष म्हणजे तो स्वतः एक व्यावसायिक आहे. तर त्या तरुण व्यावसायिकाचे नाव आहे रुबाब शहा.

चिंच, मिरची, मका आणि सोयाबीनच्या व्यापारात स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या रुबाबचा प्रवास अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. वडिलांच्या व्यवसायात लहानपणापासून मदत करता करता त्याने बाजारपेठेची गणितं समजून घेतली. शेतकरी, व्यापारी आणि परदेशातील खरेदीदार यांच्याशी संपर्क वाढवला. आज त्याच्या कुटुंबाचा व्यवसाय भारतातील विविध राज्यांसोबतच दुबई, दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेशपर्यंत पोहोचला आहे.
 

वडिलांच्या व्यवसायातच रुजली व्यापाराची आवड
रुबाब शहा हा मूळचा जालन्याच्या गोद्री गावचा. वडील अजीज शहा अयुब शहा व्यवसाय करतात, तर आई समिनाबी गृहिणी आहेत. त्याला दोन बहिणी असून मोठी बहीण मुस्कान रशीद शहा हिचं लग्न झालं आहे, तर लहान बहीण अलमाश अजीज शहा शिक्षण घेत आहे. रुबाबच्या मोठ्या बहिणीच्या नावावरूनच त्यांच्या व्यवसायाला ‘मुस्कान ट्रेडिंग कंपनी’ असं नाव देण्यात आलंय.

रुबाबने गेल्या वर्षी सायन्समधून बारावी पूर्ण केली. पुढे एमबीए करण्याचा त्याचा विचार आहे. मात्र, त्याच्या आयुष्यात व्यवसायाची सुरुवात शाळेच्या वयातच झाली होती. वडिलांचा चिंचेचा व्यवसाय असल्याने लहानपणापासून तो त्यांच्या सोबत बाजारात जात असे. सुरुवातीला मालाचं वजन करणं, काट्यावर आकडे घेणं अशी छोटी कामं तो करायचा. हळूहळू पैशांचा हिशेब ठेवणं, व्यवहार समजून घेणं आणि मालाची खरेदी-विक्री कशी होते, हे शिकत गेला.

वडिलांच्या व्यवसायात काम करताना त्याला चिंचेच्या व्यापाराची समज आली. शेतकऱ्यांकडून माल घेतल्यानंतर त्याचं पुढे काय होतं, कोणत्या बाजारपेठेत त्याला मागणी असते, कोणत्या व्यापाऱ्याला किती माल लागतो, याची माहिती तो स्वतःहून मिळवू लागला. पुढे बाजारपेठांना भेटी देऊन नवीन व्यापारी आणि शेतकऱ्यांशी संपर्क वाढवण्यासही त्याने सुरुवात केली.

या प्रवासाबद्दल सांगताना रुबाब म्हणतो, “मी साधारण दहा वर्षांचा असल्यापासून पप्पांना व्यवसायात मदत करायला सुरुवात केली. आधी काट्यावर वजन करायचो. नंतर पैशांचा हिशेब ठेवायला शिकलो. हळूहळू माल कुठे जातो, त्याची पुढे कशी विक्री होते, हे समजत गेलं. पप्पांसोबत राहूनच व्यवसायाची माहिती मिळाली.”
 

व्यवसायाचा विस्तार
रुबाबच्या वडिलांनी गोद्री गावातून चिंचेच्या व्यवसायाची सुरुवात केली होती. सुरुवातीला चिंच पॅकिंग करून आंध्र प्रदेशात पाठवली जात असे. मात्र, पुढे रुबाबने व्यवसायातील काही गोष्टी बदलण्याचा प्रयत्न केला. शेतकरी आणि व्यापाऱ्यांशी संपर्क वाढवला. बाजारपेठेतील मागणी समजून घेतली आणि मालाची विक्री अधिक चांगल्या पद्धतीने करण्यासाठी प्रयत्न केले.

आज त्यांच्या व्यवसायाचं काम छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड येथेही सुरू आहे. तिथे त्यांचं आडत दुकान आहे. चिंच आणि इतर शेतीमालाची मागणीनुसार देशातील वेगवेगळ्या बाजारपेठांमध्ये तसेच परदेशात निर्यात केली जाते.

दुबई आणि दक्षिण आफ्रिकेत चिंचेसह इतर शेतीमाल पाठवला जातो. भोकरदनमधील मिरचीची निर्यात प्रामुख्याने बांगलादेशात होते. मक्यालाही बांगलादेशमध्ये मोठी मागणी आहे. बाजारातील गरज लक्षात घेऊन व्यापाऱ्यांकडून माल खरेदी करून पुढील ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचं कामही त्यांच्या व्यवसायातून होतं.
 

शेतकऱ्यांच्या प्रश्नांना रील्समधून उत्तर
व्यवसाय करताना रुबाबचा शेतकऱ्यांशी रोजचा संपर्क वाढत होता. बाजारात कोणत्या मालाला किती भाव आहे, पुढील काही दिवसांत दर वाढण्याची किती शक्यता आहे, मिरचीची तोडणी कधी करावी, अशा प्रश्नांसाठी शेतकरी त्याला फोन करत असत. त्यावेळी त्याला जाणवलं की बाजारपेठेची माहिती आपल्याकडे आहे, पण ती मोजक्या लोकांपुरती मर्यादित न राहता अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचायला हवी.

साधारण तीन वर्षांपूर्वी त्याने सोशल मीडियावर रील्स बनवायला सुरुवात केली. सुरुवातीला फारसं तांत्रिक ज्ञान नव्हतं. व्हिडिओ कसा बनवायचा, काय बोलायचं, माहिती कशी मांडायची, हे शिकतच त्याने दोन-चार व्हिडिओ पोस्ट केले. त्याला म्हणावा असा प्रतिसाद मिळाला नाही. मात्र मागील वर्षी मक्याच्या बाजारभावाबद्दल केलेल्या एका व्हिडिओला तब्बल दोन लाख व्ह्यूज मिळाले. तिथून त्याच्या व्हिडिओंना चांगला प्रतिसाद मिळू लागला. आज त्याच्या काही व्हिडिओंना चार ते पाच लाखांपर्यंत व्ह्यूज मिळतात. 

रील्स बनवण्यामागचा उद्देश स्पष्ट करताना रुबाब म्हणतो, “शेतकरी मला बाजारभाव विचारायचे. मिरची कधी तोडावी, माल विकण्यासाठी किती दिवस थांबावं, असे प्रश्न असायचे. मग काही शेतकऱ्यांनीच मला रील्स बनवण्याचा सल्ला दिला. मला वाटलं, आपण बाजारात असतोच, तर आपल्याकडची माहिती अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावी. त्यातून त्यांचा काही फायदा झाला, तर तेच माझ्यासाठी महत्त्वाचं आहे.”
 

बाजाराचा अभ्यास करून देतो शेतकऱ्यांना सल्ला
बाजारातील आवक, पावसाची परिस्थिती, उत्पादनातील घट, निर्यातीची मागणी आणि व्यापाऱ्यांकडून मिळणारी माहिती अशा अनेक गोष्टींचा रुबाब अभ्यास करतो. त्यानंतर बाजारात पुढे काय घडू शकतं, याचा अंदाज बांधून शेतकऱ्यांशी माहिती शेअर करतो. आणि त्याने दिलेले अंदाज बरोबरही ठरतात. यासाठी तो स्वतः बाजारातील परिस्थिती समजून घेतो. वडिलांचे व्यापारी आणि निर्यातदारांशी असलेले संबंधही त्याला फायदेशीर ठरतात. 

यंदा मराठवाडा, मध्य प्रदेश आणि राजस्थानसारख्या भागांत पावसाचं प्रमाण कमी राहिल्याने उत्पादनावर परिणाम झाल्याचं त्याने सांगितलं. दुसरीकडे, निर्यात बाजारातही मागणी असल्याने त्याचा परिणाम स्थानिक बाजारभावावर होऊ शकतो, असा त्याचा अभ्यास आहे.

व्यापाऱ्यांचा विरोध, पण शेतकऱ्यांचा पाठिंबा
सोशल मीडियावर रुबाबच्या व्हिडिओंना शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत असला, तरी व्यापारी वर्गातील काही लोकांचा त्याला विरोध सहन करावा लागतो. बाजारभावाबाबत तो उघडपणे माहिती देत असल्याने व्यापाऱ्यांच्या व्यवहारांवर परिणाम होत असल्याचं काहींचं म्हणणं आहे.

यामागचं कारणही त्याने स्पष्ट केलं. बाजारभाव कमी असताना व्यापारी मोठ्या प्रमाणात शेतीमाल खरेदी करून साठवून ठेवतात. पुढे दर वाढल्यानंतर तो माल विकून नफा मिळवण्याची त्यांची अपेक्षा असते. मात्र, रुबाब शेतकऱ्यांना बाजारभाव वाढण्याची शक्यता सांगतो आणि घाईने माल विकू नका, असा सल्ला देतो. त्यामुळे शेतकरी योग्य भाव मिळेपर्यंत माल विकण्याचं थांबवतात. याचा काही व्यापाऱ्यांच्या व्यवहारांवर परिणाम होतो.
 

या विरोधामुळे त्याला फोनवरून व्हिडिओ बंद करण्यासाठी सांगितलं जातं. काही जण पैसे देण्याचं आमिषही दाखवतात. मात्र रुबाब त्याच्या मतावर ठाम आहे. तो सांगतो, “मला व्हिडिओ बंद करण्यासाठी फोनही येतात आणि पैसे घेऊन गप्प बसण्याचाही सल्ला दिला जातो. पण मला पैशांपेक्षा शेतकऱ्यांचं प्रेम आणि विश्वास महत्त्वाचा वाटतो.”

रुबाबच्या बोलण्यातून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे त्याला व्यवसाय वाढवायचाय, पण त्यासोबत शेतकऱ्यांचा विश्वासही टिकवायचा आहे. बाजारभावाची माहिती देताना कोणत्याही एका व्यापारी गटाचा विचार न करता शेतकऱ्यांना उपयोगी पडेल अशी माहिती देण्याचा त्याचा प्रयत्न असतो.

मिरचीला  बांगलादेशातून मोठी मागणी
भारतातील मिरचीच्या व्यापारावर बांगलादेशमधील मागणीचा मोठा परिणाम होतो. दोन्ही देशांमधील व्यापारात अडथळे निर्माण झाले, तेव्हा मिरचीच्या दरात साधारण पाच ते दहा रुपयांची घट झाली होती. पुढे निर्यातीला परवानगी मिळाल्यानंतर बाजारपेठ पुन्हा खुली झाली आणि दरात सुधारणा झाली. अशा घडामोडींची माहिती तो शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवत असतो.

देशांतर्गत बाजारपेठांचाही त्याला चांगला अभ्यास आहे. त्याची मिरची पुणे आणि मुंबईच्या बाजारपेठेत पाठवली जाते. मुंबईत गुंठरुमाल नावाच्या बारीक मिरचीला मागणी असते. चिंचेचा व्यापार प्रामुख्याने आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू आणि तेलंगणासारख्या दक्षिणेकडील राज्यांत होतो. अशा बाजारपेठांमधील मागणी आणि दरांची माहिती त्याच्या व्यवसायाला दिशा देतेय.

आपल्या ध्येयाबद्दल रुबाब सांगतो, “माझ्याकडून शेतकऱ्यांचा काहीतरी फायदा व्हावा, एवढाच माझा उद्देश आहे. माझी ओळख फक्त व्यापारी म्हणून न होता एक चांगला माणूस म्हणून व्हावी, असं मला वाटतं. माझ्याकडून शेतकऱ्यांना जितकी मदत होईल, तितकी करण्याची माझी तयारी आहे. शेतकऱ्यांनीही माझ्यावर विश्वास ठेवावा आणि मला असाच पाठिंबा द्यावा.”

पुढचं शिक्षण आणि व्यवसायाचा प्रवास
रुबाबला पुढे व्यावसायिक क्षेत्रात एमबीए करण्याची इच्छा आहे. व्यवसायातील अनुभव आणि शिक्षण या दोन्ही गोष्टींचा उपयोग करून पुढे काम करण्याचा त्याचा विचार आहे. रुबाब म्हणतो, “व्यवसायात फक्त पदवी पुरेशी नसते. बाजारपेठेची माहिती, व्यवहारातील अनुभव आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची क्षमता महत्त्वाची असते. वडिलांसोबत काम करताना मला या गोष्टी शिकायला मिळाल्या.”

आज तरुणाई आपल्याला सोशल मीडियाच्या तालावर नाचताना दिसते. परंतु रुबाबने आपल्या व्यवसायातून मिळालेलं ज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सोशल मीडियाचा मार्ग निवडला आहे. शेतकऱ्यांकडून मिळणारं प्रेम हीच त्याच्या कामाची खरी पावती आहे.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter